computer

'एप्रिल फूल' पासून सुरु झालेल्या गोष्टीचा शेवट मुंबईच्या शार्प शूटरच्या अटकेत कसा झाला? वाचा हा किस्सा!!

आम्ही  आज तुम्हाला १ एप्रिलची अशी गोष्ट सांगणार आहोत ज्याची सुरुवात 'एप्रिल फूल' पासून झाली आणि शेवट मुंबईच्या शार्प शूटरच्या अटकेत झाला.

१ एप्रिल १९९५. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान मुंबईचे पोलीस कमीशनर राकेश मारिया यांना एका 'खबरी'चा फोन आला. आता खबरी असे थेट कमीशनरला वगैरे फोन करतात का ? असा प्रश्न तुमच्या मनात उभा राहील. पण सत्य असे आहे की कमिशनर ते हवालदार प्रत्येक पातळीवर ज्याचे त्याचे खबरींचे जाळे असते. एकाचा खबरी दुसर्‍याच खबरी नसतो. खबरी एका विशिष्ट माणसासोबतच संपर्कात असतात. त्याला आपण 'कम्फर्ट लेव्हल' असे म्हणू या ! त्यातल्या त्यात थेट कमिशनर सोबत जोडलेल्या खबरींच्या मनात आपण 'खास' असल्याची भावना असतेच. तर अशाच एका खबरीचा तो फोन होता. 

"साहेब, मला रे रोडला भेटा. तुम्हाला शूटरची खबर देतो."

(राकेश मारिया)

साहेबांनी कुठे भेटायचं असं विचारल्यावर "रे रोडला, नेहेमीच्या ठिकाणी" असं त्रोटक उत्तर देऊन खबरीने फोन ठेवला. 

विश्वसनीय खबरी असल्याने काहीतरी महात्त्वाचीच खबर असणार याची खात्री असल्याने साहेब ताबडतोब एक खाजगी गाडी घेऊन रे रोडला पोहचले. रे रोड  मुंबईच्या हार्बर लायनवरचे एक स्टेशन आहे. या स्टेशनच्या डाव्या बाजूने एक रस्ता खाली उतरतो आणि बिपीटी रोडला जोडला जातो. या रस्त्याच्या कडेला मुंबई पोर्ट ट्रस्टची गोडाऊन्स आहेत. बाजूने मालगाडीचा ट्रॅक आहे. दिवसासुध्दा या रस्त्यावर गर्दी नसतेच. ठरलेल्या वेअरहाऊच्या जवळ खबरी साहेबांची वाट बघत उभाच होता. त्याने साहेबांना एक खबर दिली. 

"साहेब, तुम्ही सगळे सेक्शन गरम केले आहेत म्हणून दुबईहून 'सावत्या'ने त्याच्या दोन शूटरना रम्या आणि जीतूला मुंबई सोडून दिल्लीला जायला सांगीतले आहे. साहेब, ते दिल्लीहून ते नेपाळला पोहचतील आणि मग थेट दुबईला जातील. आज संध्याकाळी ७.३० वाजता व्हिटीहून मुंबई-फिरोजपूर एक्सप्रेस या गाडीने ते जाणार आहेत, पण साहेब ही पोरं व्हिटीलाच गाडीत बसतील असं नाही, कदाचित आधी नाशिकला जातील आणि तिथूनही गाडीत बसतील. पण खबर पक्की आहे साहेब".

हे ऐकता ऐकता दुपारचे १२ वाजून गेले होते. राकेश मारिया त्यांच्या कार्यालयात पुन्हा पोहचले तोपर्यंत एक वाजून गेला होता. 

सुनील सावंत उर्फ सावत्या हे गँगवाल्यामध्ये मोठं नाव होतं. आधी भांडूपच्या खिम बहादूर थापाचा ड्रायव्हर म्हणून काम करणारा सावत्या त्याच्या कर्तबगारीवर काही वर्षातच मोठा शूटर गँगस्टर झाला होता. मुंबई पोलीस हात धुवून मागे लागल्यावर तो दुबईला त्याच्या बॉसकडे म्हणजे दाऊद इब्राहीमकडे निघून गेला होता. त्यानंतर तिथूनच खंडणी आणि सुपारीचे काम चालवायचा. रम्या आणि जितू त्याचे मुंबईतले शूटर होते. आता सेक्शन गरम झाल्याने ते पण दुबईला पळून जाणार होते. 

कार्यालयात पोहचेपर्यंत या कामावर कोणाला पाठवयचं याचा राकेश मारियांनी विचार करून ठेवला होताच. त्याप्रमाणे त्यांनी पहिला फोन बांद्रा पोलीस स्टेशनच्या क्राईमच्या इन्स्पेक्टर सोहेल बुध्दाला केला आणि सांगितले की "तुम्ही, दिनेश कदम, शिवाजी कोळेकर, नरेंद्र सिंग, अभय शास्त्री यांच्या सोबत दुपारी २ वाजेपर्यंत माझ्या कार्यालयात पोहचा. सगळे ऑफीसर वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने त्यांना फोन करून तुम्हीच माझा निरोप द्या. आज संध्याकाळी दिल्लीला जायचं आहे. असाल तसे निघून या". इकडे कमीशनर राकेश मारिया वाट बघत होते आणि दुपारी चार वाजले तरी एकही ऑफीसर कमिशनर ऑफीसला पोहचला नव्हता. पोलीस खात्यात 'असाल तसे निघून या' या आदेशाला फार महत्व असते. असं असूनही एकही ऑफीसर न पोहचल्याने राकेश मारियांच्या संतापाचा पारा वरवर जात राहीला.

संतापाचे आणखी एक कारण असे होते, की गेल्या वर्षभरात मुंबईत गँगवॉर आणि खंडणी युध्दांनी थैमान घातले होते. एकीकडे जनतेचा वाढता अविश्वास आणि दुसर्‍या बाजूने राजकारणी नेत्यांची टोचणी अशा कात्रीत पोलीस दल सापडले होते. अगदी मार्च १९९५ चा हिशोब बघीतला तर १५ मार्चला प्रवीण गावंड मारला गेला होता. तो सुनील सावंत उर्फ सावत्याचा खंडणी वसूली करणारा गँगस्टर होता. थोड्याच दिवसात हवाल्याचे काम करणार्‍या सयद असिफ मनानला कोणीतरी उडवले होते. मुंबई पोलीसांचा दबदबा निव्वळ नावाला उरल होता. आज त्या शूटर्सना पकडायची संधी आली होती पण ऑफीसर गायब होते.

(सुनील सावंत उर्फ सावत्या)

रागावलेल्या कमिशनरनी पुन्हा एकदा सहेल बुध्दाला फोन केला आणि विचारलं, "अजून कोणाचाही पत्ता नाही काय आहे हा प्रकार". त्यावर मी सर्वांनाच वेळेवर पोहचायचा निरोप दिला होता, असं म्हणत पुन्हा फोन करून सांगतो असं सोहेल बुध्दाने कमीशनर राकेश मारियांना सांगीतलं. अपेक्षेप्रमाणे दहा मिनिटात त्याचा फोन आलाच "साहेब मी सगळ्यांना असेल तसे निघून या, रात्री दिल्लीला जायचं आहे असा निरोप दिला होता पण आज १ एप्रिल असल्यामुळे सगळ्यांना तो 'एप्रिल फूल'चा प्रकार वाटला आणि कोणीही आलं नाही. आता मी पुन्हा फोन केल्यावर परिस्थितीचं गांभिर्य सगळ्याना कळलंय आणि सर्व ऑफिसर्स थोड्याच वेळात पोहचतील सर".

कमिशनर राकेश मारियांनी कपाळावर हात मारून घेतला. मुंबई पोलीस कमिशनरांचा निरोप 'एप्रिल फूल' समजणार्‍या अधिकार्‍यांचा त्यांना भयंकर राग आला होता. थोड्याच वेळात सर्व ऑफीसर माना खाली घालून त्यांच्या समोर उभे राहीले. साहेबांचा राग त्यांना दिसत होताच आणि त्यामुळे त्यांच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत कोणातही नव्हती, पण आता ती चर्चा करण्याची वेळ नव्हती. चार वाजून गेले होते. साडेसात वाजता मुंबई -फिरोजपूर सुटणार होती. त्याआधी प्लॅन बनवून कामाला सुरुवात करायची होती.

एप्रिलचा महीना. फिरोजपूरला जाणार्‍या गाडीत सर्वसाधारणपणे १६०० माणसं प्रवास करत असतात. सुटीचा सिझन सुरु झाला असल्याने दोन जास्तीचे डबे जोडण्यात आले होते म्हणजे एकूण २००० लोकांमधून त्या शूटर्सना ओळखून ताब्यात घ्याचं होतं. त्यात अनेक धोके होते. गर्दीत त्यांना पकडणं कठीण होत. कदाचित त्यांच्याकडे शस्त्रं असली नाहक प्रवाशांच्या जीवाला धोका होता. पोलीस त्यांच्या युनीफॉर्ममध्ये जाऊ शकत नव्हते. गँगस्टर मुंबईहूनच चढतील यांची खात्री नव्हती. अगदी समजा ते शूटर्स दिसले आणि त्यांना संशय आला तर ते मधल्या एखाद्या स्टेशनवर उतरून गेले तर पोलीस काहीच करू शकत नव्हते.

थोडक्यात त्यांना संशय न येऊ देता त्यांची ओळख पटवणं आणि ते दिल्लीला उतरल्यावर त्यांना ताब्यात घेणं हा एकच उपाय होता. संशय न येऊ देता म्हणजे काय करावं यावर उपाय शोधायला पण वेळ कमी होता. अशा वेळी राकेश मारियांनी डोकं चालवून एक उपाय शोधला. त्यांनी त्यांचे रेल्वेमधील बॅचमेट सी. पी. शर्मांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. पोलीसांनी साध्या कपड्यात शोधत बसण्यापेक्षा त्यांना टीटीइ म्हणजे टिकीट चेकर्सचे काळे कोट द्यायची विनंती केली.

मुंबई -फिरोजपूर गाडे सुटायला जेमतेम अर्धातास शिल्लक असताना पोलीस ऑफीसर्स स्टेशनवर पोहचले. त्यांना टीसीचे काळे कोट मिळाले. ते अर्थातच इतर लोकांनी वापरलेले असल्याने त्याला घामाचा प्रचंड दर्प येत होता. पण इलाजच नव्हता. ऐनवेळी परिटघडीचे कोट मिळणार तरी कसे होते?

अपेक्षेपेक्षा गाडीत गर्दी जास्त होती. डब्यांमध्ये घुसखोरी करणारे प्रवासीही बरेच होते. अशा गर्दीत ज्यांचे फोटो पण कधीच बघीतले नव्हते अशा दोन माणसांना ओळखणं, त्यांना संशय न येऊ देता त्यांच्यावर रात्रभर पाळत ठेवणं आणि दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्यावर झडप घालून कब्जात घेणं हे काम अशक्यच होतं. असं असलं तरी राकेश मारियांनी सोहेल बुध्दा, दिनेश कदम, शिवाजी कोळेकर, नरेंद्र सिंग, अभय शास्त्री यांची निवड करण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे या ऑफीसरांची ख्यातीच 'मिशन इंपॉसीबल' यशस्वी करण्याची होती.

गाडी सुटली आणि सगळे ऑफीसर त्यांच्या कामावर लागले. प्रवाशांना नाव विचारायचं, त्यांची तिकिटं बघायची, उगाच चार वाक्य बोलून बाकीच्या प्रवाशांचे चेहरे निरखायचे असा कार्यक्रम सुरु झाला. काम लवकर करणं पण आवश्यक होतं कारण नाशिक येईपर्यंत प्रवाशांची झोपायची वेळ सुरु होणार होती. ही सावत्याची खास माणसं होती म्हणजे कदाचित एसी -फर्स्ट क्लास मध्ये असतील म्हणून ते डबे आधी शोधून झाले. मध्यरात्र झाली. भुसावळ जवळ आलं. भुसावळहून सोहेल बुध्दानी फोन केला. "साहेब, सॉरी अजून तरी कोणी दिसत नाही". राकेश मारियांची संपूर्ण रात्र अशीच वाट बघण्यात गेली.

दुसरा दिवस उजाडला. जवळजवळ सगळे प्रवाशी आणि त्यांची तिकीटं तपासून झाली होती, पण हवी ती माणसं नजरेस येत नव्हती.  मिशन वाया जातं का काय अशी भिती वाटायला लागली होती. गाडी निजामुद्दीन म्हंणजे दिल्ली पासून अर्ध्यातासावर होती. शेवटचे दोन डबे चेक करताना अचानक नशिबाने हात दिला.

दिनेश कदम यांनी एका तरुण प्रवाशाचे तिकीट चेक करता करता त्याचं नाव विचारलं. "जितेंद्र राणे" त्या तरुणाने उत्तर दिलं. जितेंद्र म्हणजे जितू हे गणित उलगडलं, पण चेहेर्‍यावरचे भाव न बदलता ते पुढे गेले आणि नरेंद्र सिंगाना लक्ष ठेवण्याच इशारा केला. दोन कंपार्टमेंट पुढे दुसर्‍या एका तरुणाने तिकीट देता देता नाव सांगीतलं. "रामचंद्र गुरव". जितू सापडला होताच आता रामचंद्र म्हणजे 'रम्या' पण सापडला.

अखेर दिल्ली आलं. अधिकार्‍यांच्या टप्प्यात त्यांचं सावज आलं होतं पण प्रश्न इतकाच होता झडप घालायची कधी ?

त्या दोघांचा पाठलाग करत पोलीसांची टीम स्टेशनबाहेर पडली. त्या दोघांना घ्यायला एक तिसरा मुलगा स्टेशनवर आला होता. तिघेही रिक्षात बसले आणि त्यांच्या पाठोपाठ रिक्षातून पोलीस अधिकारी त्यांचा पाठलाग करत होते. काश्मिरी गेट परिसरात एका लॉजवर ते पोहचल्याचे नक्की करून ऑफीसर्सनी राकेश मारियांना फोन केला. "सर, आता पुढचे आदेश द्या"

"त्यांना ताबडतोब अटक करा आणि विमानाने त्यांना मुंबईत घेऊन या. मी एअरपोर्टवर तिकीटाची व्यवस्था करतो आहे."मारियांनी आदेश दिला.

त्या पुढच्या अर्ध्या तासात ते दोन्ही गँगस्टर आणि त्यांना घ्यायला आलेला तिसरा 'परशुराम चव्हाण' असे तिघेही मुंबई पोलीस अधिकार्‍यांच्या ताब्यात होते. तीन अट्टल सुपारीबाज शूटर्सना घेऊन काही तासातच फ्लाइट मुंबईला पोहचली. मिशन यशस्वी झालं होतं. या गँगस्टर्सना पकडल्यावर ७ वेगवेगळ्या हत्यांचा तपास पूर्ण झाला आणि आणखी दहा गँगस्टर पोलीसांच्या हाती सापडले.

(सोहेल बुध्दा)

मुबईत पोहचल्यावर या अधिकार्‍यांचे 'डी- बिफींग ' करताना या संपूर्ण प्लॅनमध्ये एक मोठी चूक होती हे राकेश मारियांच्या लक्षात आले. त्या दिवशी झालेल्या ‘एप्रिल फूल'च्या गोंधळात राकेश मारिया आणि असाल तसे निघून या आदेशाचे पालन करताना पुरेसे पैसे न घेताच पोलीस अधिकार्‍यांची टीम बाहेर पडली होती. परिणामी एअरपोर्टला पोहोचेपर्यंत अधिकार्‍यांच्या खिशात फक्त १३ रुपये शिल्लक होते. त्यात एक कॅडबरी घेऊन त्यांनी पोट भरलं होतं. 

असे अनेक प्रसंग मुंबई पोलीस अधिकर्‍यांच्या वाट्यास येत असतात पण त्यांच्या कर्तव्याला ते कधीच चुकत नाहीत. अशाच एका प्रसंगी ऐनवेळी पैसे कमी पडल्याने नेपाळ बॉर्डर पार करताना मुंबई पोलीसांना त्यांच्या अंगावरच्या अंगठ्या आणि सोनसाखळ्या विकाव्या लागल्या होत्या.

ती कथाही आपण वाचणार आहोतच, पण तोपर्यंत आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा!

सबस्क्राईब करा

* indicates required