computer

मुंबईची वीज बंद पडण्यामागे चीनी हॅकर्सचा हात होता? हे नवीन प्रकरण काय आहे? संपूर्ण माहिती जाणून घ्या !!

मुंबई कधीही बंद पडत नाही म्हणतात, पण कोरोनाने मुंबई बंद पाडली. कोरोना सोडला तर आणखी एका गोष्टीने मुंबईला थांबायला भाग पाडलं होतं. १२ ऑक्टोबर २०२० मध्ये संपूर्ण मुंबईची वीज खंडित झाली होती. ऐन कोरोनाच्या संकटात विजेमुळे मुंबईची यंत्रणाच विस्कळीत झाली होती. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला. असं म्हणतात की ग्रीड फेल्युअरमुळे किंवा मानवी चुकीमुळे हा बिघाड झाला होता.  पण हे कारण बरोबर आहे का?

आज ६ महिन्यांनी हा प्रश्न पडण्यामागचं कारण म्हणजे अमेरिकेच्या सायबरसुरक्षा कंपनीच्या दाव्यानुसार मुंबईची वीज घालवण्यामागे चीनचा हात होता. हे काय नवीन प्रकरण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

गेल्यावर्षी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात चकमकी झाल्या होत्या. ह्या घटनेच्या ४ महिन्यांनी मुंबईत वीजपुरवठा बंद पडला. या दोन घटनांचा संबंध असल्याचा दावा न्युयॉर्क टाईम्सच्या बातमीत करण्यात आला आहे. हा दावा Recorded Future या खाजगी सायबरसुरक्षा कंपनीच्या अहवालावरून करण्यात आला आहे. Recorded Future च्या म्हणण्यानुसार भारताच्या विजपुरवठा सांभाळणाऱ्या यंत्रणेत चीनी मालवेअर शिरला होता. हा मालवेअर भारतीय यंत्रणेत सोडण्याचं काम चीनच्या  “Red Echo” नावाच्या हॅकर्स संघटनेने केलं होतं. Red Echo ला खुद्द चीनच्या सरकारची मान्यता असल्याचीही माहिती मिळाली आहे.

Recorded Future ने केलेल्या निरीक्षणात असं दिसून आलं की चीनी सरकारने आश्रय दिलेले हॅकर्स ग्रुप भारतीय यंत्रणेत घुसखोरी करत आहेत. या घुसखोरांच्या निशाण्यावर भारतातील उर्जा क्षेत्रातील १० कंपन्या होत्या. याखेरीज दोन बंदरेही त्यांच्या निशाण्यावर होती. मुंबईच्या वीजपुरवठा यंत्रणेवर हल्ला करण्यासाठी त्यांनी axiomatic asymptote नावाच्या मालवेअरचा वापर केला होता. हे मालवेअर सायबर सुरक्षा कंपन्यांच्या ओळखीचे असल्याने हा सायबर अटॅक शोधणे शक्य झाले आहे

Recorded Future च्या निरीक्षणात आलेल्या गोष्टी त्यांनी भारताच्या सायबर सुरक्षेसाठी असलेल्या CERT-In संस्थेकडे पाठवल्या होत्या. CERT-In ने अशी माहिती मिळाली असल्याचं दोन वेळा कबूल केलं आहे, पण या घटनेत खरोखर चीनी कंपनीचा हात होता का याबद्दल माहिती दिलेली नाही.

चीनी  हॅकर्सनी भारताच्या वीजपुरवठ्यावर हल्ला का केला?

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गलवान खोऱ्यातील तणाव आणि मुंबईतील वीज पुरवठा खंडित होणे यात संबंध आहे. चीनी हॅकर्स भारताच्या वीजपुरवठा खंडित करून हे सुचवायचे होते की आमच्या नादी लागलात तर एके दिवशी संपूर्ण भारताची वीज बंद पडेल. चीनच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी हा छोटा इशारा होता.

अमेरिकेच्या सायबर सुरक्षा कंपनीने केलेला हा दावा खरा आहे, असं म्हणता येणार नाही. या दृष्टीने आणखी तपास होणे गरजेचे आहे. पण हे जर खरं ठरलं तर आपल्यासाठी नक्कीच चिंतेची बाब होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमधून नक्की कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required