क्रूर सिरियल किलर्स: पकडला जाऊनही निर्दोष सुटलेला मुंबईचा बियरमॅन..

देशात सिरीयल किलर्स अनेक प्रकारचे आणि क्रूरतेची नवनवी परिसीमा गाठणारे होऊन गेले. या लोकांना त्यांच्या खून करण्याच्या पद्धतीवरून नावे पडतात हे आपण आधीच्या लेखांमध्ये बघितले आहे. ऑटो चालवणारा शंकर पुढे ऑटो शंकर झाला, तसेच आज आपण बियर मॅन नावाच्या एका सिरीयल किलरची गोष्ट वाचणार आहोत. 

इतर सिरीयल किलर्समध्ये आणि या बियर मॅनमध्ये मात्र मोठा फरक आहे. इतर सिरीयल किलर्स पकडले गेले आणि त्यांचा गुन्हाही सिद्ध झाला. हा बियर मॅन पकडला तर गेला, मात्र न्यायालयाने त्याला निर्दोष घोषित केले. आता या गोष्टीला दहा वर्षे उलटून गेली आहेत. तरी हा पकडण्यात आलेला बियर मॅन तोच होता का हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

२००६ सालची ही गोष्ट आहे. रोजच्या कामाला जाणारे लोक लोकल पकडण्याची धावपळ करत होते. तेवढयाच एकच गहजब सुरू झाला. काही लोकांना मरीन लाईन फुटओव्हर ब्रिजवर एक प्रेत दिसले होते. लागलीच घटनास्थळी पोलीस आले. पोलीस चौकशीला लागले, तर लोक आपापल्या कामाकडे वळले. चौकशीअंती हे प्रेत एका टॅक्सी ड्रायव्हरचे असल्याचे समजले. 

दोन महिने असेच उलटून गेले. परत चर्च गेट रेल्वे स्टेशन जवळ अजून एक प्रेत सापडले. प्रेताच्या बाजूला एक बियरची बॉटल पडली होती. पुढे काही काळात एकेक करत अशी ७ प्रेते सापडली. या सर्व खुनांचा पॅटर्न सारखाच होता. आता चौकशी जोरात सुरू झाली. तरीही मात्र गुन्हेगार पोलिसांच्या पकडीत येत नव्हता. मुंबई मात्र भीतीच्या छायेखाली होती.

नुकतीच कुठे मुंबई अंडरवर्ल्डपासून मोकळी होत होती. सगळीकडे शंकाकुशंकांचा जन्म झाला होता. प्रेताजवळ सापडणारी बियरची बॉटल बघून लोकांनी या खुन्याचे बियरमॅन असे नामकरण केले. मीडिया देखील हेच नाव उचलून धरू लागली. पोलिसांवर गुन्हेगार पडकण्याचा दबाव वाढत होता. पोलिसांच्या हाती एकच पुरावा होता. रिकामी बियर बॉटल. 

या खुन्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मग एसआयटीची स्थापना केली. शेवटी धोबी तलावाजवळ रवींद्र कांतरोल नावाचा एक इसम पोलिसांच्या हाती लागला. तो सापडला तेव्हाच हा खुनी असावा असे वाटत होते. रक्ताने माखलेले कपडे, सोबत एक खंजीर असा त्याचा अवतार होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याच्यावर ५-७ खुणांचा संशय होता. पण जेव्हा नार्को टेस्ट झाली तेव्हा त्याने तब्बल १५ खुनांची कबुली दिली.

नार्को टेस्टमध्ये त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या, ज्यात आपल्याला रक्ताची आवड असल्याने आपण हे सर्व केल्याचे तो सांगू लागला. रविंद्रला नशाबाजी करण्याचे व्यसन असल्याचेही त्याने कबूल केले. पुढे आपण लोकांना आधी बियर पाजायचो आणि मग त्यांचा खून करायचो असेही त्याने कबूल केले. पोलिसांनी मग न्यायालयात ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट, पॉलीग्राफ टेस्ट असे सर्व पुरावे न्यायालयात सादर केले होते. 

२००९ साली त्याला स्थानिक न्यायालयाने जन्मठेप सुनावली. पण जेव्हा हेच प्रकरण उच्च न्यायालयात गेले तेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट अमान्य करत रविंद्रला पुराव्यांअभावी निर्दोष सिद्ध करत त्याला सोडण्याचे आदेश दिले. पुढे या रवींद्रने धर्म परिवर्तन करत स्वतःचे नाव अब्दुल रहीम करून घेतले. 

रविंद्र कांतरोलला सोडून देण्यात आल्याने तो बियरमॅन हाच की दुसरा कोण याबद्दल असलेला संशय आजही जसाचा तसा आहे. रविंद्रची आधीही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मुंबईतील एका गॅंगचा तो सदस्य असल्याचे पण सांगितले गेले पण या सिरीयल किलिंगच्या घटनेत पुरावे न सापडल्याने हे रहस्य आजही रहस्यच राहून गेले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required