computer

जुनं झिलंड आहे कुठे? न्यूझिलंडच्या नावामागे असलेला हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल !!

ज्या ज्या ठिकाणांच्या नावात न्यू आहे, त्याच नावाची जुनी ठिकाणं ही अस्तित्वात आहेत. म्हणजे पाहा, न्यू यॉर्क, न्यू गिनी, न्यू हॅम्पशायर वगैरे वगैरे. यातली जुन्या नावाची गावं अस्तित्वात आहेत आणि म्हणूनच पुन्हा त्याच नावाचं गाव वसवलं गेल्यावर त्याच्या आधी हे न्यू प्रकरण आलं, पण न्यूझिलंड नावाबद्दल नेहमी एक विनोद केला जातो, की हे जर न्यू म्हणजे नवीन झिलंड (झिलँड?) आहे तर जुनं कुठे आहे? जुन्या झिलंडबद्दल शोध घेतला असता असा कोणताच देश सापडत नाही. मग हे नाव आलं कुठून? की इंग्रजांनी मनात आलं म्हणून ठेवून दिलं? या गोष्टीचा शोध घेत असताना जी माहिती आमच्या हाती लागली ती तुमच्या समोर ठेवत आहोत.

नावाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. आज न्यूझिलंडमध्ये इंग्रजी हीच मुख्य भाषा आहे, आणि बहुतेक नागरिक आंग्ल वंशाचे आहेत. पण १६०० च्या दशकात चित्र वेगळं होतं. न्यूझिलंड हा मुळात माओरी लोकांचा देश. माओरी लोक न्यूझिलंडला ‘आओतेरोआ’ (Aotearoa) म्हणायचे.
आओतेरोआच्या जमिनीवर पहिल्यांदा डच उतरले. दर्यावर्दी एबेल टास्मान आणि त्याचे साथीदार समुद्र सफरीवर निघाले होते. ते चुकून या नव्या भूमीवर पोहोचले. आधी तर ही नवीन जमीन नसून आपण अर्जेन्टिनाला पोहोचलोय असा सगळ्यांचा समज झाला, पण थोड्याचवेळात सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण  नवीन भूमी शोधली आहे. एबेल टास्मान यांनी मग ओरडून या नव्या भूमीचं बारसं केलं. नाव होतं ‘Nieuw Zeeland’.

काही इतिहासतज्ञ असाही दावा करतात की एबेल टास्मान यांनी न्यूझिलंडला अर्जेन्टिना समजून Staten Landt नाव दिलं होतं. पुढे डच अधिकाऱ्यांनी हे नाव बदलून लॅटिन भाषेत Nova Zeelandia आणि डच भाषेत Nieuw Zeeland असं नामकरण केलं.

आजच्या न्यूझीलंडच्या नावाचं स्पेलिंग हे New Zealand अशी आहे. या स्पेलिंगचाही वेगळा इतिहास आहे तो आपण पाहूच, पण आधी या झिलंडची भानगड समजून घेऊया.

(एबेल टास्मान )

न्यूझिलंड मधला Zeeland हा शब्द sealand म्हणजे समुद्रावरचं बेट या शब्दाचा अपभ्रंश आहे.  एबेल टास्मान किंवा डच अधिकाऱ्यांना हेच नाव सुचायचं कारण म्हणजे नेदरलँड्समध्ये Zeeland नावाचं बंदराचं शहर अस्तित्वात आहे. एका अर्थी नेदरलँड्स मधलं Zeeland हे जुनं आणि नव्याने सापडलेलं नवीन या अर्थाने Nieuw Zeeland हे नाव रूढ झालं. 

या एबेल टास्मान साहेबांचं नाव न्यूझिलंडच्या  इतिहासाला तर चिकटलेलं आहेच, पण तिथल्या जागांनाही त्यांचं नाव मिळालंय. न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलियाला जोडणारा समुद्री पट्टा टास्मान समुद्र म्हणून ओळखला जातो. तसेच न्यूझिलंड जवळच्या बेटाला टास्मान यांच्या नावावरूनच टास्मानिया नाव मिळालं आहे.

तर आता वळूया New Zealand या स्पेलिंगकडे.

इतिहासात जेम्स कुक किंवा कॅप्टन कुक नावाचा एक प्रसिद्ध खलाशी होऊन  गेला. हवाई बेटे तसेच ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा शोधण्याचा मान जेम्स कुक यांना जातो. त्यांनी न्यूझिलंडच्या नावाला जास्तीतजास्त इंग्रजी स्वरूप देऊन Nieuw Zeeland च्या ऐवजी New Zealand हे सुटसुटीत नाव ठेवलं. उच्चार तोच राहिला पण स्पेलिंग बदललं.

तर मंडळी, आता कोणी विनोदाने विचारलं की जुनं झिलंड कुठे आहे तर त्याचं उत्तर तुमच्याकडे तयार असेल.