सम्राट 'नेपोलियन बोनापार्ट'ला चक्क सशांनी हरवलं होतं ??

नेपोलियन बोनापार्ट हे नाव जगाच्या इतिहासाला काही नवे नाही. पण आज आम्ही जो किस्सा सांगणार आहोत, तो मात्र तुमच्यासाठी नवा असेल. हा नेपोलियन जन्माने फ्रेंच नव्हता पण कर्तृत्वाच्या जोरावर त्याने फ्रेंच सैन्यातला अधिकारी ते सरसेनापती, आणि सरसेनापती ते सम्राट इतकी मोठी झेप घेतली होती. त्याची कारकीर्द ऐन भरात असताना फ्रान्सवर आक्रमण करू पाहणाऱ्या कित्येक देशांना त्याने पराभूत केले. तो इतका पराक्रमी होता की त्याने १८०४ मध्ये सम्राट झाल्यानंतर जवळजवळ सर्वच राष्ट्रांविरुद्ध बंड पुकारले. अशा या महान राजाला सशासारख्या एवढुशा प्राण्याने पळता भुई केले असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल?
अर्थातच नाही. पण मंडळी. अतिशयोक्ती किंवा धादांत खोटे देखील वाटेल अशी ही घटना खरोखरीच घडली आहे! त्या काळातल्या सगळ्यात जास्त शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या एका शूर सम्राटाला काही सशांनी मैदानावरून चक्क पाठ दाखवत पळायला भाग पाडले या घटनेची नोंद इतिहासात आहे. हां, आता काही ठिकाणी काही संदर्भ वेगळे आहेत, तरी घटनेचा मूळ गाभा तोच आहे.
तर, झालं असं होतं की फ्रान्स आणि रशियामध्ये मोठे युद्ध चालले होते. पण मग १८०७ मध्ये नेपोलियनने ‘ ट्रिटीज ऑफ टिल्सिट’ म्हणजेच टिल्सिटचा तह केला आणि हे युद्ध संपुष्टात आले. आता हा तह सेलिब्रेट करण्यासाठी नेपोलियनने सगळ्यांना सशांच्या मटणाची मेजवानी देण्याचे ठरवले. या मेजवानीसाठी खूप ससे लागणार होते आणि ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नेपोलियनने स्टाफचा मुख्याधिकारी ॲलेक्झांड्रे बेर्थियार याच्यावर सोपवली. या माणसाने असा प्लॅन केला की आधी रानटी ससे पकडून आणायचे, त्यांना मैदानात सोडायचे आणि आलेल्या पाहुण्यांकडून या सशांची शिकार करायची आणि मग त्यांच्या मेजवानीवर सर्वांनी ताव मारायचा!! त्याप्रमाणे ससे मागवले देखील गेले, पण इथून खरी गंमत सुरु झाली.
(ॲलेक्झांड्रे बेर्थियार)
ॲलेक्झांड्रे बेर्थियारने ३००० हून अधिक ससे आणले खरे, पण असे म्हणतात कि त्याने रानटी ससे आणण्याऐवजी तिथल्याच शेतकऱ्यांकडून पाळीव ससे गोळा केले. ससा हा प्राणी मुळात भेदरट. माणसांची चाहूल लागली तरी जीव वाचवण्यासाठी धूम ठोकणारा. लहानपणी पाठीवर झाडाचे पण पडले तरी घाबरून ‘ आभाळ पडले’ म्हणत सैरावैरा धावणाऱ्या सशाची गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण पाळीव सशांच्या बाबतीत थोडे वेगळे घडते. त्यांना आसपास वावरणाऱ्या माणसांची सवय होत जाते. त्यामुळे ते रानटी सशाप्रमाणे माणसांना बघून बुजत नाहीत. हे सगळं माहित नसलेल्या बेर्थियारने काम वाचवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून ससे आणले खरे,पण त्यामुळे सर्व चित्रच बदलले.

गवताळ मैदानावर पिंजऱ्यात ठेवलेले हे ससे मोकळे सोडण्यात आले. ते जेव्हा सैरावैरा पळतील तेव्हा त्यांना मारण्यासाठी बंदुक घेऊन शिकारी सज्ज होते. शिकारीची ही मजा लुटण्यासाठी स्वतः नेपोलियन तेथे उपस्थित होता. ससे धावू लागताच त्यांना टिपले जाणार आणि त्यांचे मांस शिजवून मेजवानीचा आस्वाद घेतला जाणार असे अपेक्षेप्रमाणे क्रमवार घडणार होते. पण जेव्हा हे ससे इकडे तिकडे धावण्याऐवजी कान उभारून त्यांच्याकडे रागाने पाहू लागले तेव्हा उपस्थितांना पहिला धक्का बसला. गोजिरवाण्या, निरुपद्रवी नि भित्र्या समजल्या जाणाऱ्या या प्राण्यांकडून अशी प्रतिक्रिया येताच नेपोलियन खो खो हसायला लागला. लढाईच्या इतक्या अनुभवामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्या बाजूच्या ताकतीचा अंदाज न आल्याने थेट चाल करणारे शत्रू त्याला नवीन नव्हते, पण ही हिम्मत प्राण्यांनी दाखवल्याने त्याचे मनोरंजन होऊन तो हसू लागला. पण काही क्षणातच त्याच्या लक्षात आले की ही परिस्थिती हसण्यासारखी नाही. कारण कोणीतरी आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व ससे तिथल्या सगळ्या लोकांवर चाल करून आले की राव! एवढूसे ससे, किती पळणार नि करून करून किती प्रतिकार करणार या त्यांच्या ठाम गृहितकांना जणू या सशांनी सुरुंग लावला.
नेपोलियनच्या पार्टीसाठी आलेली पब्लिक आता सशांवर हल्ला करण्याऐवजी चक्क स्वत:चे फक्त रक्षण करायला लागली. पायावरून चढत डोक्यापर्यंत जात, अंगरख्याच्या बाहीला लटकत सशांनी नेपोलियनच्या हात, मान, गाल, पाय या ठिकाणी चावे घेतले नि युद्धाची रणनीती आखण्यात माहिर असलेला तो पराक्रमी सम्राट सशांपासून स्वतःला वाचवायचे म्हणून घोडागाडीपर्यंत पळत गेला. आक्रमण या शब्दाचा मानवी अवतार म्हणजे नेपोलियन होता, तोच नेपोलियन सशांच्या हल्ल्यापुढे हतबल झाला हो मंडळी. पण हे ससे इतके बिलंदर निघाले की त्यांनी घोडागाडीत देखील त्याचा पाठलाग करून त्याला चावे घेणे सोडले नाही. कशीबशी त्यांच्यापासून सुटका करून घेत नेपोलियन तिथून निघून गेला आणि अशा तऱ्हेने त्यांची पार्टी आपोआपच कॅन्सल झाली.
आता ही घटना खरी असली तरी काही प्रश्न कोड्यांप्रमाणे अनुत्तरीत राहतात. सर्वच ससे मंतरल्यासारखे, संमोहनाखाली आज्ञापालन करत असल्याप्रमाणे एकजुटीने चाल कसे करुन गेले असतील? समोरच्याने आक्रमण केले तर आपण काय भूमिका घेत स्वतःचा बचाव करायचा हा विचार नि त्याप्रमाणे कृती फक्त मनुष्य करू शकतो. पण सशासारख्या, फारसा बुद्धीचा वापर न करणाऱ्या या प्राण्यांकडून असा सूत्रबद्ध हल्ला केवळ स्वसंरक्षणाच्या नैसर्गिक प्रेरणेतून झाला असेल का? सांगता येत नाही. पण या हल्ल्याने एका सम्राटाच्या गर्वाचे घर खाली केले हेही खरेच.