पोटासाठी सारे काही पण पोटच नसेल तर ? वाचा नताशाची कहाणी !!

नताशा दिद्दी या महिलेचं इंस्टाग्रामवर ‘दि गटलेस फुडी’ नावाचं  अकाउंट आहे. तिचे थोडेथोडके नाहीत, तर् ४६,००० फॉलोवर्स आहेत.  या अकाउंटवर ती स्वतः बनवलेल्या पदार्थांचे फोटो टाकते. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय राव ? असे कित्येक खाण्याचे शौकीन आहेत आणि आपण ते बनवलेल्या पदार्थाला साऱ्या जगाने बघावं म्हणून सोशल मिडियावर टाकतात.


स्रोत

पण थांबा....नताशाची गोष्टच निराळी आहे भाऊ. खरं तर नताशाला ‘पोट’ नाहीये. ती जे खाते ते एका तासात बाहेर पडतं. म्हणजेच ज्या व्यक्तीला पोट नाही तीच व्यक्ती खवय्या आहे. आहे न कमाल?
चला तर मंडळी आज जाणून घेऊया नताशाबद्दल !!

नताशाला लहानपणापासून स्वयंपाक करायला आवडायचं. यातच करियर करण्यासाठी तिने दादरच्या कॅटरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर तिने मुंबईच्या अनेक बड्या हॉटेल्समध्येही काम केलं. त्यानंतर ती लग्न करून दिल्लीला निघून गेली. दिल्लीमध्ये तिने याच क्षेत्रात पुन्हा काम सुरु केलं.


स्रोत

नताशा दिल्लीला आली खरी, पण तिला दिल्ली मानवली नाही. तिच्या कामाचे तास वाढले होते, तिचा पती आणि तिच्या सासरच्यांकडून तिला त्रास होत होता.  शेवटी तिने लग्न मोडलं. या सर्वांचा प्रचंड ताण तिने घेतल्यानं याचा सरळ परिणाम तिच्या शरीरावर झाला. अवघ्या ३३ वर्षांच्या वयात परिस्थिती एवढी बिघडली की तिने काहीही खाल्लं तरी तिच्या डाव्या खांद्याला तीव्र वेदना होत असत. पोटाच्या विकाराने तिचं वजन ३८ किलोपर्यंत कमी झालं होतं. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितलं की तिच्या पोटात ब्लीडींग अल्सर्स आणि ट्युमर आहे. परिणामी तिचं पोट काढून टाकण्यात आलं.

ताणताणावाचा आरोग्यावर परिणाम होणे साहजिक आहे. ताण घेतल्यामुळे डोकेदुखी, झोप न येणे, ब्लडप्रेशर,  पाठदुखी सारखा त्रास होतोच पण नताशाच्या केसमध्ये सर्व ताण तिच्या पोटावर पडला. म्हणूनच ट्युमरसारख्या आजाराने तिच्यावर मात केली.


स्रोत

पण मंडळी,  तिने आपल्या आजारालाही जिंकलं. पोट नसूनही तिने खाद्यपदार्थ बनवणे आणि खाणे काही सोडलं नाही. ती दिवसातून ६ ते ७ वेळा खाते. खाल्यानंतर १ तासातच अन्न पचन होऊन बाहेर पडतं. ती डॉक्टरच्या सल्ल्याने स्वतःची काळजी घेत आहे. खाण्याबद्दलचं तिचं प्रेम सर्जरी नंतर थोडंही कमी झालेलं नाही. ती रोज नवीन पदार्थ बनवून आपल्या ‘गटलेस फुडी’ अकाउंटवर टाकते. इंस्टाग्रामवर ती आपल्या खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहे.

मंडळी, आपल्या कमजोरीतून जगण्याची कला शोधून काढणाऱ्या लोकांची नताशा  प्रतिनिधी आहे.

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required