computer

कोर्ट म्हणतं की डास चावणं हा अपघातच ! वाचा ही सनसनाटी केस !!

काय, शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे! आज तुम्हाला सांगणार आहोत एक मजेशीर परंतु तितकीच महत्वपूर्ण कायदेशीर घटना. एका डासामुळे इन्श्युरन्स कंपनीला ग्राहकासमोर कसे झुकावे लागले याची कहाणी… वाचा तर मग !

ही केस लढली गेली नॅशनल इन्श्युरन्स कंपनी विरुद्ध मौसुमी भट्टाचारजी यांच्यामध्ये. झालं असं की, कोलकातामध्ये राहणाऱ्या मौसुमी भट्टाचारजी यांचे पती देबाशीष भट्टाचारजी यांनी बँक ऑफ बडोदाकडून घर बांधणीसाठी कर्ज घेतले होते. या कर्जासोबत बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांना एक इन्श्युरन्स पॉलिसी देण्यात आली होती. या पॉलिसीत  पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला विम्याची संपूर्ण रक्कम मिळेल असे नमूद केले होते. ही पॉलिसी सुरू असतानाच दुर्दैवाने देबाशीष यांचे 22/01/2012 रोजी निधन झाले. ते मोजांबिक देशात एका चहा कारखान्यात कामाला होते आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला मलेरियाचा डास! 

काही दिवसांनी देबाशीष यांच्या पत्नी मौसुमी भट्टाचारजी यांनी नॅशनल इन्श्युरन्स कंपनीकडे विमा रक्कम मिळण्यासाठी दावा केला. अर्थातच कंपनीने तो दावा फेटाळून लावला. कंपनीचं म्हणणं होतं की ‘मलेरियाने झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यू असू शकत नाही'. मौसुमी यावर  गप्प बसल्या नाहीत.   त्यांनी जिल्हा न्यायालयात नॅशनल इन्श्युरन्स कंपनी विरोधात तक्रार नोंदवून दाद मागितली. तिथे आपल्या बचावात कंपनी म्हणाली की, मलेरिया हा आजार असून आजाराने झालेला मृत्यू अपघाती मृत्यू ठरू शकत नाही. त्यामुळे कंपनी तक्रारदाराला विम्याची ठराविक रक्कम देण्यास बांधील असू शकत नाही. परंतु जिल्हा न्यायालयाने तक्रारदाराचा दावा मान्य केला आणि 28/02/2014 रोजी कंपनीविरोधात निकाल दिला. 

इन्श्युरन्स कंपनी यावर गप्प काशी बसेल? तिनेसुद्धा या निर्णयाविरोधात राज्य कमिशन पुढे अपिलद्वारे दाद मागितली. राज्य कमिशनने जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि अपील फेटाळले. त्या कंपनीचं इतक्यावर समाधान झाले नाही आणि नॅशनल इन्श्युरन्स कंपनी राष्ट्रीय आयोगाकडे गेली आणि त्यांच्यासमोर या निर्णयालाविरुद्ध याचिका दाखल केली गेली.

मंडळी, हा पूर्ण काळ ही संपूर्ण केस एकाच मुद्द्याभोवती फिरत होती, तो म्हणजे 'डास चावून मलेरिया होऊन झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यू ठरतो का?' न्यायालयासमोर दोन्ही बाजूंनी अनेक दावे केले गेले, बऱ्याच इतर केसेसचे दाखले दिले गेले. मग एकदा कधीतरी न्यायालयाने ‘अपघात’ या शब्दाचा मान्यताप्राप्त शब्दकोशातील अर्थ बघितला. तर तिथे या शब्दाची  व्याख्या ‘अपघात म्हणजे अचानक घडलेली आणि पूर्वनियोजित नसलेली घटना’ अशी होती.  

आता या केसमध्ये डास चावणे ही अचानक घडलेली घटनाच आहे असे न्यायाधीशांनी मान्य केले. अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. त्या केसेसचा आधार घेत न्यायाधीशांनी निकाल दिला. २००६ मध्ये अशीच एक केस लढली गेली होती.  ती केस होती मातबर सिंग विरुद्ध ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनी यांच्यामध्ये. त्या केसांच्या निकालात  कुत्रा चावणे किंवा साप चावणे या अपघाती घटनाच आहेत अस निर्णय दिला होता.  याच केसचा आधार घेऊन डास चावणे हा सुद्धा एक अपघातच आहे असा निर्णय घेतला गेला आणि नॅशनल इन्श्युरन्स कंपनीची याचिका परत एकदा फेटाळून मौसुमी भट्टाचारजी यांच्या बाजूने निकाल दिला गेला. 

(मौसुमी भट्टाचारजी)

सर्वसामान्य लोकांसाठी हा एक महत्वाचा निर्णय आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मंडळी, आपण विमा घेतो पण बरेचदा त्याच्या अति आणि नियमच नीट वाचत नाहीत. ओळखीचा एजंट असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवला जातो आणि कधी कधी तो त्याचं टारगेट पूर्ण करण्यासाठी आपल्या गळ्यात पॉलीसी मारतो. काही झालं तरी आपल्याला विमा कंपन्यांविरुद्ध लढल्या गेलेल्या केसेस आणि त्यांच्या निकालांसंबंधी माहितीच नसते.   कित्येकदा इन्श्युरन्स कंपन्या छोट्या छोट्या कारणांवरून दावे रद्दबातल ठरवतात आणि ग्राहकांना पॉलिसीचा लाभ मिळू शकत नाही. आजकाल इतके रोग आणि त्यांच्या साठी पसरल्या आहेत, त्यामुळं हा निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी किती महत्त्वाचा आहे पाहा मंडळी.. फक्त आपण ग्राहकांनी यासाठी  शेवटपर्यंत लढा द्यायला हवा, मग   योग्य तो न्याय मिळतोच. 

परंतु  बोभाटाचा सल्ला असा आहे की, या निर्णयामुळे विमा घेण्याचे किती महत्व आहे हे सुद्धा लक्षात घ्या हो मंडळी. विमा असेल, तर जीवन सुरक्षित असेल. पण हो, विमा घेताना  पॉलिसीमधले नियम आणि अटी काळजीपूर्वक तपासा.  योग्य एजंट आणि विश्वासू कंपनीकडूनच विमा सुविधा घेणे हे ही तितकेच महत्वाचे आहे बरं.

सबस्क्राईब करा

* indicates required