computer

वयाच्या ९ व्या वर्षी पाय गमावणाऱ्या पठ्ठ्याने आफ्रिकेचं सर्वात उंच शिखर सर केलंय !!

केरळच्या अलुवा भागात राहणाऱ्या नीरज जॉर्ज बेबी नावाच्या तरुणासाठी १७ ऑक्टोबरचा दिवस फार महत्वाचा होता. त्याने आफ्रिकेचं सर्वात उंच शिखर माऊंट किलीमांजारो सर केलं. हे काम दोन पायांच्या माणसासाठी फार कठीण नाही, पण नीरजने वयाच्या ९ व्या वर्षी आपला पाय गमावला होता. विशेष म्हणजे शिखर सर करायला त्याने कृत्रिम पायाचा वापर केलेला नाही. केवळ कुबड्यांच्या सहाय्याने त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे.

नीरज ९ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या पायात कॅन्सरचा ट्युमर आढळून आला. उपचारांसाठी त्याचा पाय कापावा लागला, पण त्याने आपल्या जिद्दीच्या आधारे आपल्या अपंगत्वावर मात केली.

नीरजने बॅडमिंटन खेळ निवडला. बॅडमिंटनच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो खेळला. २००८ साली त्याने बॅडमिंटन डबल्स मध्ये सुवर्णपदक मिळवलं. ‘एशियन पॅरालिम्पिक कप’च्या बॅडमिंटन सिंगलमध्ये त्याने रौप्यपदक मिळवलं.

खेळांशिवाय त्याला ट्रेकिंगमध्ये रस आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या कुटुंबाला आपलं स्वप्न सांगितलं. त्याला आफ्रिकेचं सर्वात उंच शिखर माऊंट किलीमांजारो सर करायचं होतं. सुरुवातीला तर कुटुंबाला हे अशक्य वाटत होतं.

अर्थातच हे काम कठीण होतं. त्यात भर म्हणजे नीरजने ठरवलं की कृत्रिम पायांचा उपयोग करायचा नाही. हा वेडेपणा वाटू शकतो, पण नीरज म्हणतो की ‘कृत्रिम पायांपेक्षा कुबड्या जास्त आरामशीर वाटतात’.

नीरजने आपल्या स्वप्नावर ५ वर्ष मेहनत घेतली आणि अखेर ते पूर्ण केलं. नीरजला हे सिद्ध करायचं होतं की कृत्रिम पायांशिवायही अपंग व्यक्ती मनाप्रमाणे जगू शकते.

मंडळी, आपल्या सारख्या धडधाकट लोकांना नीरजकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्याच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळेल.

सबस्क्राईब करा

* indicates required