बार्बी डॉल आली आहे करोना काळात लढणाऱ्या खऱ्या दुर्गांच्या रुपात...कोणकोण आहेत या यादीत??
बार्बी डॉल ही जगातली सर्वात प्रसिद्ध बाहुली आहे यावर कुणीही शंका घेणार नाही. बार्बी डॉलची प्रसिद्धी मोठी आहे. बार्बी डॉल अनेकवेळा जगप्रसिद्ध महिलांच्या रुपात आणली जात असते. याआधी मरलीन मन्रो, बेयॉन्से, एलीनॉर रुझवेल्ट यांनी बार्बी डॉलच्या रुपात झळकण्याचा मान मिळाला होता. पण यावेळच्या बार्बी डॉल वेगळ्या आहेत.
नव्या बार्बी डॉल सहा महिलांच्या रूपात आल्या आहेत. त्यात ऑक्सफर्ड अस्त्रेझेनेकाची कोरोना लस बनविणाऱ्या सारा गिलबर्ट यांच्या रूपात बार्बी डॉल बनवण्यात आली आहे. एखाद्या शास्त्रज्ञाच्या रूपात बार्बी डॉल तयार होणे कदाचित पहिल्यांदाच झाले असावे.
सारा या ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ज्या सहा महिलांच्या रूपात बार्बी तयार करण्यात आल्या आहेत त्या सर्व कोरोना काळात योगदान देणाऱ्या आहेत. यात न्यूयॉर्कमधील पहिला कोरोना रुग्ण बघणाऱ्या ऍमी ओ'सलीयान, लास वेगास येथील डॉक्टर ऑड्री क्रुज, आरोग्य व्यवस्थेतील वर्णभेदभावाविरुद्ध लढणाऱ्या चिका स्टेसी, ब्राझील येथील बायोमेडिकल शास्त्रज्ञ जॅकलीन डी जीजस, त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी धुवून परत वापरता येईल असे गाऊन तयार करणाऱ्या किर्बी व्हाईट अशा सर्व कोरोना योद्ध्यांचा आगळावेगळा सन्मान करण्यात आला आहे.
या कठीण काळात अमूल्य योगदान देणाऱ्या या महिलांचे कार्य अधोरेखित व्हावे याचसाठी आम्ही या प्रकारचा प्रयोग केला असल्याचे बार्बी कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सारा गिरबर्ट यांनी देखील या निमित्ताने विज्ञानासारख्या क्षेत्रात करियर करण्याची प्रेरणा मुलींना मिळेल अशी आशा व्यक्त केली.
खर म्हणजे बार्बी डॉल लहानग्यांनामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्यांना जेव्हा या लोकांची माहिती होईल, तेव्हा इतरांच्या कामी येण्याची प्रेरणा आपसूक त्यांच्यात जागृत होईल.
आणखी वाचा:




