computer

आता भारतीय सैन्यातील कुत्रे कोरोन रुग्ण ओळखणार? काय आहे ही नवीन पद्धत?

२०२१ ची सुरुवात झाली आणि हळूहळू मागच्या वर्षी हैदोस घालणाऱ्या कोरोनाला काबूत आणण्यात यश येऊ लागले. लसीकरण सुरू झालेच आहे, पण आता या संक्रमणाचा शोध घेण्यासाठी नवीन पद्धत वापरली जाणार आहे. यासाठी खास प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर करण्यात येणार आहे. हे कुत्रेही अस्सल देशी जातीचे असणार आहेत. भारतीय लष्कराने काही कुत्र्यांना खास प्रशिक्षण देऊन या कामासाठी तयार केलं आहे.

भारतीय लष्कराचे लेफ्टिनंट कर्नल सुरिंदर सैनी यांनी या नव्या पद्धतीच्या प्रशिक्षणाबद्दल  माहिती दिली. ते स्वतः हे प्रशिक्षण देतात. चिप्पिपराई जातीचे हे कुत्रे आहेत. त्यांना कोरोना संक्रमणाचा शोध कसा घ्यायाचा याची ट्रेनिंग देण्यात आली आहे. जया, कॅस्पर आणि मणी अशी या कुत्र्यांची नावे आहेत. हे कुत्रे  कोरोना संक्रमणाचा शोध घेणार आहेत. कॅस्पर हा कॉकर स्पायनल जातीचा कुत्रा  आहे. तर जया आणि मणी हे तामिळनाडूच्या चिपिपाराई जातीचे कुत्रे आहेत. या श्वानांचे शरीर आणि पाय खूप लांब असतात. जया, कॅस्परला पूर्ण ट्रेनिंग देण्यात आली आहे. तर मणीला ट्रेनिंग दिली जात आहे.

घाम आणि मूत्राच्या नमुन्यांच्या आधारे कोरोना संक्रमणाचा शोध घेण्याची ट्रेनिंग या कुत्र्यांना देण्यात आली आहे. या कुत्र्यांना देण्यात आलेल्या नमुन्यांवर अतिनील किरणांचा (अल्ट्रा व्हायलेट) मारा केला जातो. त्यामुळे त्यांना व्हायरसचा धोका होत नाही, असं सैनी यांनी सांगितलं.

जया आणि कॅस्परला दिल्लीतील एका ट्रान्झिस्ट कँम्पमध्ये तैनात करण्यात आलं आहे. तिथे त्यांनी एक तासात १०० नमुने हुंगले. दर १५ मिनिटांनी त्यांना ५ मिनिटांचा ब्रेक देण्यात आला होता. जवळजवळ ३००० नमुन्यांचा या कुत्र्यांनी तपास केला. त्यात १८ नमुने पॉझिटिव्ह निघाले. जे सँपल पॉझिटिव्ह निघतात, त्याच्या बाजूला जाऊन हे कुत्रे बसतात. त्यावरून हे नमुने पॉझिटिव्ह असल्याचं ओळखता येतं.भारतीय लष्कराने सध्या ७ कुत्र्यांना ट्रेनिंग दिली आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांना दुसऱ्या परिसरातील टान्झिस्ट कँम्पमध्ये तैनात केलं जाईल.

भारताशिवाय इतर अनेक देशांतही  कोरोना व्हायरसचा शोध घेण्यासाठी कुत्र्यांचा वापर सुरु झालाय. या देशांमध्ये ब्रिटन, रशिया, फ्रान्स, जर्मनी, यूएई, फिनलँड, लेबनान, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना या देशांचा समावेश होतो.  कुत्र्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना विमानतळ, रेल्वे स्थानकांवर तैनात करून कोरोना संक्रमितांचा शोध घेतला जाणार आहे.

जगभरातून अजूनही कोरोना पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. पूर्णपणे या विषाणूवर विजय मिळवायला अजून किती काळ लागेल हे कोणी सांगू शकत नाही. पण असे नवनवीन प्रयोग कोरोनाला आळा घालण्यास नक्कीच मदत करतील.

 

लेखिका : शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required