computer

अरे बघता काय, एका निलंगेकरानं बुलेट ट्रॅक्टर तयार केलाय...कौतुक तर कराल!!

गरज ही शोधाची जननी म्हणतात. अनेक मोठमोठे शोध हे गरजेतूनच लागले. मग एखादा नवीन शोध घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती भक्कम पाहिजे असं नाही. त्यातलं पूर्ण शिक्षण पाहिजे असंही नाही. प्रसंगी चुकत, शिकत फक्त चिकाटीच्या जोरावरही मोठे यश मिळू शकते. याच गरजेतून आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्रातील एका तरुण व्यवसायिकाने एक भन्नाट शोध लावलाय. नेमका कोणता शोध? ते पाहूया.

मकबूल शेख असं या तरुण व्यवसायिकाचे नाव आहे. वय वर्षे ४३. लातूर जिल्ह्याच्या निलंगा शहरात त्यांचं शेती अवजारांचं वर्कशॉप आहे. फक्त सातवीपर्यंत शिकलेले मकबूल लहानपणापासूनच गॅरेजमध्ये काम करत आहेत. कसलंही तांत्रिक शिक्षण नसतानाही मकबूल शेख यांना ट्रॅक्टर रिपेरिंगचा अनुभव आहे. हे काम करतानाच त्यांना विविध प्रयोग करायचीही आवड आहे. यातूनच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी एक अनोखा बुलेट ट्रॅक्टर बनवला आहे.

अनेक शेतकऱ्यांना आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेती करायची असते, परंतु पैसे नसल्याने सगळ्यांनाच ट्रॅक्टर विकत घेता येत नाही. हीच गरज ओळखून मकबूल यांनी आयडियाची कल्पना लढवून हा बुलेट ट्रॅक्टर बनवलाय. तोही अगदी कमी किंमतीत. ५ हॉर्स पॉवरचा तीन चाकी आणि १० हॉर्स पॉवरचा चारचाकी असे दोन प्रकारचे बुलेट ट्रॅक्टर मकबूल यांनी बनवले आहेत. हा छोटा बुलेट ट्रॅक्टर शेतीच्या मशागतीची सर्व कामे करतो. अगदी दीड टनापर्यंत ट्रॉलीही ओढतो. १ लाख ६० हजारात सामान्य शेतकऱ्यांच्या मदतीला उपलब्ध होणारा हा ट्रॅक्टर पेरणी, कोळपणी, फवारणी, नांगरणी याबरोबरच शेतातली सगळी कामं सहजपणे करतो. बाजारात जो मोठा ट्रॅक्टर असतो त्याची किंमत साधारण ९ ते १० लाख असते.

मकबूल यांना एक ट्रॅक्टर बनवायला फक्त ८ दिवस लागतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या बुलेट ट्रॅक्टरचे सर्व पार्ट उघडताही येतील म्हणजे काही दुरुस्ती असल्यास ते स्वतः करू शकतील. अश्या सोप्या पद्धतीने हा ट्रॅक्टर बनवला आहे. यामध्ये क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीचे इंजिन वापरण्यात आले आहे.

बैलजोडीपेक्षाही कमी किमतीत हा ट्रॅक्टर असल्याने अनेक शेतकऱ्यांत तो खूप लोकप्रिय झाला आहे.  महाराष्ट्रासह परराज्यांतूनही या ट्रॅक्टरला वाढती मागणी आहे. मकबूल शेख यांनी १० हॉर्स पॉवरचे आतापर्यंत १४० बुलेट ट्रॅक्टर विकले आहेत. गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, नेपाळमधल्या काही शेतकऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधून नोंदणीही केली आहे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून या तरुण संशोधकाला या ट्रॅक्टरसाठी पुरस्कारही मिळालाय. आता या व्यवसायाला मकबूल शेख व्यवसायिक स्वरूप देण्याच्या तयारीत आहेत.

दे धक्का सिनेमा आठवतोय का? शिक्षण कमी, पैशांची कमतरता पण अक्कल हुशारीच्या जोरावर एक तरुण पेट्रोल कमीत कमी वापरलं जाईल असं मशीन तयार करतो. मकबूल शेखकडे बघून याच कथेची आठवण येते. मकबूल शेखचा हा बुलेट ट्रॅक्टर सामान्य शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरेल यात शंका नाही.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required