आता वाहनांची कागदपत्रं ठेवा घरी : पोलीसांना दाखवा मोबाईल ! 

अत्यंत अर्जंट काम निघालंय, एखाद्या ठिकाणी तातडीने पोहचायचंय.. आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला अडवून ट्राफिक पोलिस कागदपत्र मागतो. आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी आपण ती घरी विसरलेलो असतो. आपल्यापैकी बहुतेक जणांना हा वाईट अनुभव आला असेल. त्यात ही सगळी ढिगभर कागदपत्रं सोबत घेऊन फिरणं म्हणजे एक कटकटच असते राव! पण लवकरच यातून तुमची-आमची सुटका होणार आहे बरं का.. 

           तर,  तुमच्या वाहनाचं रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट म्हणजेच आर.सी. बुक, ड्रायव्हिंग लायसन्स, विमापत्र, पियुसी, अशी तमाम कागदपत्रं आता तुमच्या मोबाईलमधल्या अॅपमध्ये उपलब्ध होत आहेत. नुकतंच सरकारने लॉन्च केलेलं 'एम-परिवहन' नावाचं हे अॅप वाहनाशी संबंधित तुमची सगळी कागदपत्रं अॉनलाईन स्टोअर करेल, ज्यामुळे तुम्हाला ती कधीही, कुठेही स्मार्टफोनमध्येच उपलब्ध होतील.  ट्रॅफिक पोलिस आला की लग्गेच  या अॅपमधली तुमच्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी  दाखवायची की काम फत्ते!!  हो , पण हे ऍप वापरण्यासाठी तुम्हाला अॅपवर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. म्हणजेच आधार कार्ड नसेल तर आताच ते बनवण्यासाठी अर्ज देऊन टाका.  सद्या या अॅपचा वापर दिल्ली आणि तेलंगणामध्ये प्रायोगिक स्तरावर सुरू झालाय. लवकरच ही सुविधा देशभर उपलब्ध होईल. 

        सरकारनं तशीही डिजिलॉकर ही सेवा आधीच देऊ केलीय. त्यामुळे तिथेही आपली महत्वाची इतर कागदपत्रेही डिजीटली सेफ  ठेऊ शकतो. आता कागदपत्र विसरायची आणि हरवायची काळजीच मिटली. पण खरंच.. बातमी वाचून डोकं हलकं वाटतंय बुवा ! चला मग देशासोबत आपणही 'डिजीटलाईझ' होऊया..

सबस्क्राईब करा

* indicates required