computer

नोकियाने एरिक्सनचा कसा पराभव केला याची कथा आज वाचूया !

सोबतच्या चित्रात तुम्हाला ' नोकीया' कंपनीचा नवा लोगो दिसतो आहे.लक्ष देऊन बघितलंत तर या लोगोत 'नोकिया'चा मोबाईल फोन दिसत नाहीय्ये.आपण नोकीयाला ओळखतो ते मोबाईल फोनमुळेच ,नाही का ? सत्यस्थिती अशी आहे की नोकीया आता मोबाईल बनवतच नाही.त्यांनी मोबाईलचा धंदा कायमचा बंद करून टाकला आहे. ब्रँड विकून ते मोकळे झाले आहेत. असं जर असेल तर हा नवा लोगो कशासाठी तर आमची कंपनी आता फक्त 'टेक्नॉलॉजी कंपनी आहे असं त्यांना सांगायचं आहे. येत्या काळात वापरल्या जाणार्‍या 5G तंत्रज्ञानासाठीच आता नोकीया काम करणार आहे.

पण हे सगळं सांगायचा आमचा हेतू वेगळाच आहे आणि तो असा की ज्या कंपन्या बदलतात त्याच फक्त तगून राहतात. ज्या हट्टाने आपल्याच विचाराला चिकटून राहतात त्या संपून जातात. नोकीयासाठी हे काहीही नवे नाही. एकेकाळी नोकीया आणि एरिक्सन या दोन कंपन्या मोबाईल फोनच्या बाजारपेठेवर वर्चस्वासाठी झगडत होत्या. आजच्या तारखेस नोकीया शिल्लक आहे पण एरिक्सन कधीच डब्यात गेली आहे.चला तर वाचूया नोकियाने एरिक्सनचा कसा पराभव केला याची कथा!

जर तुम्ही व्यवस्थापनाचा अभ्यास करत असाल तर  हे एक अत्यंत गाजलेले  प्रकरण वाचायलाच हवे.
२००० साली नोकिया आणि एरिक्सन ह्या दोन्ही मोबाईल कंपन्या एकदम टॉपला होत्या. फिलिप्स कंपनी ह्या दोन्ही कंपन्यांना ज्याला  मोबाईलचा आत्माच म्हणता येईल अशा मायक्रोचिप्सचा पुरवठा करत असे. ह्याच फिलिप्स कंपनीच्या मेक्सिको मधल्या एका चिप्स प्लॅन्टला प्रचंड मोठी आग लागली. त्याचा परिणाम असा झाला 
की  ह्या दोन्ही कंपन्यांचा  चिप्सच्या पुरवठा बंद पडला .सोबतच नोकिया आणि एरिक्सन ह्या दोन्ही बलाढ्य कंपन्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला.
आपत्ती आली तर त्यातून मार्गही काढावाच लागतो. एखादी दुर्घटना घडल्यावर त्याचे व्यवसायावर होणारे संभाव्य परिणाम ताडणे. त्यावर काम करून आपल्या कंपनीला
नुकसानीची कमीतकमी झळ लागू देणे आणि त्यातून तरण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणे हे व्यवस्थापकीय मंडळाकडून अपेक्षित असते
ह्या अनपेक्षित संकटाचा मुकाबला करताना दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापकांनी दोन अगदी विरुद्ध टोकाचे निर्णय घेतले. 
नोकियाने चिप्ससाठी नवनवीन विक्रेत्यांना शोधून त्यांच्याशी त्वरित संपर्क साधला.तसेच स्वतःच्या मोबाईलमध्येही काही तांत्रिक बदल केले जेणेकरून त्यांना अमेरिकन आणि जपानी चिप्स विक्रेत्यांची ही मदत मिळाली.


 

पण एरिक्सन व्यवस्थापन गाफील राहिले.आपल्या कंपनीला मोठे नुकसान होणार नाही, अशा आशेवर बसून राहिले. फक्त चिप्ससाठी  एकाच पुरवठ्यावर स्त्रोतावर अवलंबून राहिल्याने त्यांना कधीही भरून न येणारी खूप मोठी हानी सोसावी लागली.उत्पादन थांबले. एरिक्सनचे हेच पाऊल नोकियाच्या फायद्याचे ठरले. संपूर्ण बाजारावर नोकियाचाच अंमल प्रस्थापित झाला.कालांतराने एरिक्सनच्या मोबाईलच्या धंद्याचे दिवाळे वाजले. एरिक्सन्चा मोबाईल बनवणारी उपकंपनी सोनीमध्ये विलीन झाली. मोबाईलच्या बाजारातून एरिक्सन हे नाव कायमचे पुसले गेले.
नंतरच्या काळात मोबाईलच्या मार्केटमधून नोकीयाला पण बाहेर पडावे लागले पण तो निर्णय वेळीच घेतलेला शहाणपणाचा निर्णय होता.

मोबाईल हँडसेट्चे उत्पादन बंद होऊनही नोकीया फायद्यातच राहिली. इतिहास अनेकवेळा बरेच काही शिकवत असतो. म्हणूनच असे म्हणतात की पुढच्यास ठेच मागचा शहाणा.नोकीया शहाणी होती. 

 

आता हे वाचून आपण काय शिकायचे ? 
ह्यातून दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
१. व्यवस्थापनाने कुठल्याही आकस्मिक आपत्तीसाठी कायम तयार राहायला हवे.
२. व्यवस्थापन मंडळ नवनवीन कल्पना आत्मसात करण्यासाठी तयार हवे.

सबस्क्राईब करा

* indicates required