computer

टिपू सुलतानाची खापरपणती जगात कशासाठी प्रसिद्ध आहे?

१७९९मध्ये श्रीरंगपट्टणमला टिपू सुलतानाचा मृत्यू झाला. त्याला म्हणे बारा मुलं होती आणि त्यांना टिपूच्या पाडावानंतर ब्रिटिशांनी कलकत्याच्या टोलीगंजमध्ये हलवलं. एका बातमीनुसार आता त्या बाराजणांपैकी खूप कमीजणांच्या पुढच्या वंशजांबद्दल माहिती उपलब्ध आहे. आणि जे सध्या हयात आहेत, तेही खूप हलाखीचं आणि गरीबीचं जिणं जगत आहेत.

पण या टिपू सुलतानाला कासिमबी नावाची मुलगीही होती. अगदी सिनेमात दाखवतात तसं टिपूच्या दोन अधिकार्‍यांनी तिला पळवलं. तिची ओळख लपवली.  सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि योग्य वेळ आल्यावर ज्याच्याकडे राजचिन्हं आहेत अशा पुरूषाशी तिचा निकाह लाऊन दिला. अर्थातच तेव्हा त्याला आपली पत्नी कोण आहे हे सांगण्यात आलं होतं. कासिमबी आणि तिचा नवरा मौला बख्श बडोद्याला स्थायिक झाले. पुढे या दोघांचा एक नातू –इनायत खान- सूफी पंथाच्या प्रसारासाठी युरोपात गेला आणि तिकडेच राहिला.  आपण बोलत आहोत या इनायत खानांच्या एका मुलीविषयी- नूरून्निसा इनायत खानविषयी.

तर ही नूरून्निसा , जिला सगळं जग नूर म्हणून ओळखतं, होती पहिली महिला वायरलेस रेडिओ ऑपरेटर. दुसर्‍या महायुद्धात ती जर्मनीविरूद्ध ब्रिटिशांच्या बाजून्म लढली. आहे ना गंमत.. टिपू इंग्रजांच्या विरोधात लढत मरण पावला तर त्याच्याच खापरपणतीनं इंग्रजांच्या बाजूनं युद्ध लढलं. ती तर चक्क युद्धातली गुप्तहेर बनली. शत्रूच्या हाती सापडली पण त्यांना काहीही माहिती दिली नाही. नूर वयाच्या तीशीच्या आतच मरण पावली पण आपल्या कार्यानं सगळ्यांच्या स्मरणात राहिलीय. चला वाचा तर मग, काय आहे तिची कहाणी..

जन्म आणि पालनपोषण

(डाव्या बाजूला उभी असलेली मुलगी नूर आहे)

नूरचे बाबा इनायत खान हे सूफी पंथाचे अनुयायी तर आई ओरी बेकर ही एक अमेरिकन होती. नूरचा जन्म झाला मॉस्कोमध्ये पण तिचं शिक्षण  झालं फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये. ती एक अतिशय प्रेमळ स्वभावाची मुलगी होती. तिला कविता करायला, लहान मुलांसाठी गोष्टी लिहायला आणि वीणा वाजवायला पुष्कळ आवडत असे.  त्यांच्या घरचं वातावरण बरंचसं रूढी-परंपरावादी मुस्लिमांच्या घरी असेल असंच होतं. खरंतर तिचं तिच्या नात्यातल्या बडोद्यातल्या एका तरूणाशी लग्नही ठरलं होतं आणि आपलं पुढचं आयुष्य संसार , मुलंबाळं असंच असेल असं तिलाही वाटलं होतं.

दुसरं महायुद्ध

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीनं फ्रान्सवर हल्ला केला तेव्हा हे कुटुंब देश सोडून गेलं. नूर एक स्वयंसेवक म्हणून ब्रिटिश सेनेत सामील झाली. ज्या फ्रान्समध्ये आणि पॅरिसमध्ये ती वाढली, त्या देशाला तिला  मदत करायची होती. युद्ध तर चांगलंच पेटलं होतं. अशा वेळेला सेनेला अधिक धोकादायक आणि प्रत्यक्ष युद्धावर पुरूषांना पाठवणं गरजेचं होतं. म्हणून तुलनेनं कमी धोकादायक कामं स्त्रियांना द्यावी म्हणून वीमेन्स ऑक्झिलरी एअर फोर्स (W.A.A.F)ची निर्मिती करण्यात आली. स्वत: राणी एलिझाबेथ या सेनेची प्रमुख होती.

१९४०मध्ये नूर या सेनेची सदस्य झाली. तिला मग वायरलेस यंत्रणा चालवण्याचं शिक्षण देण्यात आलं. ती मोर्स कोड, संदेश सांकेतिक भाषेत पाठवणे हे सगळे प्रकार इथं शिकली. फ्रान्समध्ये बरीच वर्षं राहिल्यानं नूरची फ्रेंच भाषेवर चांगलीच पकड होती. ब्रिटिश सेनेने याचाच फायदा घ्यायचं ठरवलं. पंतप्रधान विन्सटन चर्चिल यांनी स्वत: एक छोटंसं गुप्तमंडळ बनवलं होतं आणि नूर त्याची सभासद होती.

तीन वर्षांतच नूर या गुप्तहेराच्या कामात चांगलीच तयार झाली.

फ्रान्समधली कामगिरी

(नूरच्या स्मृतीप्रीत्यर्थ लंडनमध्ये एक संस्था उभारण्यात आलीय, तिथला हा तिचा पुतळा)

१९४३च्या जूनमध्ये तिला फ्रान्समध्ये पाठवण्यात आलं. नूर तिच्या कामात तरबेज असली तरी बरेचदा घाईत चुका करत असे आणि तिला खोटं बोलता येत नसे. नूर हे नांव परदेशात  पटकन ओळखता येण्यासारखं असल्यानं आणि ओळख बाहेर फुटली तर तिच्या इतर कुटुंबियांना त्रास होईल म्हणून तिनं ’नोरा बेकर’ हे नांव घेतलं होतं. नूरचं काम होतं फ्रान्समध्ये इतर हेरांच्या संपर्कात राहाणं आणि त्यांचे संदेश इंग्लंडला पाठवणं. तसंच आलेले संदेश तिथल्या हेरांपर्यंत पोचवणं.

अर्थातच हे काम सोपं नव्हतं. असे वायरलेस ऑपरेटर्स खूप कमी होते त्यामुळं शत्रूंच्या फौजा अशा संदेशांच्या सतत मागावर असत. त्यामुळं नूरला संदेश पाठवण्याच्या जागा सतत बदलाव्या लागत. ते यंत्रही मोठं आणि अवजड होतं. त्यामुळं पोलिसांच्या नजरेत न येता ते घेऊन फिरणंही धोक्याचं होतं. नूरचे इतर साथीदार  तर खूप लवकर पकडले गेले आणि नूर जर्मन गेस्टापोंना (पोलिस) गुंगारा देत जागा बदलत राहिली.

फितुरीची बळी

नूरच्या एका सहकार्‍याच्या बहिणीला नूरबद्दल इर्ष्या वाटत असे. असं म्हणतात की, तिनेच नूरबद्दलची माहिती आणि ठावठिकाणा पोलिसांना दिला. नूरला १९४३च्या ऑक्टोबरमध्ये पकडण्यात  आलं, तिचा छळ करण्यात आला. तिनं दोनदा पळून जाण्याचाही प्रयत्न केला, पण त्यात ती अपयशी ठरली. सहा-सहा गेस्टापो मिळून तिची चौकशी करत होते पण ते तिच्या मूळ नावापर्यंतही पोचू शकले नाहीत.

तिच्या घरी पोलिसांना तिची डायरी मिळाली ज्यात तिनं तिच्या सर्व नोंदी ठेवल्या  होत्या. या डायरीनंही नूरचा बराच घात केला. त्या डायरीच्या आधारे पोलिसांनी इतर  ब्रिटिश हेरांनाही पकडलं.

मृत्यू

 

नूरला एक वर्ष जर्मन पोलिसांनी कैदी म्हणून ठेवलं. त्यानंतर तिला १९४४च्या सप्टेंबरमध्ये डाखाऊच्या छळछावणीत हलवण्यात आलं. हिटलरनं अशा बर्‍याच छळछावण्या उभारल्या होत्या. तिथं त्यानं हजारो-लाखो निरपराध ज्यू आणि इतर लोकांना मारलं होतं. प्रचंड उपासमार, कोंदट आणि छोट्या कोठड्यांतून कोंबून भरलेली माणसं, असं त्या छळछावण्यांचं स्वरूप असे.

या छळछावणीत नूरचे पुन्हा एकदा हालहाल करण्यात आले. कडाक्याच्या थंडीत तिला नग्न करून तिथल्या सैनिकांनी तिला बुटांनी लाथा घातल्या. रात्रभर तिचा छळ केला आणि १३ सप्टेंबर १९४४च्या पहाटे तिच्या डोक्यात गोळी घालून तिला मारण्यात आलं. असं म्हणतात, की मरताना तिनं  ’लिबेर्ते’ (स्वातंत्र्य) असा पुकारा केला होता. मरताना तिचं वय अवघं ३० वर्षांचं होतं. एवढ्याशा त्या आयुष्यात तिनं शत्रूच्या प्रदेशात जाऊन अत्यंत धोकादायक असं काम केलं होतं.

सेंट जॉर्ज क्रॉस आणि फ्रान्स सरकारचा वॉर क्रॉस पुरस्कार

नूरच्या या बहादुरीसाठी फ्रान्स सरकारनं तिला मरणोत्तर ’वॉरक्रॉस’ हा किताब दिला तर ब्रिटन सरकारनं ’क्रॉस सेंट जॉर्ज’ हा पुरस्कार दिला. आजवर’क्रॉस सेंट जॉर्ज’ हा पुरस्कार फक्त तीन माहिलांनाच मिळालाय.

या बहादुर मुलीला बोभाटा.कॉमकडून सलाम!!

सबस्क्राईब करा

* indicates required