computer

काय असते इंटरपोलची 'रेड कॉर्नर नोटीस' ?

आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगाराला जेरबंद करण्यासाठी काही कायदेशीर संकेत असतात. याला प्रत्यर्पण करार म्हणतात. या करारांची अंमलबजावणी अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असते. त्यामुळे विजय मल्या, नदीम सैफी, ललित मोदी यांच्या सारखे आरोपी उजळ माथ्याने फिरत असतात. बऱ्याचवेळा आरोपी कुठे आहे याचा पत्ताच नसतो. अश्यावेळी इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संस्था गुन्हेगाराला पकडण्यात मदत करते.

आजच निरव मोदी विरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. या निमित्ताने आपण बघुयात इंटरपोल विविध नोटिस जारी करून कश्या पद्धतीने गुन्हेगारांपर्यंत पोहोचते.  

रेड कॉर्नर नोटीस

इंटरपोलची ही नोटीस गुन्हेगाराचा पत्ता  मिळवून, गुन्हेगाराला तात्पुरते ताब्यात घेऊन - ज्या देशात गुन्हा घडला असेल त्या सदस्य देशाच्या पोलीसांच्या ताब्यात गुन्हेगाराला देण्यासाठी बजावली जाते.आजच्या तारखेस १८८ सदस्य असलेल्या इंटरपोल या संस्थेनी  आठ हजारहून अधिक गुन्हेगारांच्या प्रत्यपर्णासाठी नोटीसा बजावल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की यादीत भारतीय अग्रेसर आहेत. २०११ च्या आकडेवारीनुसार एकूण ३६९ भारतीय इंटरपोलच्या "लूक आउट' नोटीस वर आहेत.

ब्ल्यू कॉर्नर नोटीस

ब्ल्यू कॉर्नर नोटीस ही चौकशीची नोटीस असते. आरोपीला शोधून त्याची ओळख पटवून जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. ललित मोदी याच्यावर ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती.

येलो नोटीस

हरवलेल्या व्यक्तींच्या, विशेषतः हरवलेल्या लहान मुलांच्या शोधार्थ किंवा अशा व्यक्ती ज्यांना स्वतःची ओलख पटवून देणे कठीण आहे, अशा काही लोकांसाठी जारी केली जाते. शरीरावर असलेल्या  खूणांची, जन्मखूणांची माहिती ओळख पटवण्यासाठी येलो नोटीस मध्ये दिली जाते.

 

 

ब्लॅक नोटीस

युध्द -यादवी- अतिरेकी हल्ला - अशा घटनांमध्ये विदेशी नागरीकांचा काहीवेळ मृत्यु ओढवतो. अशा मृत व्यक्तींच्या  प्रेतांची ओळख पटवण्यासाठी ब्लॅक नोटीस जारी करण्यात येते.

 

स्रोत

ग्रीन नोटीस

या नोटीशीद्वारे अशा गुन्हेगारांची माहिती देण्यात येते की जे गुन्हे वारंवार घडू शकतात. उदाहरणार्थ : बलात्कारासरखे  लैंगीक गुन्हे.

ऑरेंज नोटीस

सर्व सामान्य जनतेला धोक्याच्या घटनांची - धोकादायक वस्तूंबद्द्ल माहिती पुरवणारी ही नोटीस असते. उदाहरणार्थ - कॅन्सर सारखा आजार एका चुटकीत बरा करणार्‍या औषधांची जाहिरात किंवा एका आठवड्यात १५ किलो वजन घटवणार्‍या जादूई गोळ्यांची जाहिरात !

पर्पल नोटीस

आंतरराष्ट्रीय  गुन्हेगारांच्या गुन्हा करण्याच्या पध्दती आणि गुन्हे लपवण्याच्या पध्दती यावर प्रकाश टाकणारी नोटीसला  पर्पल नोटीस म्हटले जाते. पर्यावरणाविरोधी कारवाय करणार्‍या टोळ्यांना अटकाव करण्यासाठी या नोटीसचा फायदा होतो.

सबस्क्राईब करा

* indicates required