computer

अमेरिकेने भारतावर दबाव टाकून नंदादेवीवर नेलेले एका अणुबॉम्बइतके प्लुटोनियम कुठे गेले?अजून उलगडा न झालेले हे घातक रहस्य आहे तरी काय?

आजची कथा तुम्हांला 'नंदादेवी' नावाच्या एखाद्या हॉलिवूड सिनेमाची काल्पनिक चित्तरकथा आहे की काय असे तुम्हाला वाटेल. पण ही शंभर टक्के सत्यकथा आहे. इतकेच नव्हे तर या १९६५ ते ६७ या काळात नंदादेवी  शिखरावर घडलेल्या अनर्थातून आपण भारतीय वाचलो हा केवळ दैवी योगायोग आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

पण मंडळी, ही कहाणी इतकी गुंतागुंतीची आहे. ती सविस्तरच सांगायला हवी!

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेकडे अणुबाँब आहेत आणि ती ते वापरु शकते हे सगळ्यांनाच कळले. अमेरिकेने हा आण्विक शस्त्राचा भस्मासुर निर्माण तर केला, पण तिला एका चिंतेने ग्रासले होते. चिंता अशी होती की सोव्हिएत रशिया चीनच्या आण्विक कार्यक्रमाला मदत देत असल्याची माहिती  अमेरिकन गुप्तहेर खात्याला मिळाली होती. अमेरिकेने CHIC-1 या कोडवर्डखाली चीनच्या इलेक्ट्रॉनिक ब्लास्टबद्दल माहिती जमा करायला सुरुवात केली होती. पण १९५९ नंतर रशियाने चीनला करत असलेली मदत बंद केली. आता चीन ताबडतोब अण्वस्त्र तयार करू शकणार नाही असा अमेरिकेचा ग्रह झाला आणि CHIC-1च्या फायली अडगळीत जमा झाल्या. पण ऑक्टोबर १९६५ मध्ये या समजाला चीनने पहिला अणुविस्फोट करून जबरदस्त धक्का दिला.

 

सीआयएला पुन्हा खडबडून जाग आली. त्यांनी पुन्हा जुळवाजुळव करून प्रोजेक्ट 596  या कोडवर्डखाली चीनच्या अणुकार्यक्रमाची माहिती गोळा केली. तंत्रज्ञानात चीन खूप पुढे गेले होते. आता फक्त एकच पायरी शिल्लक होती, ती म्हणजे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राची निर्मिती!! पहिला अणूविस्फोट केल्यावर आठच महिन्यात चीनने हा कार्यक्रम पण सफलरित्या पार पडला. आता चीनने इतके सगळे केले म्हटल्यावर अमेरिकेला चीनवर नजर ठेवण्याची अधिकच गरज निर्माण झाली. पण त्यावेळी म्हणजे साठच्या दशकात चीनवर नजर ठेवणारे पुरेसे उपग्रह पण अमेरिकेकडे नव्हते. ते जाऊ द्या,  चीनमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करणारे गुप्तहेरांचे जाळे पण नव्हते. अशा परिस्थितीत चीनच्या आण्विक कार्यक्रमावर नजर ठेवायला काय करावे ही मोठी समस्या अमेरिकेसमोर होती.

याच दरम्यान दोन माणसांची केवळ योगायोगाने भेट झाली.  ही भेट निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल, कारण त्यांचे कार्यक्षेत्र अगदी वेगवेगळे होते. बॅरी बिशप आणि कर्टीस लीमे या दोन माणसांची भेट एका पार्टीत झाली. बॅरी बिशप हा पट्टीचा गिर्यारोहक होता तर कर्टीस लिमे पेंटागॉनचा एक ज्येष्ठ अधिकारी. एव्हरेस्टवर झेंडा रोवणाऱ्या पहिल्या अमेरिकन पथकात बॅरी बिशप होता. नॅशनल जिओग्राफीकने हबर्ड मेडल देऊन त्याचा गौरव केला होता. पार्टीत गप्पा मारताना एव्हरेस्टच्या शिखरावर उभे राहिल्यावर नजरेसमोर चीनचा संपूर्ण पश्चिमेचा इलाका नजरेस येत होता असे बॅरी बिशपने म्हटल्यावर कर्टीस लिमेला एक कल्पना चमकली.

इथे सुरू झाला ऑपरेशन नंदादेवी पहिला अंक !

(बॅरी बिशप)

भारतात त्यावेळी थोडी वेगळीच स्थिती होती. १९६२ सालच्या युद्धात चीनने आपला पराभव केला होता आणि दुसरीकडे पाकिस्तानी आक्रमणाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. सीआयएने या स्थितीचा नेमका फायदा घेत आपल्या सरकारसमोर एक प्रस्ताव ठेवला. "भारतीय आणि अमेरिकन गिर्यारोहकांचे एक पथक नंदादेवी शिखरावर गस्तयंत्रणा म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स सिस्टम उभी करेल आणि त्यामधून मिळणाऱ्या सिग्नलमधून चीनच्या आण्विक कारवायांवर नजर ठेवली जाईल". भारतासमोर फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. याचा फायदा अमेरिकन सरकारने घेतला असेच आता म्हणावे लागेल. यासोबतच सुरू झाला या कथेचा पुढचा नाट्यमय अंक!!

आता सीआयएने हिमालयात जाणाऱ्या गिर्यारोहकांची एक टीम बनवली. दरमहा १००० डॉलरच्या पगारावर हे गिर्यारोहक भारतात आले आणि कामाला सुरुवात झाली. या मोहिमेचे नेतृत्व इंडो तिबेट बॉर्डर पोलीसच्या मनमोहनसिंग कोहली यांच्याकडे सोपविण्यात आले होते. एकूण २०० जणांच्या या टीममध्ये इंडो तिबेट बॉर्डर पोलीस(ITBP) चे पोलीस, शेर्पा आणि अमेरिकन गिरीरोहक यांचा समावेश होता.  टीमचे उद्दिष्ट होते नंदादेवीच्या शिखरावर सर्व्हेलन्स सिस्टम स्थापन करणे!

काय होतं या इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स डिव्हाईस मध्ये ?

एकूण ५६ किलो सामान होतं. यात आठ ते दहा फूट उंचीचे एरियल, दोन ट्रान्सरिसीव्हिंग सेट आणि ही सर्व यंत्रणा बिनधोक वर्षानुवर्षं चालत रहावी म्हणून एक बॅटरी सेट. अगदी निरुपद्रवी वाटते ना ही यादी? पण मंडळी, ही बॅटरी म्हणजे एव्हरेडीचे सेल नव्हते.  ही बॅटरी  System for nuclear auxiliary power (SNAP) म्हणजे प्लुटोनियमच्या सात सेलवर चालणारी यंत्रणा होती. अजूनही गांभीर्य लक्षात आले नसेल तर थोडं विस्ताराने सांगतो. प्लुटोनियम हे अणुबॉम्ब आणि अणुभट्टी दोन्हीमध्ये वापरले जाणारे आण्विक इंधन आहे. नियंत्रणात असेल तर इंधन, आणि नियंत्रण सुटले तर अणुबॉम्ब ! नंदादेवीवर ठेवल्या जाणाऱ्या या बॅटरीतले प्लुटोनियम नागासाकी हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बच्या अर्ध्याइतके होते. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हातात असलेल्या या धोकादायक बॅटरीची कल्पना काही लोक सोडले, तर कोणालाच नव्हती.

१८ ऑक्टोबरला ही जोखीम घेऊन सर्वजण नंदादेवी शिखराच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचले आणि अचानक झंझावाती हिमवादळाला सुरुवात झाली. हिमालयातले बर्फाचे तांडव सुरू झाल्यावर एकच पर्याय शिल्लक होता, एकतर टीमच्या सदस्यांचे जीव वाचवा किंवा सर्व्हेलन्स युनिट ... बेसकॅम्पवरून अमेरिकन मंडळी युनिट वाचवा असा आग्रह करत होती. पण तो बोजा घेऊन सुखरूप माघारी येणे केवळ अशक्यच होते. मनमोहनसिंग यांनी आपल्या सदस्यांना वाचवण्याचा निर्णय घेतला.

ते युनिट बसवण्यास टीम अयशस्वी ठरली. टीममधल्या लोकांचा जीव वाचला पण प्लुटोनियमच्या सात कॅपसूल मात्र या हिमप्रपातात कुठे नाहीशा झाल्या ते कधीच कळलं नाही. त्या सात कॅपसूल म्हणजे सात अणुबॉम्ब होते! जर अपघाताने उघडल्या गेल्या तर किरणोत्सर्गी प्लुटोनियम वाहणाऱ्या झऱ्यांतून, गंगेच्या प्रवाहातून पसरून गंगेच्या पात्रातून किरणोत्सर्ग सर्वत्र पोहचला असता आणि शेवट होता फक्त मृत्यू आणि मृत्यू! प्लुटोनियमचे 'हाफ लाईफ' १०० वर्षांचे असते. म्हणजे हा धोका आजही हिमालयाच्या पोटात कुठेतरी लपला आहे. या घटनेनंतर नंदादेवी परिसर दहा वर्षे बंद केला गेला होता.  मनमोहन सिंग कोहली आणि त्यांची टीम पुढची तीन वर्षे ऋषी गंगेचे पाणी तपासून बघत होते. किरणोत्सर्गाचा कुठेही मागमूस नव्हता म्हणजे कॅप्सूल अजूनही हिमालयाच्या पोटात शाबूत होत्या. त्या प्लुटोनियमच्या बॅटरीची नक्की काय अवस्था होती ते आजवरही कळलेलं नाही, पण काय झालं असेल याचा अंदाज देणारी घटना त्यापुढच्या वर्षात घडली.

पहिली मोहीम अयशस्वी झाल्यावर अमेरिकन मंडळी दुसरं ठिकाण शोधण्याचा मागे लागली. १९६६ साली नंदादेवी ऐवजी नंदकोट या शिखरावर सर्व्हेलन्स युनिट ठेवण्यात आले. पुन्हा एकदा प्रयत्न करून प्लुटोनियम बॅटरीसकट सर्व्हेलन्स युनिट एक आसरा तयार करून स्थापित करण्यात आलं. सर्वांनी एक सुटकेचा सुस्कारा सोडला. पण काही महिन्यातच ही यंत्रणा बंद पडली. पुन्हा एकदा मनमोहन कोहली फौजफाट्यासकट नंदकोटवर पोहचले. इथे त्यांच्यासाठी एक मोठे आश्चर्य त्यांची वाट बघत होते.

प्लुटोनियमच्या बॅटरीतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे एक आठ फुटाचे गोलाकार विवर(अतिशय खोल खड्डा) तयार झाले होते.  या विवराच्या तळाशी बॅटरी चालू होती,  पण बाकी यंत्र सामग्री त्या विवरात कुठेतरी नाहीशी झाली होती. नंदकोटवरच्या या प्रकारावरून नंदादेवीवर असलेल्या प्लुटोनियम कॅप्सूल अशाच हिमालयाच्या गर्भात नाहीशा झाल्या असतील हा केवळ एकच अंदाज आता आपण करू शकतो. बाकी पुढची पाऊणशे वर्षं अशीच निर्धोक जातील हा केवळ आशावाद आता शिल्लक आहे.

या सर्व घटना बरीच वर्षं गुप्ततेच्या पडद्याआड गेल्या होत्या.  पण १९७७ साली हे बिंग फुटले. अशा तर्कट साहसाचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला. संसदेत मोरारजी देसाईंनी हा अपघात झाल्याचे मान्य केले. आजही कुठेतरी उत्सर्जनाचे घड्याळ टिकटिकत असेलच!!!

सबस्क्राईब करा

* indicates required