'चांगल्या वागणूकीचे फळ', रिक्षावाल्याला मिळेल करोडोंची संपत्ती. प्रकरण काय आहे ते तर पाहा!!

एकट्या वृद्ध लोकांना गरज असते ती आधाराची, एका विश्वासाची! काही कारणामुळे त्यांच्यावर एकटे राहायची वेळ येते आणि मग खरी परवड सुरू होते. वाढत्या वयामुळे अनेक कामे करणे शक्य होत नाही आणि कोणी मदतीलाही येत नाही. शहरांत तर ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकटे वृद्ध पाहून त्यांच्याशी सलगी करून त्यांची संपत्ती लुटायची, प्रसंगी त्यांचा खूनही करायचा अशा प्रकारचे अनेक गुन्हे आपण वाचतो. पण जगात आजही माणुसकी आहे याची प्रचिती देणारी एक गोष्ट नुकतीच घडली आहे. ६३ वर्षांच्या आजींना एका रिक्षाचालकाच्या कुटुंबाने आधार दिला. आणि त्या आजीनी त्यांची करोडोची संपत्ती त्या रिक्षाचालकांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओडिशातील कटक शहरातील सुताहत भागात ६३ वर्षे वयाच्या मिनाती पटनायक राहतात. त्यांनी कोर्टात कागदपत्रांवर स्वाक्षरी केली, ज्यावर लिहिले आहे की ती तिची सर्व संपत्ती स्वतःच्या इच्छेने रिक्षाचालकाला दान करत आहे. ही बातमी शहरात पसरताच मिनाती यांच्या कामाचे कौतुक होत आहे. बुद्धा समल असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

मिनाती यांच्या पतीचे २०२० मध्ये निधन झाले आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलीचेही २०२१ मध्ये निधन झाले. मिनाती यांच्यासोबत झालेल्या या दुःखद अपघातानंतर नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांची चौकशीही कोणी केली नाही. अशावेळी बुद्धा समल हा रिक्षाचालक त्याच्या कुटुंबासह मिनाती यांच्यासोबत उभा होता. कठीण दिवसांत त्याने खूप मदत केली. बुद्धा आणि कुटुंब गेले २५ वर्षांपासून मिनाती यांच्या कुटुंबासोबत आहेत. प्रत्येक प्रसंगात बुद्धाच्या कुटुंबाने त्यांना साथ दिली आहे.

तीन मजली घर, दागिने आणि संपूर्ण मालमत्ता अशी जवळपास करोडो रुपयांची संपत्ती बुद्धा याच्या नावावर करण्याचा निर्णय घेतल्यावर मिनाती म्हणाल्या, "माझ्या सर्व नातेवाईकांकडे मालमत्ता आहे. मला नेहमीच माझी मालमत्ता एका गरीब कुटुंबाला दान करायची होती. म्हणूनच मी ठरवले की मी माझी संपत्ती बुद्धांना दान करेन, जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर त्यांना कोणी त्रास देऊ नये.”

या आजींच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खुद्द बुद्धालाही या निर्णयाचे आश्चर्य वाटले. त्याने शेवटपर्यंत मिनाती यांची काळजी घेणार असल्याचे सांगितले आहे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required