१८ महिलांना फसविणारा मिस्टर फसवरलाल !!

हिंदीत एक गाणे आहे -एक जिंदगी काफी नही है- याच गाण्याच्या चालीवर ओडिशातील एका डॉक्टरने 'एक लग्न काफी नही है', असा विचार करत एक दोन नव्हे तर तब्बल १८ लग्न केली.पण हेच १८ वे लग्न त्याला तुरुंगवारी घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरले आहे.
ओडिशा येथील रमेशचंद्र स्वेन हा भाऊ खऱ्या अर्थाने मिस्टर फसवरलाल ठरला आहे.जिथे लोकांना एका मुलीला लग्नासाठी तयार करायला नाकीनऊ येतात, तिथे याने १८ महिलांना स्वतःच्या जाळ्यात ओढले, ते ही स्वतःला मोठा डॉक्टर आहे असे भासवून -एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाची गोष्ट वाटावी अशी याची सर्व कहाणीआहे.
हा भाऊ स्वतःला केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एक डॉक्टर आणि मोठा वैद्यकीय अधिकारी म्हणून स्वतःला महिलांसमोर आणत असे. खर तर पठ्ठ्या फक्त जेमतेम १० वी पास आहे. तर त्याच्या जाळ्यात फसलेल्या या महिला शिक्षक, वकील, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर अशा उच्चपदस्थ महिला आहेत.
अवघ्या ५ फूट २ इंचाचा हा माणूस ना जास्त शिकलेला -ना दिसायला चांगला- तरी त्याने इतक्या महिलांना लग्नासाठी तयार कसे केले हे सर्वांपुढे कोडे आहे.
त्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्याला इंग्लिश येत नसताना देखील एका इंग्लिश शिकवणाऱ्या महिलेला फसवले.जन्मदाखल्यानुसार त्याचे वय आहे, ६६ मात्र इतरांना सांगताना तो अजून आपण चाळीशी पण गाठली नाही असे सांगतो. त्याला भूलथापा छान तयार करता येतात, कदाचित म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला त्याच्या जाळ्यात अडकल्या
त्याचे टार्गेट या ४५-५५ वयातील घटस्फोटीत, विधवा किंवा एकट्या असणाऱ्या महिला होत्या.त्याने मॅट्रीमॉनीयल ॲपवर स्वतःचे तीन अकाऊंट उघडुन ठेवलेली होती.डॉ बिजयश्री रमेश कुमार', 'बिधु प्रकाश स्वेन' आणि 'रमानी रंजन स्वेन या तीन नावांचे त्याची अकाऊंट्स होती.
त्याने स्वतःला अत्यंत प्रोफेशनल दाखविण्यासाठी पूर्ण तयारी केली होती.यासाठी त्याने भुवनेश्वर मध्ये तीन आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतली होती. एवढेच नव्हे तर आपण एका माजी पंतप्रधानांच्या मेडिकल टीममध्ये होतो,असे सांगून लोकांना फसवत असे. ज्या महिलांसोबत त्याने लग्न केले त्यांनाच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकाना देखील त्याने लाखो रुपयांना फसवले आहे.
आपण फसविले गेलो आहोत, हे जेव्हा महिलांना कळत असे तेव्हा त्या बदनामीच्या भीतीने तोंड उघडत नसत. शेवटी कुठल्याही गुन्ह्याचा अंत पोलीस स्टेशनमध्येच होतो, तब्बल १८ वे लग्न करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. एका महिलेला कुणकुण लागल्यावर तिने पुरावे एकत्र करत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आणि अजून एक लग्न लावत असतानाच त्याला अटक करण्यात आली. त्याचे बिंग फुटले आणि भविष्यात आणखी महिला आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचल्या आहेत.