computer

पुरुष शौचालये दुर्गंधी आणि पाणी मुक्त करणारं यंत्र. नक्की कसं काम करतं हे?

पब्लिक टॉयलेटचा वापर सहसा तशी वेळ आल्याशिवाय करणं लोक टाळतात. कारण सोपे आहे. त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधी. यामुळे सहसा अशी ठिकाणे टाळली जातात. या दुर्गंधीमागे त्या ठिकाणी असणारा अमोनिया कारणीभूत असतो. मूत्रात पाणी मिश्रित झाल्यावर अमोनिया तयार होतो. तो वास जाण्यासाठी तुमच्यापैकी अनेकजण याच कारणाने दोनवेळा फ्लश करत असतील.

पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयात एकावेळी फ्लश केल्यास ६ लिटर तर पुरुषांच्या युरिनलमध्ये ५ लिटर पाणी फ्लश होत असते. हे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी मुंबई येथील जलसंवर्धनात काम करणाऱ्या नेहा बगोरिया यांनी भारी शोध लावला आहे. त्यांनी ecotrapin नावाचीक यंत्र डिव्हाईस बनवले आहे. हे यंत्र मुतारीला दुर्गंधीमुक्त आणि पाणीमुक्त करू शकते.

या यंत्राचा वापर केल्यास लघवी केल्यानंतर एकदाही फ्लश करण्याची गरज उरत नाही. आपण नेहमी जशी युरिनलची साफसफाई करतो तेवढीच यासाठी पुरेशी असेल. पुरुष युरिनलच्या ड्रेन्समध्ये हे यंत्र बसवल्यावर ते आपले काम आपोआप करते. आजवर अशी ८०० यंत्रे भारताबाहेर पाठवले गेली आहेत आणि आजवर या यंत्रांनी तब्बल १ लाख ६७ हजार ९०० लिटर पाणी वाचवले आहे.

नेहा बगोरियांचे आजोळ राजस्थानातले. त्या लहानपणी आजोळला  ब्यावर या गावी नेहमी जात असत. ब्यावर पाणीटंचाई असलेला परिसर आहे. यामुळे त्यांना पाणी वाचवण्याबद्दल आपसूक जाणीव निर्माण झाली. सुरुवातीला जिथे गरज आहे तिथेच पाणी वापरण्यास सुरुवात करून पुढे त्यांनी जलसंवर्धनात काम करण्यास सुरुवात केली.

त्यांचे आपल्या कामाबद्दल असलेले समर्पण मोठे होते. त्यांनी आपली चांगली सुरू असलेली सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी या कामासाठी सोडली. २०१२ साली नोकरी सोडून त्यांनी पाण्यावर उपाययोजना कसे करता येतील याचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी त्यांना युरिनल्समध्ये वाया जाणारे पाणी किती जास्त असते हे समजून आले. इथेच त्यांनी या समस्येवर उपाय शोधायचा असा निश्चय केला.

आता त्यांचे खरे काम सुरू झाले होते. त्यांनी मुंबईभर फिरुन युरिनल्समधून किती पाणी वाया जात आहे याचा अभ्यास केला. यातून त्यांना समजले की दरवर्षी दीड लाख लिटरपेक्षा अधिक पाणी वाया जात असते. २०१३ साली त्यांनी स्थापन केलेली कंपनी टापू सस्टनेबल सोल्युशन्सच्या माध्यमातून इकोट्रॅपइनवर काम सुरू केले. त्यांनी अतिशय योग्य असे डिव्हाईस तयार करून त्याचे पेटंट घेतले.

सुरुवातीला हे यंत्र स्टेट बँकेत आणि आणखी एके ठिकाणी लावण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर हे यंत्र अजून सुधारण्यासाठी त्यांनी काम सुरू केले. त्याचवर्षी हे यंत्र भारत सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागात पाठवण्यात आले. तेथे देखील त्याला मान्यता मिळाली.

२०१६ साली त्यांनी या यंत्राची सुधारित आवृत्ती आणली. आता हे यंत्र बसवण्यासाठी वेगळा माणूस लागणार नाही, तर ते कुणीही सहज बसवू शकेल अशी त्याची रचना करण्यात आली. हे यंत्र एकदा बसवले की ते आपले काम आपोआप करते. युरिनलच्या ड्रेनजवळ हे यंत्र बसवले जाते. या यंत्रातून लिक्विड पास होते. लिक्विड निघून गेल्यावर यंत्र परत आपल्या नॉर्मल स्थितीत येते. अशा तऱ्हेने म्हणजे पूर्ण ऑटोमॅटिक तत्त्वावर याचे काम चालते.

आजवर त्यांना या डिव्हाईसबद्दल कुठलीही तक्रार न आल्याचे देखील त्या सांगतात. एवढे छोटे डिव्हाईस पण लाखो लिटर पाणी वाचवू शकते, ही किती मोठी गोष्ट आहे नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required