त्यांनी पुण्याच्या जुन्या बसेसना दिलंय हे नवीन रूप....पाहून तुम्ही त्यांना सलाम कराल !!

लेडीज टॉयलेट्सची कमी संख्या ही आपल्या देशातली एक मोठी समस्या आहे. या समस्येवर एक जबरदस्त उपाय पुण्याच्या Saraplast या कंपनीने शोधून काढला आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या जुन्या बसेसना चक्क लेडीज टॉयलेट मध्ये रुपांतरीत केलंय. आहे ना भन्नाट आयडिया ?
मंडळी, या नव्या ढंगातल्या टॉयलेट्सचं नाव आहे “ती”.....
काय खास आहे ‘ती’च्यात ?
बसेसना टॉयलेट मध्ये रुपांतरीत केलंय हे तर एक वैशिष्ट्य आहेच ओ, पण आणखी बरीच वैशिष्ट्ये आहेत बरं. या बसेस मध्ये भारतीय आणि वेस्टर्न अशा दोन्ही पद्धतीचे स्वच्छतागृह आहेत. भारतात स्वच्छतागृहांमध्ये मुलांचे डायपर बदलण्याची जागा फार अभावानेच आढळते. या स्वच्छतागृहांमध्ये डायपर बदलण्यासाठी एक वेगळी जागा तयार करण्यात आली आहे. स्वच्छतेविषयी जागृती वाढावी म्हणून टीव्ही स्क्रीन्स लावण्यात आले आहेत.
यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, बसेस मध्ये सॅनेटरी नॅपकीन्स विकत मिळू शकतात. स्वच्छतागृहाच्या वापरासाठी महिलांकडून फक्त ५ रुपये आकारले जातात. खरं तर ही सेवा मोफत असणार होती, पण आर्थिक कारणांनी ते शक्य होऊ शकलं नाही.
सध्या पुण्यात अशा ११ बसेस आहेत. या सर्व बसेस सौर उर्जेवर चालतात. या बसेस पुण्याच्या गर्दीच्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहेत. २०१६ मध्ये स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या संकल्पनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दररोज १५० महिला या स्वच्छतागृहांचा वापर करतात. कधीकधी हा आकडा ३०० पर्यंत जातो.
कुठून आली ही आयडिया ?
Saraplast या कंपनीचे उल्का सादळकर आणि राजीव खेर यांची ही कल्पना. काही वर्षांपूर्वी बेघर लोकांसाठी जुन्या बसेसचं रुपांतर घरामध्ये करण्यात आलं होतं. याच कल्पनेचा वापर दोघांनी मिळून टॉयलेट्स तयार करण्यासाठी केला आहे. अशा संकल्पना टिकवून ठेवणं हे फार मोठं आवाहन असतं. हे आवाहन त्यांनी पेललं असून भविष्यात या संकल्पनेत नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांचा विचार आहे.
तर मंडळी, या संकल्पनेतून जुन्या बसेस पुन्हा एकदा लोकोपयोगी होण्यासोबतच सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दल लोकांच्या मनात जो समज असतो तोही दूर झाला आहे. अशा नवनवीन प्रयोगांनीच स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल !!