computer

दो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह!! का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे?

जगात गुन्हे, पोलिसखाते, न्यायसंस्था आणि तुरुंग हा कुठल्याच देशाला चुकला नाहीय. एकमेकांशी संबंधित असलेल्या या गोष्टींशिवाय बहुतांश समाज सुरक्षित आयुष्य जगू शकत नाही हे जितकं खरं, तितकीच माणसाला सुधारण्याची संधी मिळायला हवी हे ही तितकंच खरं!! काही देश या सुधारणेच्या शक्यतेवर आणि ती संधी देण्यावर विश्वास ठेवतात आणि आपला भारत त्यांपैकीच एक आहे. शिक्षा झालेल्या कैद्यांना ही संधी दिली जाते- खुल्या कारागृहात!!

शिक्षा झालेल्या, पण चांगली वागणूक असलेल्या कैंद्यांना ओपन प्रिझन किंवा खुल्या कारागृहात ठेवलं जातं. काही देश याला कैदी पुनर्वसन केंद्रही मानतात. खुल्या कारागृहांत कैद्यांना गजांआड बंद ठेवलं जात नाही. त्यांना त्यांच्या भोवतालच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. अगदीच इतर नागरिकांसारखं त्यांचं जीवन मुक्त नसलं तरी इतर तुरुंगांतल्या कैद्यांच्या मानानं याचं आयुष्य बरंच बंधनमुक्त आणि चांगलं असतं. जगाचा इतिहास पाह्यला तर ग्रेट ब्रिटनमध्ये हे प्रयोग खूप झाले आहेत. तिथे वेल्स, स्कॉटलंड, इग्लंड आणि आयर्लंडमध्ये अशी खुली कारागृहं आहेत. पण विकीवरची माहिती खरी मानायची तर ती १९५०-६० नंतर खुल्या कारागृहांमध्ये परिवर्तित झालेले तुरुंग आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रात, माणदेशात असलेलं खुलं कारागृह आपलं वेगळेपण दाखवतं. जिल्हा सांगली, तालुका आटपाडी आणि गावाचं नांव- स्वतंत्रपूर!! या गावातलं खुलं कारागृह सुरु झालं ते थेट १९३९ मध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळात!! महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून औंध संस्थानचे पंतप्रतिनिधी राजा भवानराव श्रीनिवासराव आणि एक इंग्रज अधिकारी प्रिगमन यांची ही संकल्पना होती. आटपाडीजवळ हे कारागृह त्याकाळी सुरू केलं होतं आणि ते आजही सुरू आहे. चांगल्या वर्तणूकीच्या कैद्यांना त्यांच्या वागणूकीचं बक्षीस म्हणून इथं आणण्यात येत असे. इथं त्यांना हवं तेव्हा घरच्यांना भेटता येत असे, आपली जमीन कसता येत असे आणि इतकंच काय, पिकवलेलं धान्य-भाज्या त्यांना बाजारात जाऊन विकताही येत असे. आजही ती पद्धत चालू आहे असं म्हटलं जातं.

स्रोत

१९३९च्या सुमारास हा तुरुंग तयार झाला. असं म्हणतात की तुरुंग चालू झाला तेव्हा इथं फक्त सहा कैदी आणि एक जेलर होते. ओसाड माळरान असलेल्या या जागेवर या कैद्यांची व्यवस्था कोण पाहणार हा प्रश्न होता. तो ही या जेलरने सोडवला आणि ते या सहाजणांसोबत त्यांचा सातवा सहकारी म्हणून राह्यले. या सर्वांनी तिथे शेती फुलवली, आटपाडीच्या तळ्याचे बांधकाम केले आणि अशीच आणखीही बरीच कामं केली. सुरुवातीस पूर्णपणे लाकूड, माती, दगडांचा वापर करून या तुरुंगातल्या खोल्या बांधण्यात आल्या होत्या. सुरुवातीला इथं फक्त ३० खोल्यांचं बांधकाम करण्यात आलं होतं. त्यात २८ खोल्या कैद्यांसाठी, तर २ खोल्या कार्यालयीन कामासाठी होत्या. मध्यंतरीच्या काळात या जुन्या बांधकामात बदल झाले आणि २०१८च्या सुमारास या जागेच्या नूतनीकरण हाती घेण्यात आलं होतं.

या स्वतंत्रपूरच्या बाबतीत १९५४ मधला एक किस्सा सांगितला जातो. नामदेव आणि येडा नावाचे दोन कैदी जेलमधून फरार झाले होते. पंधरा दिवसांनी ते स्वतःहून परत आले. त्यांनी सांगितलेले कारण मात्र भन्नाट होतं, त्यांच्यामते जेल अधिकारी आमचा पाठलाग करत आहेत असा भास आम्हाला नेहमी होत असतो. असं वाटत की ते आमच्या मागेच आहेत. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध लेखक ग. दि माडगूळकर यांनी हा किस्सा व्ही. शांताराम यांना सांगितला. गदिमा स्वतः माडगूळचे, आडपाडी तालुक्यातले. व्ही. शांतारामना ही कल्पना भारी आवडली. त्यांनी यावर सिनेमा बनविण्याचे ठरवले. गदिमांनी कथा-पटकथा लिहिली. गदिमांनी सिनेमा याच तुरुंगात शूट करण्याचा सल्ला दिला. आणि इथे घडलेल्या कथेवर या स्वतंत्रपूरमध्येच सिनेमा बनला- 'दो आँखे बारा हाथ'!! १९५७ साली आलेल्या या सिनेमाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले. या सिनेमाचे तसे बरेच किस्से सांगता येतील. या सिनेमानं 'ऐ मालिक तेरे बंदे हम' सारखं अजरामर गाणं दिलं आणि याच शूटिंगदरम्यान बैलाचं शिंग लागून शांतारामांच्या डोळ्याला इजा झाली. अभिनेता म्हणून व्ही. शांतारामांचा हा अखेरचा सिनेमा ठरला.

आजच्या घडीला भारतातल्या १७ राज्यांत खुली कारागृहं आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातलं पहिलं कारागृह १९६२ मध्ये केरळमध्ये सुरु झालं. एकट्या राजस्थानात २९, तर महाराष्ट्रात १३ खुली कारागृहं आहेत. २०१८च्या एका अहवालानुसार सर्वात जास्त खुल्या कारागृहातले कैदी (१,५२२)महाराष्ट्रात आहेत, तर त्याखालोखाल राजस्थानात (१,३२५)आहेत.

येरवडा आणि तिहार ही खुल्या कारागृहांच्या यादीतली दोन नावं सगळ्यांना माहित आहेत. पण देशातल्या सर्वात जुन्या, खऱ्या अर्थानं कैद्यांचं स्वतंत्रपूर असलेल्या या ८० वर्षांचा इतिहास बाळगून असलेल्या ठिकाणाबद्दल कुणाला अधिक माहित नाही हे मात्र दुर्दैव आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required