computer

अत्यंत गरीबी, लैंगिक छळ, वर्णभेद या सर्वांना मागे टाकून स्वत:च्या नावाचे नेटवर्क उभारलेली- ऑप्रा विन्फ्रे!!

जय हो या अपयशातून खचून न जाता पुन्हा भरारी घेणाऱ्या महान व्यक्तीचित्रांच्या मालिकेतलं पुढचं नाव आहे- ऑप्रा विन्फ्रे!! हिच्याबद्दल खरंतर लिहावं तितकं थोडं आहे. तिच्या आयुष्याची, अपयशांची, हाल-अपेष्टांची आणि त्यांच्यासमोर हार न मानता तिने उभारलेल्या कर्तृत्वाची काही क्षणचित्रे आपण आज पाहूयात.

१९९४ मध्ये तिचे नांव राष्ट्रीय महिला 'हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट करण्यात आले. तिच्या पुरस्कारांची यादी तर न संपणारी आहे. या यादीत अतिमहत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश करायचा तर त्यात जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकन अध्यक्षीय पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार, बॉब होप मानवतावादी पुरस्कार, टोनी पुरस्कार, पी बॉडी पुरस्कार, जीन हर्शोल्ट मानवतावादी पुरस्कार आणि १८ डेटाइम एमी पुरस्कारांचा समावेश आहे. ॲकॅडमी पुरस्कार आणि दोन ॲकॅडमी पुरस्कार नामांकनं हेही आहेच. २०२१ मध्ये तिची अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसची सदस्य म्हणून निवड झाली. इतके सगळे मानसन्मान, अमाप यश, पैसा आणि सुख सहजसाध्य असेल का? नाही. लहानपणी ज्या हालअपेष्टा आणि अत्याचारांना तिला तोंड द्यावे लागले ते पाहाता तर नक्कीच नाही.

ऑप्रा विन्फ्रेचं आयुष्य म्हणजे जणू दुःखाची परिसीमा. एका व्यक्तीच्या, ते देखील स्त्रीच्या वाट्याला इतकं दुःख येऊ शकतं याची कल्पना करवत नाही. अमेरिकेत मिसीसीपी नावाचं एक राज्य आहे. ऑप्राचा जन्म मिसिसिपीच्या ग्रामीण भागात एका किशोरवयीन आईच्या पोटी झाला आणि नंतर तिला तिच्या आजीकडे सोपवण्यात आलं. तिची आजी इतकी गरीब होती की ऑप्राला बटाट्याच्या पोत्यापासून बनवलेले कपडे घालावे लागत. यावरून इतर मुलं तिची चेष्टा करत असत. तिच्या आजीने तिला वयाच्या तिसऱ्या वर्षीच वाचायला शिकवले. स्थानिक चर्चमध्ये तिच्या बायबलच्या वचनांचे पठण करण्याची क्षमता पाहून तिला "द प्रीचर" असे टोपणनाव देण्यात आले होते.

बालपणात आणि किशोरवयात ऑप्राचा लैंगिक छळ झाला होता. त्यातून ती १४ व्या वर्षी गर्भवती झाली होती. तिचा मुलगा अकाली जन्माला आला आणि बालपणातच मरण पावला. त्यानंतर ऑप्राला तिचे वडील व्हर्नन विन्फ्रे यांच्याकडे टेनेसी इथे राहण्यासाठी पाठवण्यात आले. तिने एक वक्तृत्व स्पर्धा जिंकल्यामुळे तिला टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटी या कृष्णवर्णीय संस्थेची पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली. या विद्यापीठात ऑप्राने संवादशास्त्राचा अभ्यास केला. ती १९ वर्षांची झाली तेव्हा एका स्थानिक रेडिओ चॅनेलमध्ये संध्याकाळच्या बातम्यांसाठी ऑप्रा एक सह-अँकर होती.

या संवादशास्त्राच्या अभ्यासाचा ऑप्राला चांगलाच फायदा झाला असावा. ती टॉक शो इतक्या कौशल्याने पार पाडत असे, की तिचा हृदयस्पर्शी आणि दिलखुलास संवाद, तसंच अनौपचारिक वातावरण यामुळे तिच्या टॉक शोला दिवसाचा स्लाॅट देण्यात आला. शिकागोचा तो स्थानिक टॉक शो लोकप्रियतेत प्रथम स्थानावर आल्यानंतर तिने स्वतःची कंपनी सुरू केली. १९९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत तिने आपल्या टाॅक शो मध्ये लक्षणीय बदल घडवून आणला. या नव्या फाॅर्मॅट मध्ये कबुलीजबाब देण्याची पद्धत, आणि भावना-केंद्रित दृष्टीकोन असल्याबद्दल तिच्यावर टीका झाली असली, तरी टाॅक शो मधील पाहुण्यांना आपलसं करून घेण्याची तिची हातोटी कौतुकास पात्र ठरली.

२००८ च्या अमेरिकन अध्यक्षीय शर्यतीत ती एक राजकीय शक्ती म्हणून उदयास आली. बराक ओबामा यांना तिने समर्थन दिले. त्यामुळे ओबामांना अनेक मतदारांचा पाठिंबा मिळाला. २०१३ मध्ये ऑप्रा विन्फ्रेला राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी स्वातंत्र्य पदक प्रदान केले आणि ड्यूक ॲंड हार्वर्डकडून तिला मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. नंतर तिने तिचे स्वतःचे नेटवर्क, ऑप्रा विन्फ्रे नेटवर्क तयार केले.

अमेरिकेत काळे गोरे असा भेद वरवर दिसत नसला तरी तो अनेक क्रृष्णवर्णियांच्या प्रगतीमध्ये अडसर ठरतो हे सत्य आहे. टॉक शोच्या दुनियेत ऑप्रा विन्फ्रे हिने वर्चस्व गाजवण्याआधी फिल डोनाह्यू ह्याचा टाॅक शो तब्बल २६ वर्ष प्रेक्षकांचा आवडता होता. एक प्रकारे 'द ऑप्रा विन्फ्रे टाॅक शो'चं यश म्हणजे गोऱ्यांच्या वर्चस्वाला आव्हान होतं.

काही जाणकारांच्या मते निदान काही बाबतीत ऑप्रा विन्फ्रे हिची तुलना फिल डोनाह्यू याच्याशी होऊ शकत नाही, पण तिची शैली संपूर्णपणे तिने स्वतः विकसित केली आहे, हे देखील तितकंच खरं आहे. प्रामाणिकपणा, नर्म विनोद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहानुभूतीपूर्वक संवाद. पाहुण्यांच्या दु:खाने व्यथित होताना तिने स्वतः भोगलेल्या यातना तिच्या डोळ्यातील अश्रूंवाटे चमकत असतात. भावनांच्या त्या ओघात अनेकदा तिचे पाहूणे टाॅक शो दरम्यान अशा गोष्टींबद्दल बोलतात, ज्या त्यांनी तोपर्यंत कुणाजवळही उघड केल्या नाहीत; टीव्हीच्या प्रेक्षकांपुढे तर नाहीच. ऑप्रा विन्फ्रेच्या टाॅक शोच्या देदिप्यमान यशाचं कदाचित हेच गमक असावं.

लेखकःचंद्रशेखर अनंत मराठे

सबस्क्राईब करा

* indicates required