२ बाटल्या पाण्याच्या बदल्यात त्याने दिली तब्बल एवढी मोठी टीप !!

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये चांगल्या सर्व्हिसच्या बदल्यात वेटर/वेट्रेसला टीप दिली जाते. आता टीप किती द्यायची हा संपूर्णपणे ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. कोणी टीप देतं, तर कोणी देत नाही. हे झालं हॉटेलमध्ये जेवण वगैरे उरकल्यानंतर दिल्या जाणाऱ्या टीपबद्दल. पण तुम्ही कधी ऐकलंय का, कोणी पाण्याच्या २ बाटल्यांच्या बदल्यात टीप दिली आहे ? आणि ते ही १००-२०० रुपये नव्हे तर चक्क ७ लाख रुपये. आतापर्यंत तर असं घडलं नव्हतं राव. पण आता घडलं आहे !!
मंडळी, अमेरिकेतल्या साउथ कॅरोलायना जवळच्या ग्रीनव्हिल येथे असलेल्या “Sup Dogs” रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. तिथं एक माणसाने पाण्याच्या २ बाटल्या मागवल्या. वेट्रेसने बाटल्या आणून दिल्या. वेट्रेस निघून गेल्यावर तो अचानक तिथून निघून गेला. वेट्रेस परत आली, तेव्हा टेबलवर १०,००० डॉलर्स म्हणजे जवळजवळ ७ लाख रुपये ठेवलेले होते.
मंडळी, वेट्रेसचं नाव आहे अॅलायना. तिने टीप म्हणून मिळालेल्या भल्यामोठ्या रकमेचा काही भाग आपल्या सहकाऱ्यांमध्ये वाटून दिला आहे. या घटनेने रेस्टॉरंटचा मालक सुद्धा गोंधळात पडलाय राव.
बरीच शोधाशोध केल्यावर समजलं की ती इतकी मोठी रक्कम टीप म्हणून ठेवणारा महाभाग एक युट्युबर आहे आणि तो इतरांना अचानक धनलाभ करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे जिमी डोनाल्डसन. तो ‘Mr. Beast’ नावाचं युट्यूब चॅनेल चालवतो. त्याने टीप म्हणून अनेकांना खुल्या हाताने पैसे दिले आहेत. Sup Dogs रेस्टॉरंट मध्ये घडलेला प्रसंग त्याने छुप्या कॅमेऱ्याने कैद केला होता. तिथे नेमकं काय घडलं हे आता या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाच.
फक्त रेस्टॉरंट मध्येच नाही, तर त्याने पिझ्झा आणून देणाऱ्या मुलाला देखील १०,००० डॉलर्सची बक्षिसी दिली होती. याशिवाय त्याच्या एका व्हिडीओमध्ये तो आपल्या आईला १०,००० डॉलर्स देत आहे. बघूया पुढे कोणाचा नंबर लागतोय !!