computer

जगभर मिळणाऱ्या इंडियन करीचं मूळ भारतात नाही?? जाणून घ्या हे नाव कुठून आलं..

आता भारतीय पद्धतीचं खाणं जगभर मिळतं. पनीर, डोसे वगैरे मिळतंच, पण कित्येक वर्षांपासून जगभर इंडियन करी जाम प्रसिद्ध आहे. आपल्याकडे प्रत्येक प्रांतात आणि जातीतच काय, प्रत्येक घरात करी-म्हणजे आमटी करायची पद्धत वेगळी असते. पण  सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकून जी भाजी तयार होते तिला इंग्लिश मध्ये Curry म्हणतात.

पण या प्रसिद्ध झालेल्या करीच्या नामकरणाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? असं म्हणतात की या शब्दाचा शोध चुकून लागला होता राव!!

इंडियन करीचा इतिहास लय जुना आहे. तो जातो थेट पोर्तुगालांच्या काळात, १४९८ सालात! जेव्हा पोर्तुगीज लोक मसाले, वेलदोडे, काळी मिरी इत्यादी शोधत भारताच्या दक्षिण तटावर येऊन पोहोचले होते. मंडळी त्याकाळी काळी मिरी म्हणजे खूप महाग गोष्ट!! आणि ती फक्त भारतात मिळत होती. 

त्या लोकांनी भारतीय लोकांना रसदार आणि मसाले आणि नारळ पाणीयुक्त भाजी खाताना बघितले तेव्हा त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी विचारले हे काय आहे? तेव्हा आपल्या लोकांनी सांगितले, "ही कारी आहे". तमिळमध्ये 'र' या अक्षराचे दोन उच्चार असतात. त्यामुळे संशोधकांच्या मते या तमिळ शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे छान भाजून काळं करणे आणि दुसरा चावा-घास घेणे. दोन्ही शब्द अन्नाच्या बाबतीतच वापरले जात आणि हा दुसरा अर्थ व्हेज-नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्यांसाठी वापरला जाई.  पण पोर्तुगीजांना तर कारी म्हणजे काय एक अक्षर कळले नाही. मग त्यांनी या पदार्थाला करेल म्हणायला सुरू केले. 
 

पुढे भारतात इंग्रजांचे राज्य आले. तेव्हा त्यांनी करेलचे करी केले. ज्या भाजीत रस्सा जास्त असतो आणि मसाला टाकलेला असतो अशा भाजीला ते करी म्हणायला लागले.  इंग्रजांनी मग इंडियन करीच्या वेगवेगळ्या पाककृती शिकून घेतल्या आणि इंग्लंडमध्ये पण त्या बनविण्यात येऊ लागल्या. इथले मसाले तसेही ते महाराणीच्या नावाने इंग्लंडात विकत होते. त्या काळातच इंग्रजांनी भारतातल्या गरीब मजूरांना फिजी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, कॅरेबियन बेटांवर कामासाठी पाठवले. त्यांना खूप कमी पगार मिळे आणि सोबत मिळे रेशन केलेलं धान्य आणि हीच ती आपली करी पावडर!!

इंग्रज जिथे जिथे गेले, करी पावडर तिथे घेऊनच गेले. परिणामी १९ व्या शतकात इंग्लंडमध्येच नव्हे, तर जगभर इंडियन करी जाम फेमस झाली राव!! इंग्रजांना मग वाटू लागले की इंडियन करीचा शोध त्यांनीच लावला आहे. इंटरनेटवर शोध घेतलात तर  प्रत्येकाचं याबद्दल वेगळं मत दिसेल. मात्र काही असो, इंडियन करीचा शोध भारतातच लागला आहे. जगात आज अनेक प्रकारच्या डिशेस बनविल्या जातात, पण आजही इंडियन करीला तोड नाही राव!!

 

लेखक- वैभवराजे पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required