बोभाटा ख्रिसमस स्पेशल : जिंगल बेल्स हे गाणं लिहिलं कोणी ? जाणून घ्या त्याच्या मागची कहाणी !!

आज २५ डिसेंबर म्हणजेच ‘ख्रिसमस’. आज ख्रिसमस बद्दल काय लिहिणार याचा विचार करत असतानाच एक विचार डोक्यात आला. हा विचार असा की आपल्याला ख्रिसमस माहित आहे, ख्रिसमस मध्ये महत्वाचा असणारा ‘सँटा क्लॉज’ माहित आहे त्याच बरोबर त्याचं प्रसिद्ध ‘जिंगल बेल्स’ हे गाणं देखील माहित आहे. पण मंडळी, एक गोष्ट माहित नाही ती म्हणजे जिंगल बेल्स हे गाणं कोणी लिहिलं ? त्याचा कवी कोण ?

तुम्हाला माहित आहे का ? नाही ? आम्हालाही माहित नव्हतं मग आम्ही बरीच शोधा शोध केली आणि शेवटी आम्हाला त्याचं उत्तर मिळालं आहे.

चला तर जाणून घेऊया जिंगल बेल्सबद्दल माहित नसलेली गोष्ट.

‘जिंगल बेल्स’ या कवितेचे कवी होते ‘जेम्स लॉर्ड पायरपोईंट’. १८५७ साली या कवितेला “One Horse Open Sleigh" या नावाने प्रसिद्ध करण्यात आलं होतं. या कवितेला लिहिलं गेलं ते लहान मुलांसाठी. रविवारी चर्च मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात लहान मुलं हे गीत गायची.

जेम्स लॉर्ड पायरपोईंट  (स्रोत)

खरं तर जिंगल बेल्स हे मुळात ‘थँक्स गिविंग’ च्या दिवसासाठी लिहिलं गेलं होतं. त्याचा आणि ख्रिसमसचा तसा काहीही संबंध नव्हता. पण एखादी गोष्ट प्रसिद्ध होते तेव्हा ती एका मर्यादे पुरती राहत नाही म्हणतात ना तसच झालं याचं सुद्धा. ‘वॉशिंगटन स्ट्रीट’ येथे पहिल्यांदा जिंगल बेल्स गायलं गेलं आणि पुढे त्याला सगळ्यांनीच उचलून धरलं. इथून पुढे हे गाणं फक्त ‘थॅक्स गिविंग’ पुरतं मर्यादित राहिलं नाही. उलट ख्रिसमसच्या दिवशी ते गायलं जाऊ लागलं.

पहिल्यांदा पब्लिश झाल्यांनतर २ वर्षांनी “One Horse Open Sleigh" हे नाव बदलून त्याला ‘जिंगल बेल्स’ हे सुटसुटीत आणि आज प्रसिद्ध असलेलं नाव मिळालं. ही कविता कशी सुचली याबद्दल मतं वेगवेगळी आहेत. काहीजणांच्या मते बर्फावरून घसरणाऱ्या गाडीवरून पायरपोईंट यांना ही कविता सुचली. गाण्यातील ‘Sleigh’ हा शब्द घसरणारी गाडी या अर्थीच घेतला गेला आहे.

स्रोत

आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जिंगल बेल्सची चाल कोणी लावली. ही चाल पायरपोईंट यांनीच लावली होती पण ती कशी सुचली याबद्दल आजही इतिहासतज्ञ झगडत आहेत. सुरुवातीच्या काळात गायलं जाणारं जिंगल बेल्स हे त्याकाळातील पश्चिमी शास्त्रीय संगीताच्या पद्धतीनं गायलं जायचं. यात मोठा कोरस असायचा. काळ बदलला तसं त्याची पद्धत बदलली, पण मूळ गाण्याला धक्का लागला नाही.

तर अशी आहे जिंगल बेल्सची कहाणी. हे अजरामर गीत एवढं प्रसिद्ध आहे की त्याच्या पाठी असलेली गोष्ट सहसा कोणाला माहित नाही !!

हेच जिंगल बेल्स गाणं आपण आज ऐकुया अस्सल भारतीय शास्त्रीय संगीतात :

सबस्क्राईब करा

* indicates required