पॉवरी हो रही हैं: हा व्हायरल ट्रेंड काय आहे?? व्हिडीओत दिसणारी ती मुलगी कोण आहे?

इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल आणि कोणाला डोक्यावर घेतले जाईल सांगता येत नाही. इंटरनेटच्या गंमतीशीर जगात भर घालणारी आणखी एक गमतीदार बाब म्हणजे मीम. सध्या असाच एक मीम इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तो म्हणजे “पॉवरी हो रही है”. तर हे पॉवरी म्हणजे काय आणि या पॉवरीचा शोध नेटकऱ्यांना कसा लागला? 

पाकिस्तानची सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर दननीर मोबीन हिने आपल्या इंस्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत ती आपली कार दाखवत आहे आणि मैत्रिणींसोबत चाललेली पार्टी दाखवत आहे. ६ फेब्रुवारीला पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “ये मैं हूँ, ये मेरी कार हैं और ये हमारी पॉवरी हो रही हैं,”

बस्स तिच्या पार्टी या शब्दाला पॉवरी म्हणणं नेटकऱ्यांना चांगलंच डोक्यात बसलं. यामागे असलेलं एक मुख्य कारणही समजून घेऊया. दननीर मोबीन पेशावरच्या ज्या भागात राहते तो भाग श्रीमंतांचा भाग म्हणून ओळखला जातो. तिथलं राहणीमान पाश्चिमात्य ढंगाचं आहे. त्यामुळेच कदाचित तिच्या उच्चारावर लोक या प्रकारे तुटून पडले. लोकांना तिचं पार्टीचं पॉवरी म्हणणं फेक वाटलं. लोकांनी त्याची यथेच्च खिल्ली उडवली.

काहीही म्हणा पण इतक्याशा व्हिडीओने अनेकांना मीमसाठी कंटेंट पुरवला आहे. हा कंटेंट घेऊन कुणी कुणी कशी जाहिरात केली आहे, कसा स्वतःला सोशल मिडीयाच्या या व्हायरल लाटेवर स्वार केले आहे हे पाहिल्यास त्याहून जास्त गंमत वाटेल.

तिच्या या एका शब्दाच्या उच्चारावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय मेजेसचा तर पूरच वाहतो आहे. भारताच्या ११२ या टोलफ्री नंबरच्या ट्विटर हँडलने पण याच व्हिडीओचा संदर्भ देत ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या व्हॅनचा फोटो पोस्ट केला आहे आणि लेटनाईट पावरीचा त्रास होत असेल तर ११२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. 

डॉमिनोझने देखील याचाच वापर करून पिझ्झावर दिल्या जात असलेल्या ५०% डिस्काऊंटची जाहिरात केली आहे. डॉमिनोझनंतर स्विग्गी तरी कशी मागे राहील? स्विग्गीनेही अशीच जाहिरात केली आहे. झोमॅटोनेही या स्पर्धेत स्वतःला अजिबात मागे ठेवलेले नाही. इतकेच काय ओयो आणि नेटफ्लिक्सने देखील वाहत्या गंगेत हात धवून घेतले आहेत. हे झालं बड्या कंपन्यांचं.  मग नेटकऱ्यांनी किती धम्माल केली असेल. 

मुंबईचा म्युझिक कंपोजर यशराज मुखातेने ह्या व्हिडीओला म्युझिक जोडले आहे. त्याच्या भन्नाट म्युझिकने तर या व्हिडीओची गंमत आणखीनच वाढवली आहे. शिवाय ते जास्त व्हायरल झाले. त्याच्या व्हिडीओलाही सोशल मिडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्याने या व्हिडीओचे जे आणखी व्हर्जन बनवले आहे त्याला इंस्टाग्रामवर ३८ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दननीर मोबीनने इंस्टा अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडीओ आतापर्यंत जवळपास ५० लाख लोकांनी पाहिला आहे. तिच्या व्हिडीओला इतका प्रतिसाद मिळालेला पाहून दननीर मोबीनला तर खूपच आनंद झाला आहे. नुसता इंस्टाग्रामच नाही तर, ट्विटर, फेसबुक, युट्युब सगळीकडेच हा व्हिडीओ जबरदस्त ट्रेंड करत आहे. गेल्या दोन आठवड्यात #pavarihorahihai हा हाशटॅग ट्विटरवर तर जोरात ट्रेंड करत आहे. 

दननीर मोबीन सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आहे. ती मेकअप, ब्युटी, फिटनेस, रेसिपी आणि प्रोडक्ट रिव्ह्यू अशा वेगवेगळ्या विषयावर ब्लॉग लिहिते. मानसिक आरोग्यासाठीही आपल्या ब्लॉगवरून जागृती करत असते. पाकिस्तानमध्ये तिचे खूप फॉलोअर्स आहेत. पण, या एका छोट्या व्हिडीओने तिला कमालीची प्रसिद्धी मिळवून दिली आहे. या व्हिडीओनंतर तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली आहे. आधीही तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखात होतीच, पण आता ती चार लाखांच्या आसपास आहे. आज सोशल मिडीयावर तिला पावरी गर्ल म्हणून ओळखले जात आहे. या व्हिडीओच्या निमित्ताने तिचे इतर व्हिडीओही व्हायरल होत आहेत. दननीर मोबीन तिला मिळणाऱ्या या प्रतिसादाने अक्षरश: भारावून गेली आहे. 

आता जर कोणी ‘पॉवरी हो रही है’ म्हटलं तर तुम्हाला त्याचा संदर्भ लगेच लागेल, नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required