computer

आइसफ्रूटचा शोध कोणी आणि कधी लावला ? वाचा आइसफ्रूटचा जीवनप्रवास !!

आइसफ्रूट म्हटलं की  अहाहा..  ऐकूनच कसे आतबाहेर थंड वाटतं ना? आठवतात का ते रखरखीत उन्हाळ्याचे दिवस?आणि त्या दुपारच्या उन्हाच्या झळांना थंडगार करणारं, रंगीबेरंगी  जादू करणारं आइस्फ्रूट? त्याचे लाल,हिरवा पिवळा,केशरी,जांभळा असे विविध रंग जे तोंडाला,ओठांना, जिभेला, कपड्याला  लागून उन्हाळ्याच्या सुट्टीला  रंगीत करून टाकायचे!!  निव्वळ गोड रंगीत बर्फाच्या त्या आइसफ्रूटची आठवण जरी झाली तरी एक सेकंदात भूतकाळात जायला होतं . पण तुम्हांला हे माहित आहे का की  आइसफ्रूटचा शोध कोणी लावला असेल? नाही ना? वाटलंच. म्हणूनच खास बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलोय आम्ही ही गंमतीशीर गोष्ट!!

(फ्रँक एप्परसन)

खरंतर आइसफ्रूटचा शोध मुद्दाम म्हणून असा कोणी लावलाच नाही. याचा जन्म अगदी अपघाताने झाला.  आणि एकदा शोध लागल्यावर काय, आजवर आइसफ्रूट  वेगवेगळ्या चवीत आणि रंगात आपल्यासमोर येऊन आपलं आवडतं झालंय.बर असं म्हणतात की १९०५ मधे ११ वर्षाच्या एका मुलाकडून अपघाताने या  आइसफ्रूटचा जन्म झाला. त्या मुलाचे नाव होते फ्रँक एप्परसन. एप्परसनकडून एकदा त्याच्या हातातला काचेचा ग्लास बाहेर पोर्चमधे राहिला. या ग्लासात सोडापावडर,पाणी आणि एक छोटी स्टीक असे काही होते. वेळ रात्रीची होती आणि  कॉलिफोर्नियातली गारठ्याची रात्र होती ती.  साहजिकच या काचेच्या ग्लासातील हे सोडा आणि पाणी गोठले गेले,  त्यात ही स्टीक पण अडकली आणि  जन्म  झाला  आइसफ्रूटचा !!

एप्परसनने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याला एक भन्नाट आयडीया आली आणि मग त्याने पुढे काही दिवस घरातल्या घरात नंतर कालांतराने आपल्या मित्रांमधे आइसफ्रूटचा विविध प्रयोग  करुन बनवून द्यायला सुरूवात केली .. आणि आज अशी परिस्थिती आहे की संपूर्ण जगभरात २० कोटीच्या वर याची विक्री होते.

१९२३ मधे फ्रँक एप्परसनने आपल्या या आइसफ्रूटला एप्सीकल या नावाने बाजारात एक ओळख द्यायला सुरूवात केली. सुरुवातीला कँलिफोर्निया,अलमेडा पार्क येथेच याचे पदार्पण झाले. एप्परसनच्या मुलांना वाटले की आपल्या वडिलांना या बर्फगोळ्याचा शोध लावला म्हणून याचे नाव “पॉपसिकल” असावे. म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना तसे सुचविले देखील. आणि एप्परसननेही याला मान्यता दिली. आणि तेव्हापासून POPSICLE या नावाने आइसफ्रूट बाजारात ओळखले जाऊ लागले. भारतात मात्र त्याला एकच नाव आहे आइसफ्रूट!!  हां, आता काही लोक त्याला गारीगारही म्हणतात.

कालांतराने पॉपसिकल ब्रँड बनला आणि या ब्रँडची अशी प्रगती होत असतानाच एप्परसनने  एका कंपनीशी भागीदारी केली. ही न्युयाँर्कमधली ''जो लो"या नावाची कंपनी होती. पुढच्या पाच दशकांत या ब्रँडने एक पेटंट तयार केले आणि  बाजारात खूपच प्रसिध्द झाला. ग्राहकवर्गामधे लहान मुले हा जेवढा मोठा  ग्राहक,  तेवढ्याच जास्त प्रमाणात या लहान मुलांच्या आया हा ही मोठा ग्राहकवर्ग होता. गंमत म्हणजे आधी आइसफ्रूटला दोन काड्या असायच्या,  पण नंतर  या आयांच्या सूचनेनुसार १९८६मधे दोन स्टीक असलेली व्हरायटी बंद केली गेली.

(फ्रँक एप्परसन)

पसिकल चा प्रसिद्धीचा आलेख दिवसेंदिवस  वाढतच होता. अर्थातच मग तो विकत घेण्याचे प्रयत्न होणारच होते. २०१० मधे जगप्रसिध्द युनिलिव्हर या कंपनीने पॉपसिकलला विकत घेतले आणि अमेरिकेतल्या नेवाडा, मँरीलँड, मिसलेरी येथे नवीन प्लँट टाकून उत्पादन सुरू केले. या टेकओव्हरनंतर पॉपसिकल मध्ये आणखी नवनवीन व्हरायटी आली आणि त्याची प्रसिद्धी पूर्वीपेक्षाही वाढली. या दरम्यानच त्यांनी JOLLY RONCHER हा फ्लेवर बाजारात आणला. पॉपसिकलने बाजारात आणलेल्या प्रत्येक नवीन फ्लेवरचे बाजरात पब्लिककडून नेहमीच जोरात स्वागत झाले. ग्राहकांना ते नवनवीन फ्लेवर आवडतही राहिले. तरीही पॉप्सीकल या ब्रँडचा CLASSIC CHERRY हा फ्लेवर कायमच ग्राहकांच्या पसंतीच्या पावतीवर 100% यश मिळवत राहिला.

बघा मंडळी,  हा आहे आपल्या लाडक्या  आइसफ्रूटचा  गंमतशीर जीवनप्रवास. कडक उन्हाळ्यात शरीराला, मनाला सुखद थंड गारवा देणारा सुमधुर बर्फाचा गोळा इतके चढउतार सहन करत आपल्यापर्यंत पोहोचलाय. आहे ना आश्चर्यकारक माहिती? आता प्रत्येक वेळेस आइसफ्रूट खाताना तुम्हाला नक्कीच ही आइसफ्रूटची ही रंजक जन्मकहाणी आठवेल...

तुमच्या लहानपणचा आइसफ्रूट खातानाचा फोटो असेल तर नक्की इथे पोस्ट करा !!

सबस्क्राईब करा

* indicates required