computer

'बॉयकॉट' शब्दाशी शेतकरी आंदोलनाचा काय संबंध आहे ??

काही शब्द इतके जुन्या परिचयाचे असतात की तो शब्द कुठून आला असेल बरं?  असा प्रश्न देखील आपल्या मनात येत नाही. उदाहरण म्हणून आज आपण "बॉयकॉट" हा शब्द बघू या. बॉयकॉट म्हणजे बहिष्कार - बहिष्कृत!! हे शब्द पण त्या मानाने नविन आहेत. मराठीत  "बॉयकॉट" ला योग्य शब्द म्हणजे "वाळीत टाकणे". थोडक्यात काय तर सामाजीक बहिष्काराला "बॉयकॉट" हा एकदम 'फिट्ट' बसणारा शब्द आहे. गंमत बघा, योग्य म्हणताना पण 'फिट्ट" हा कसा आपोआप वापरात येतो .

तर मंडळी,  "बॉयकॉट" हे इंग्रजीतले क्रियापद वगैरे नाही. तर ते चक्क एका माणसाचे  नाव आहे. याचे पूर्ण नाव कॅप्टन चार्ल्स बॉयकॉट. हे कॅप्टन साहेब १८८० साली एका आयर्लंडच्या लॉर्ड अर्न या धनाढ्य माणसाकडे त्याची जमीन-जायदाद सांभाळण्याचे काम करायचे.

(कॅप्टन चार्ल्स बॉयकॉट)

१८८० साली या इलाख्यात दुष्काळ पडला तेव्हा लॉर्ड साहेबानी गरीब कुळांना १० टक्के सूट जाहीर केली. दुष्काळ इतका वाईट होता की शेतकर्‍यांनी २५ टक्के सूट मागितली. लॉर्ड अर्न यांच्या मनात इतकी मोठी सूट देण्याचे नव्हते.  म्हणून त्यांनी कुळांकडून जमीन काढून घेण्याचे ठरवले आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कॅप्टन बॉयकॉट यांना पाठवले.

शेतकर्‍यांनी एकत्र येऊन या कारवाईला विरोध करण्याचे ठरवले. चार्ल्स पार्नेल नावाच्या एका शेतकर्‍याच्या सुचनेनुसार या आयरीश लँड लीगने अहिंसेच्या मार्गाने जाऊन कॅप्टन चार्ल्स बॉयकॉटवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले. शेतकरी विरोध करतील या अंदाजाने कॅप्टन चार्ल्स बॉयकॉटने काही सैनिक तैनात केले, पन्नास-एक मजूर बाहेरून आणून शेतकर्‍यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न केले. परंतु बहिष्कार टाकून गेलेले शेतकरी काही परत येण्याचे नाव घेईनात.

कॅप्टन चार्ल्स बॉयकॉटचे काम फत्ते झाले. पण खर्च इतका झाला की शेती परवडेनाशी झाली. शेवटी कुळांच्या सोबत सामोपचाराने मार्ग शोधण्याखेरीज दुसरा काहीच मार्ग राहीला नाही. या प्रसंगानंतर बॉयकॉट हा शब्द इतका वापरला गेला की असहकार , बहिष्कार, वाळीत टाकणे म्हणजेच बॉयकॉट असे म्हटले जाऊ लागले. १८८१ साली अमेरीकन वृत्तपत्रांनी या घटनेला इतकी प्रसिध्दी दिली की आजही बॉयकॉट म्हणजे बॉयकॉट असाच असा रुढ झाला.

सबस्क्राईब करा

* indicates required