नसली वाडिया यांच्या खुनाचा कट आणि धीरूभाई अंबानी....काय घडलं होतं ?

८०च्या दशकात प्रख्यात उद्योगपती नसली वाडिया-बॉम्बे डाइंग- यांना जीवे मारण्याची सुपारी प्रख्यात उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी गुन्हेगारी जगताला दिल्याचा गौप्य स्फोट तत्कालीन पोलीस आयुक्त वसंत सराफ आणि सह पोलीस आयुक्त इनामदार यांनी करताच संपूर्ण देश हादरून गेला होता. त्यातच तत्कालीन सत्तारूढ काँग्रेस पक्षाशी अंबानींचे असलेले संबंध लक्षात घेता दिल्लीतूनही भराभर सूत्रे हलत होती. आजकालच्या भाषेत बोलायचे तर पंतप्रधानांचे कार्यालयही 'हरकत' मध्ये आले होते.
(नसली वाडिया)
पडद्याआड घडणाऱ्या घटनांना प्रचंड वेग आला होता. मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही सत्ताकेंद्र जणू एकमेकाला शह देण्यासाठी दररोज नव्या सोंगट्या राजकीय पटलावर आणत होते. पंतप्रधान कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयात दिवसाचे चोवीस उसंत न घेता काम करत होते. दुसरीकडे नरिमन पॉईंट येथील एक्सप्रेस टॉवर्सच्या पेंटहाऊस मध्ये केंद्राला शह देण्याची सूत्रे स्वतः रामनाथजी गोयंका हलवत होते. धीरूभाईंनी रामनाथजींचे शत्रुत्व स्वीकारले होते. उद्योगपती नसली वाडिया त्यांचे घनिष्ट मित्र होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची नेहमीप्रमाणेच तारेवरची कसरत सुरू होती. कारण वाडिया हेही पवार यांचे खासमखास होते. त्याचवेळी पंतप्रधान गांधी हेही मित्रच होते कोणाचीही बाजू घेतली तरी बोल लागणारच होता, परंतु पवारांकडे बारा 'मती' होती.
त्यांनी स्वतः काहीही न करता पोलीस अधिकाऱ्यांना मोकळे केले. त्यांच्या तपासात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जराही ढवळाढवळ केली नाही. आयुक्त वसंत सराफ तसेच सह पोलीस आयुक्त अरविंद इनामदार यांनी याआधी दिल्लीला चांगले काम केलेले होते त्यामुळे दिल्लीनेही त्यांच्या कामात त्यांना स्वतंत्रता दिली. तत्कालीन सी बी आय प्रमुख मोहन कात्रे मात्र अंबानींचे कट्टर समर्थक होते, परंतु त्यांचेही या दोन तडफदार पोलीस अधिकाऱ्यांसमोर काही चालले नाही.
(शरद पवार)
गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी गुन्हेगारांचे अड्डे पिंजून काढले आणि काय आश्चर्य त्यांच्या हाती छोट्यामोठ्या वाद्यवृंदात ड्रम वाजवणारा प्रिन्स बाबरीया हा तुलनेने छोटा गुंड लागला. मग काय गुन्हे शाखेतील सहस्रबुद्धे आणि कुंभार यांच्या टीमने या प्रिन्सला पोपटासारखा बोलका केला. पोपटमिर्ची जितक्या पटापट खातो त्यापेक्षाही जास्त वेगाने हा माहितीचे दाणे टाकू लागला.
आता कपाळावर हात मारायची वेळ पोलिसांची होती कारण माहितीच्या दाण्यात एक मोत्याचा दाणा होता. या मोत्याच्या दाण्याचे नाव आणि कंपनीचे नाव ऐकताच पोलीस अधिकारी हडबडलेच !
त्यांनी लगेच ही माहिती सह पोलीस आयुक्त इनामदार यांना दिली. त्यांनी ती आयुक्त सराफ यांना कळवली. सर्व माहिती गुप्त ठेवून प्रिन्स आणि त्या दाण्याचे फोन रेकॉर्ड चेक केले गेले. दरम्यान त्या चौकशीत प्रिन्सने आपला पंटर शानू याचे नाव सांगितले होते. शानुच्या कानाखाली जाळ काढताच त्याने वाडिया यांच्या बंगल्यावर आपण कशी पाळत ठेवली होती, त्या बंगल्यात किती सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्याकडे कसले' सामान' असते याचीही खबरबात काढली होती.
कोणी किती पैसे दिले, फोटो दाखवून यानेच दिले होते काय याची खातरजमा करण्यात आली. रिलायन्सच्या कार्यालयात धाड घालण्याच्या प्लॅन ठरवण्यात आला. सर्व गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. साध्या वेशातील पोलिसांनी कार्यालयात प्रवेश केला. जराही वेळ न दवडता ते थेट जनसंपर्क अधिकारी कीर्ती अंबानी यांच्या केबिन मध्ये गेले आणि अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी कीर्तीला उचलून पोलीस गाडीत बसवले.
(कीर्ती अंबानी)
"if you know the enemy and know yourself, you need not fear the results of a hundred battles" पोलिसांचे हे यश पाहता विख्यात चीनी तत्ववेत्त्याचे ही ओळी सहज आठवली.
कीर्ती अंबानीच्या अटकेने देशभरात एकच हलकल्लोळ उडाला. सर्व प्रमुख नेते आणि नोकरशहांचे फोन सुमारे अर्धा पाऊण तास एंगेज होते. त्यातच कीर्तीला झटपट बाहेर काढण्याचे उद्योग सुरू झाले. दिल्लीहून पोलिसांना सतत फोन येऊ लागले. ही गोष्ट प्रख्यात वकील राम जेठमलानी यांना कळताच त्यांनीही आपल्या 'सोर्स' ना कामाला लावले. राम जेठमलानी यांनी अशी तगडी फिल्डिंग लावली होती, की ज्या न्यायमूर्ती समोर हा खटला होता त्याने कागदपत्रे पाहताच हा खटला माझ्यासमोर चालू शकत नाही, कारण माझ्याकडे रिलायन्सचे बरेच शेअर्स आहेत असे म्हटले.
(राम जेठमलानी)
पोलिसांना दोन दिवस हातात मिळाले. तूप रोटी खाणारा बिचारा कीर्ती प्रिन्सपेक्षाही दुप्पट वेगाने पटापट बोलू लागला.
त्याने कटाचा सर्व तपशील दिला. पोलिसांनी तो प्रिन्स आणि शानुच्या माहितीशी जुळवून पाहिला. प्लॅन तंतोतंत जुळला. मग हा खटला 'तारीख पे तारीख' या न्यायाने सुरू राहिला. आज विधानसभेतील चर्चेची क्लीपिंग पाहताना हा सर्व इतिहास डोळ्यासमोरून गेला.
(प्रिन्स बाबरीया)
त्यावेळीही तपास सी बीआय कडे द्यावा असे दिल्लीतील नेत्यांना वाटत होते. सी बी आय प्रमुख कात्रे यांचेही तसेच मत होते, परंतु मुख्यमंत्री पवार यांनी सर्व तपास होऊ दिला. खटला वर्ग झाला आणि नंतर पवार यांनीही तपास सी बी आयने करावा असे मत नोंदवले. यात आणखी एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे पंतप्रधानांच्या जवळच्या नेत्यांना धीरुभाई अंबानी यांची बाजू घ्यावी असे वाटत होते. त्याच वेळी सुमारे ८० खासदारांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून आपण कुणा उद्योगपतींची बाजू घेऊ नये काय होईल ते कोर्टातच होऊ दे असे ठाम मत व्यक्त केले होते. आताही काही नेते गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करणार, परंतु सरकारने ठाम राहावे कारण "In the winds of chaos, there is also opportunity." हे लक्षात ठेवावे.
(सी बी आय प्रमुख मोहन कात्रे)
येत्या काही आठवड्यात हे प्रकरण काय वळण घेईल, ते आपल्याला कळेलच पण शेवटी राहून राहून गॉडफादर कादंबरीच्या ब्लर्बवर असलेले बाल्झॅकचे वाक्य आठवते. ते असे Behind Every Great Fortune There Is a Crime' (प्रचंड संपत्ती मागे कुठला तरी गुन्हा असतोच.)
लेखक: विजयकुमार काळे
संपादकीय नोंद : वर दिलेल्या लेखनविषयाबद्दल एक 'गुगल सर्च' केला तर अनेक संदर्भ मिळतील हे खरे असले तरी त्या कालखंडात ज्यांनी हे अनुभवले आहे अशा विजयकुमार काळे या अनुभवी ज्येष्ठ पत्रकाराकडून ही हकीकत समजून घेणे आम्हाला जास्त विश्वासार्ह वाटले. या प्रकरणाची अधिक माहिती 'पॉलीस्टर प्रिन्स' या पुस्तकात आहे परंतू त्या पुस्तकावर भारतात बंदी आहे.