computer

अंडरवेअर्स, मार्केटींग- बिझनेस मॅनेजमेंटचा महत्वाचा धडा आणि लाखोंची उलाढाल!! हे गणित समजून घ्यायलाच हवं..

चड्डी - अंडरवेअर, कच्छा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या या अंतर्वस्त्राबद्दल कोणी फारसं चर्चा करताना दिसणार नाही. अमुकतमुक ब्लेझर घेतला तर सोशल मिडीयावर चमकणारी मंडळी 'आज मी एक भारीपैकी चड्डी घेतली' असं अपडेट टाकताना दिसणार नाहीत. थोडक्यात काय तर अत्यंत गरजेची पण अत्यंत दुर्लक्षित अशी ही वस्तू आहे, याबद्दल तुम्ही सहमत असाल यात शंकाच नाही. पण मग आजचा हा लेख या विषयावर का आहे ते आता समजून घ्या.

आधी शेअरबाजारात 'पेज इंडस्ट्रीज' नावाच्या समभागाची आजची किंमत बघा. आजचा बंद भाव आहे रुपये २८,१६५ !! या समभागाची मूळ किंमत आहे फक्त रुपये १०!!! थोडा खोल तपास केला तर लक्षात येईल की पेज इंडस्ट्रीचे ५०० समभाग तुम्ही २००८ साली घेतले असते तर तुमची गुंतवणूक फक्त १,७५,००० झाली असती आणि आजच्या तारखेस विकले तर हातात तब्बल दिड कोटी असते.

आता या कंपनीचा व्यवसाय काय तर ही कंपनी चड्ड्या विकते. तुम्ही आम्ही वापरतो त्याच अंडरवेअर आणि बनीयान विकणारी ही कंपनी आहे आणि कंपनीचं नाव ओळखीचं नसलं तरी त्यांचा ब्रँड आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. जॉकी! जॉकी अंडरवेअर!! जॉकी बनीयान !!

थांबा लगेच तुम्ही लेबल तपासायला धावू नका. आतापर्यंत जे लिहिलं आहे ते १००% सत्य आहे. पण हे घडलं कसं हे जाणून घेणं त्याहूनही मनोरंजक आणि उद्बोधक कहाणी आहे.

जॉकी इंटरनॅशनल हा परदेशी ब्रँड आहे. जॉकी इंटर नॅशनल भारतीय बाजारात त्यांचा माल थेट विकत नाही किंवा बाहेर बनवलेला माल इथे विकत नाही. जॉकी इंटरनॅशनलने भारतीय कंपनी पेज इंडस्ट्रीला त्यांचे तंत्रज्ञान आणि डिझाईन 'रॉयल्टी' तत्वावर दिले आहे. पेज इंडस्ट्रीची जी विक्री असेल त्या विक्रीच्या फक्त ५% वाटा जॉकी इंटरनॅशनल घेते, बाकी सर्व नफा पेज इंडस्ट्रीला मिळतो.

महत्वाची बाब अशी की देशी - परदेशी कंपन्यांची अशी रॉयल्टीवाली भागीदारी फारच कमी वर्षं टिकते. सुरुवातीच्या काही वर्षानंतर देशी कंपन्यांना धक्का देऊन परदेशी कंपन्या थेट धंदा करायला लागतात पण पेज आणि जॉकी इंटरनॅशनल यांची भागी गेली २४ वर्षं टिकून आहे.

आता मनात हा प्रश्न नक्की उभा राहील की आम्ही म्हणजे 'बोभाटा'च्या वाचकांनी हा इतिहास का वाचायला हवा ? त्याचे उत्तर असे आहे की आमचे अनेक वाचक उद्योजक आहेत किंवा उद्योग सुरु करणार आहेत त्यांच्यासाठी पेज इंडस्ट्रीज एक उत्तम धडा आहे .

आता असं बघा की अंडरवेअर किंवा बनीयान या क्षेत्रात ज्याला होजीयरी मार्केट म्हणतात त्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर ब्रँड निर्माण  करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षात कोणीही केला नव्हता. व्हिआयपी आणि डॉन मिल्सचा अपवाद वगळता हे क्षेत्र असंघटीत उत्पादकांच्या हातात होते. उत्तम दर्जाची अंतर्वस्त्रं बनवण्याची क्षमता आपल्याकडे नव्हती असा याचा अर्थ नाही. दक्षिणेत तिरूपूरसारख्या शहरातून अनेक जागतिक किर्तीच्या अंतर्वस्त्रांची निर्यात होते. मग ही वस्त्रे भारतीय बाजारात का येत नव्हती याचा शोध आधी पेज इंडस्ट्रीने घेतला.

त्यांच्या असे लक्षात आले की सर्वसामान्य भारतीय ग्राहक चड्डी विकत घेताना 'गुपचुप' पध्दतीने घेतात.  अंतर्वस्त्रांचा दर्जा म्हणजे वापरल्या जाणार्‍या फॅब्रिकचा पोत, कायम टिकणारा रंग, डिझाईन, इलास्टीक याकडे लक्ष न देता खरेदी केली जाते.

हे लक्षात आल्यावर पेज इंडस्ट्रीने दर्जा लक्षात आणून देणार्‍या जाहिराती तयार केल्या. उदाहरणार्थ कमरेला वळ आणणार नाही असे इलास्टीक, रंग न जाणारे  मऊसूत पोत असलेले फॅब्रिक,  'आत'मध्ये हवा खेळती रहावी असे डिझाईन या वैशिष्ट्यांची त्यांनी जाहिरात केली. हे सर्व करण्यासाठी एकूण १० वर्षांचा काळ गेला.

आता ग्राहकाच्या मनात काय असते त्याचा विचार करूया. अंडरगार्मेंटसारखी वस्तू जास्त किंमत मोजून विकत घेताना उगाच पैसे वाया घालवले असा विचार मनात आला की ते उत्पादन दुसर्‍यावेळी विकले जात नाही.  यासाठी पेजने सर्वसाधारण गारमेंटपेक्षा जास्त पण चैन  वाटू नये अशा किमती ठेवल्या. उदाहरणार्थ जॉकी अंडरवेअरसाठी  व्हिआयपी फ्रेंचीपेक्षा ५० रुपये जास्त मोजावे लागतात, पण कॅल्व्हीन क्लाईनसारख्या महागड्या -रु. ९९९ आणि जास्त-अंडरवेअरपेक्षा खूप कमी किमती ठेवल्या.

थोडक्यात पेज इंडस्ट्रीचे मार्केटींग म्हणजे बिझीनेस मॅनेजमेंटचा महत्वाचा धडा आहे. उद्योगक्षेत्रात नव्याने येणार्‍या आमच्या वाचकांना हा धडा नक्कीच आवडला असेल!

पेज इंडस्ट्रीचा हा धडा यानंतर लक्स, रुपा यांनी गिरवला आणि ते ब्रँडसुध्दा मोठे झाले. आता राहता राहिला प्रश्न येणार्‍या काळात नव्याने येणार्‍या 'व्हॅन ह्युसन' सारख्या स्पर्धकांचा! जॉकीने मार्केट उभे केले आहे, पण नव्याने येणार्‍या ब्रॅण्डना त्याचा आयता फायदा मिळणार आहे. पण स्पर्धा कोणाला चुकली आहे??

सबस्क्राईब करा

* indicates required