computer

व्हिडीओ ऑफ दि डे : १३ वर्षापूर्वी ज्या ठिकाणी त्याच्यासोबत दुर्घटना घडली त्याच जागी त्याने दोघांचा जीव वाचवला!!

आपल्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये म्हणून काही माणसं नेहमी मदतीला धावून येत असतात. बरेचदा ही माणसं आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे करतात. कारण त्यांना पुढं काय वाढून ठेवलेलं असेल याची पूर्ण जाणीव असते. नुकतीच रशियामध्ये अशी एक घटना घडली. निकिता यानकोव्ह हा समुद्रावर एक डॉक्युमेंटरीचं चित्रीकरण करत होता. त्याला समुद्रात एक व्यक्ती बुडताना दिसली. त्याने मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी घेतली.

आता यात नवल काय? तर त्याचं वैशिष्ट्य असं की हा निकिता यानकोव्ह अर्धांगवायूने ग्रस्त आहे. तो एकेकाळी प्रशिक्षित स्विमर होता. १३ वर्षांपूर्वी अगदी त्याच ठिकाणी त्याच्यासोबत एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत होऊन त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. दुसऱ्या व्यक्तीसोबतही तोच प्रसंग घडताना पाहून तो लगेच मदतीसाठी धावला. हा व्हिडीओ पाहा.

हे घडलं रशियाच्या आनापा नावाच्या शहरात. तिथल्या समुद्रावर निकिता यानकोव्ह स्वतःच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी गेला होता. त्याने पाहिलं कि दोनजण समुद्रात बुडत आहेत. त्याने ओरडून दोघांनाही सूचना दिल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तो स्वतःच त्यांना वाचवायला पुढे सरसावला. पुढच्याच क्षणी त्याने व्हीलचेअरवरून पाण्यात उडी घेतली होती.

अर्धांगवायूचा झटका आलेला माणूस हे कसं करू शकतो हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. निकिता यानकोव्हला हे करताना कष्ट पडले. इतरांप्रमाणे त्याला पोहता येत नव्हतं म्हणून तो पाठीवरून पोहत गेला आणि त्याने बुडणाऱ्या व्यक्तीच्या मानेभोवत हात टाकला. लवकरच तिथे बोट आली आणि दोघांनाही वाचवण्यात यश आलं.

नेमक्या त्याच ठिकाणी घडलेली ही दुसरी दुर्घटना म्हणता येईल. हा योगायोग आहे, पण सुदैवाने यावेळी कोणाला दुखापत झाली नाही. निकिता यानकोव्हने ज्या प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवला ते खरंच कौतुकास्पद आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required