नातवंड दिले नाही म्हणून ५ कोटी नुकसानभरपाईचा खटला भरण्याचं प्रकरण काय आहे?

नातवंड दिले नाही म्हणून ५ कोटी नुकसानभरपाईचा खटला भरण्याचं प्रकरण काय आहे?

धकाधकीचे जीवन, दिवसेंदिवस वाढती महागाई, शिक्षणापासून नोकरीपर्यंत सर्वच क्षेत्रात वाढलेली अस्थिरता, अशा परिस्थितीत आजची पिढी अपत्य जन्माचा विचार करताना थोडीशी दचकतेच. अशात नातवंडाचं तोंड पाहण्याचा हट्ट धरलेल्या आई-वडिलांची समजूत काढणं म्हणजे महादिव्य. आता हेच हरिद्वारच्या या कुटुंबाचंच उदाहरण म्हणजे या सर्वांवर कडी आहे. लहान मुलांचे हट्ट पुरवताना नाकी नऊ येतात ते माहिती आहे, पण इथे आई-वडिलांच्या हट्टाने मुलाला थेट कोर्टात खेचले आहे.

हरिद्वार येथील जोडपे एसआर प्रसाद आणि त्यांची बायको आपल्या मुलाने अजून नातवंडाचे तोंड दाखवले नाही म्हणून चक्क कोर्टात गेले आहेत. मुलगा असो, मुलगी असो आपल्याला काहीही अडचण नाही. फक्त आपल्याला नातवंड हवे असा त्यांचा हट्ट!! आणि हा हट्ट पूर्ण करणार नसाल तर थेट ५ कोटी आपल्याला द्या असा अजब खटला त्यांनी भरला आहे.

प्रसाद जोडप्याने मुलगा आणि सुनेला अल्टीमेटम पण देऊन टाकले आहे. एका वर्षात नातवाचे तोंड दाखवा नाहीतर ५ कोटी ठेवा. ६ वर्षं झाली लग्नाला तरी आपल्याला नातवंड दिसत नाहीत. मग कुणाकडे बघून जगावे ही त्यांची खरी तक्रार आहे. आता मुलाने अडीच आणि सुनेने अडीच असे ५ कोटी देऊन विषय संपवा किंवा मूल जन्माला घाला असा दम ते देतात.

प्रकरण कोर्टात गेले म्हणल्यावर विषय सोपा पण राहिला नाही. एसआर प्रसाद म्हणतात, "आपण मुलाला शिकवण्यासाठी आपल्या जन्माची सर्व पुंजी खर्ची घातली. त्याला शिकवून अमेरिकेला पाठवले, घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. आता आमची परिस्थिती हलाखीची असून मुलाने आम्हाला मदत करावी."

संजीव रंजन प्रसाद बीएसईलमध्ये अधिकारी होते. निवृत्त झाल्यावर ते आपल्या बायकोसोबत राहतात. त्यांचा मुलगा श्रेयसागर याला त्यांनी विदेशात शिक्षणासाठी पाठवले तो भाऊ पण पायलट झाला. आता लग्न करून तो बायकोसोबत सेटल झाला आहे.

आता सिनियर प्रसाद दाम्पत्याचे म्हणणे पडले की, आम्हाला नातवंड दिसले असते तर आम्ही त्यांच्यात सुख शोधले असते. मुलाला शिकवून आयुष्याची कमाई लावून पण एकाकी जीवन जगावे लागत असेल तर आम्ही खर्च केलेला पैसा आम्हाला परत हवा आहे.

तर अशा पद्धतीने कोर्टात गेलेल्या या प्रकरणाची देशभर चर्चा सुरु असून यामुळे सिनियर प्रसाद यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. या विषयावर अनेक मिम्स बनत असले आणि यावर हास्यास्पद प्रतिक्रिया देत असले तरी या विषयावरून सोशल मीडियावर आधुनिक जीवनशैली, ढासळती कुटुंब व्यवस्था या विषयांना पुन्हा एकदा वाचा फुटली आहे.

काही वर्षांपूर्वी Raphael Samuel ने आईबाबांनी जन्म दिला म्हणून कोर्टात खेचले होते आणि आता हे प्रकरण!! तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
 

 

सबस्क्राईब करा

* indicates required