computer

मेंदूचा दुर्धर आजार होऊनही त्याने JEE Advance परीक्षेत ३५ वा क्रमांक पटकावलाय....कौतुक तर झालंच पाहिजे !!

"असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी" हे काही खरं नसतं. हरीने तरी कुणाकुणाकडे पाहावं ना? त्यामुळं स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागत असते. ही गोष्ट अनेक लोकांना खूप वर्षं घालवूनही कळत नाही. पण एका १८ वर्षांच्या तरुणाला मात्र ही गोष्ट चांगलीच कळाली होती.

परिस्थितीला दोष देत बसून राहिले तर कुणी आपल्याला मदतीला येत नसते.

राजस्थानचा पार्थ द्विवेदी नावाचा तो तरुण!! मेंदूचा अतिशय दुर्मिळ असा आजार त्याला झाला आहे. जीवघेणा आजार झाला आहे म्हणून त्याने हार मानली नाही. २७ सप्टेंबरला त्याने दवाखान्यातून एक दिवस सुटी घेतली कारण त्याला जेइइ ऍडव्हान्स ही परीक्षा द्यायची होती. ५ ऑक्टोबरला या परिक्षेचा निकाल आला. या मुलाने पूर्ण भारतात चक्क ३५ वा क्रमांक त्याने मिळवला आहे.

पार्थचे आई वडील लखनऊला राहतात. परीक्षा ३ आठवड्यांवर आली असताना त्याला meningoencephalitis नावाचा आजार झाल्याचे निदान डॉक्टरांकडून करण्यात आले. दिल्लीच्या एका दवाखान्यात त्याला आयसीयू वॉर्डमध्ये भरती करण्यात आले होते.

या काळात त्याला प्रचंड त्रास होत होता. पण त्याने अभ्यास सोडला नाही. कारण ही परीक्षा त्याचे पूर्ण भविष्य निश्चित करणार होती. डॉक्टरांनी त्याच्या सगळ्या तपासण्या करून त्याला पेपरसाठी जाऊ दिले. निकाल आल्यावर त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. निकालाच्या दोन दिवसानंतर त्याला बरे वाटत असल्याने डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला.

ऑगस्ट महिन्यात जेइई मेन्समध्ये त्याला १००टक्के (परसेंटाइल) मार्क्स मिळाले होते. पण त्यानंतर काहीच दिवसांनी तो आजारी पडला होता. पार्थ म्हणतो की, "लोक म्हणायचे की ऐन परिक्षेच्या वेळी या मुलाला भीषण आजार झाला. किती मोठे बॅडलक म्हणायचे!!" पण त्यावेळी मी स्वत:ला सांगितले, "आपण कोटाला शिकलो, आपल्या आई वडिलांनी आपल्याला सुखसोयी पुरविल्या, त्यावेळी आपण कधी देवाला विचारले नाही, या सुखसोयी मलाच का? आता आजार झाल्यावर तरी का देवाला विचारायचे मीच का? आपण अशावेळी फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे."

या १८ वर्षांच्या तरुणाचा मोठपणा एवढा की, आजार झालेला असताना, देशात ३५ वा क्रमांक मिळवून देखील तो सांगतो की, आपला संघर्ष खूप मोठा नाही, जगात अनेक लोकांना अनेक कठीण संघर्षामधून जावे लागते, प्रत्यकाचा संघर्ष वेगळा असतो. पार्थसारखी जिद्द प्रत्येकाने केली तर त्यांचे वर्तमान आणि भविष्य वेगळे असेल हे नक्की...

सबस्क्राईब करा

* indicates required