computer

अमेरिकेतला पैलवान रशियात जाऊन हिरो कसा ठरला? कथा जगातल्या सर्वात बलदंड वैलवानाची!!

काही माणसं जन्माला येतात ती प्रचंड कर्तृत्व गाजवण्यासाठीच. त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या त्यांच्या प्रांतात त्यांनी केलेली कामगिरी इतकी अचाट असते, की काळाची पानं कितीही उलटली तरी त्यांचं नाव विस्मरणात जात नाही. उलट ते जास्तच ठळकपणे पुढे येत राहतं. अशाच एका माणसाची ही गोष्ट. 

त्याचं वय होतं अवघं २२, पण वजन होतं तब्बल ३४० पौंड. अंगासरशी घट्ट बसलेल्या शर्टाच्या बाह्यांमधून त्याच्या दंडाचे पिळदार स्नायू जणू फुरफुरत होते, एक नवा विक्रम करण्यासाठी शिवशिवत होते. जमलेले प्रेक्षक गंभीर चेहऱ्याने, श्वास रोखून बघत होते. 

या खेळाडूचं नाव होतं पॉल अँडरसन. आता तो एका विश्वविक्रमाच्या तयारीनेच मैदानात उतरला होता. याआधी ३८० पौंड वजनाचं बारबेल त्याने लीलया उचललं होतं. यापुढच्या टप्प्यात त्याला ४०२ पौंडांचं वजन उचलायचं होतं. त्यामुळे त्याआधीच्या विक्रमापेक्षा कमीत कमी २० पौंड वजन जास्त उचलून तो नवीन रेकॉर्ड करणार होता.  मॉस्कोच्या गॉर्की पार्कमध्ये शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने हा सोहळा रंगला होता. ४०२ पौंडांचं बारबेल समोर आल्यानंतर त्याने पहिल्यांदा प्रयत्न केला, तेव्हा त्याला ते खांद्यापर्यंत उचलत आलं. मात्र त्याच्या पलीकडे जाण्यासाठी दंडाच्या स्नायूंची ताकद थोडीशी कमी पडली.

पॉल अर्थातच एवढ्यावर हार मानणार नव्हता. त्याच्या दृष्टीने हा पहिला प्रयत्न प्रयत्नच असणार होता. दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्याने पूर्ण ताकदीनिशी आणि आणि पूर्ण आत्मविश्वासाने हे वजन खांद्यांच्या वर उचललं आणि ते डोक्याच्या वर उचलून तो ठामपणे उभा राहिला. प्रेक्षकांमध्ये अभूतपूर्व जल्लोष झाला. लोक आरडाओरडा करत खुर्च्यांवर उभे राहिले. काहींनी तर म्हणे आपल्या हॅट्सपण हवेत उधळल्या! साहजिकच होतं. एका अनोख्या ऐतिहासिक क्षणाचे ते साक्षीदार होते! एक अमेरिकन रशियात हिरो ठरला होता.

दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ अमेरिकन वेटलिफ्टिंग साठी सुवर्णकाळ मानला जातो. या काळात जग हळूहळू उभं राहात होतं. 1945 ते 60 या कालावधीत बॉब हॉफमन नावाच्या दिलदार गृहस्थाने वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकाराच्या भरभराटीसाठी एकहाती मदत करायला सुरुवात केली. त्याने अनेक नॅशनल चॅम्पियनशिप्स प्रायोजित (स्पॉन्सर) केल्या. ऑलिंपिकसारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं. अँडरसन हा त्यातलाच एक नशीबवान खेळाडू. 

पॉल अँडरसनचा जन्म उत्तर जॉर्जिया प्रांतातला. खरंतर लहानपणापासून त्याला तब्येतीच्या अनेक तक्रारी होत्या. किडनीचं दुखणं त्याला जन्मभर पुरलं आणि त्या विकारानेच त्याचा ६१ व्या वर्षी मृत्यू ओढवला. असं होतं तरी त्याचं शरीर मात्र एखाद्या फुग्यासारखं अवाढव्य बनत चाललं होतं. त्यातूनच त्याची वेटलिफ्टिंगकडे ओढ वाढायला लागली. मग त्याने समविचारी वेटलिफ्टर्सचा एक ग्रुप जॉईन केला आणि भंगारात फेकून दिलेल्या वस्तूंचा वापर करून घरातच एक जिम सुरू केलं.

१९५० च्या दशकाच्या सुरुवातीला त्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. त्याचं शरीरसौष्ठव, शारीरिक ताकदीचे अचाट प्रयोग प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवायचे. मॉस्कोच्या गॉर्की पार्कवर आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी आलेल्या सहा जणांच्या अमेरिकन चमूमध्ये खरंतर अँडरसनचा समावेश अपघातानेच झाला होता. अगदी शेवटच्या क्षणी त्या टीममधल्या एका जखमी सहकाऱ्याऐवजी त्याची निवड झाली होती. झाडाच्या खोडासारखे जाडजूड आणि दणकट हात-पाय आणि प्रचंड शरीर असलेला हा खेळाडू म्हणजे सामान्यांसाठी एक कुतुहलमिश्रित आश्चर्य ठरलं होतं आणि आणि ती संध्याकाळही त्याचीच होती. टीममधल्या इतरांपेक्षा तो कसा आणि किती वेगळा आहे हे त्याने आपल्या कामगिरीतून सिद्ध केलं होतं. 

मायदेशात परत आल्यानंतर अँडरसनचं जंगी स्वागत झालं. जॉर्जिया प्रांताच्या गव्हर्नरने ५ जुलै हा दिवस अँडरसन डे म्हणून जाहीर केला. अटलांटाच्या मेयरने शहराच्या चाव्या त्याच्याकडे सुपूर्द केल्या. १९५६ मध्ये मेलबर्न ऑलिंपिकमध्ये अमेरिकेने सुवर्णपदक जिंकल्यानंतर अँडरसन हा खऱ्या अर्थाने व्यावसायिक खेळाडू बनला. मात्र या वैभवाला लवकरच उतरती कळा लागली. अमेरिकेत वेटलिफ्टिंगला असलेलं आर्थिक पाठबळ कमी होऊ लागलं. अँडरसनने जॉर्जिया मध्ये अँडरसन युथ सेंटर ही संस्था सुरू केली. मुख्यत: प्रॉब्लेम टीनेजर्ससाठी ही संस्था काम करते.

आज वेटलिफ्टिंगमध्ये वरचष्मा आहे तो मुख्यतः सोव्हिएत रशिया आणि बल्गेरिया यांचा, पण अमेरिकन वेटलिफ्टिंगचे चाहते असलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनातलं अँडरसन आणि त्या जून १९५५ चं स्थान अजूनही कायम आहे. असाच कोणी दुसरा अँडरसन जन्माला येईल आणि अमेरिकन वेटलिफ्टिंगला पुन्हा ते 'सोनियाचे दिनु' दाखवेल हा विश्वासही त्यांच्या मनात तितकाच अढळ आहे. शेवटी विश्वासावरच तर सगळं जग चालतंय, नाही का?

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required