केवळ प्लास्टिक बॉटल आणि ब्लीचचा वापर करून फिलिपाईन्सच्या लोकांनी दिवा कसा तयार केला?

मध्यंतरी मुंबई शहरात वीज गेली होती तेव्हा किती गोंधळ झाला होता आठवतोय? शहरात लाईट जाणे म्हणजे शहर थांबणे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत पण नकळत ही यादी किती लांबत चाललीये हे आपल्याला कधीकधी लक्षातही येत नाही. इंटरनेट, वीज याशिवाय आपण आयुष्याचा विचारही करू शकत नाही. आजकाल सर्व डिव्हाईस चार्ज करावे लागतात. आता नवीन गाड्याही इलेक्ट्रिक होत आहेत. यावरून लक्षात येतं की आधुनिक जगात इलेक्ट्रिसिटी किती महत्वाची आहे.
शहरात एक बटन दाबलं की वीज चालू होते. पण आज अजूनही अनेक गावं आहेत जिथे वीज पोहोचलेली नाही. तिथले लोक अजूनही घरात दिवा लागावा म्हणून वाट पाहत आहेत. फिलीपिन्समध्ये असंच एक गाव आहे जिथे अजून वीज पोहोचली नाही. ही गरज ओळखूनच लिटर ऑफ लाईट या संस्थेने विजेसाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. त्यासाठी अगदी रोजच्या जीवनातल्या साध्या गोष्टी वापरल्या गेल्या आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या, पाणी, गॅल्वनाइज्ड स्टील आणि थोडसं ब्लिच यापासून ही वीजनिर्मिती झाली आहे.
एक व्हिडिओत ही अनोखी पद्धत दाखवली गेली आहे. यामध्ये स्टीलच्या बनलेल्या छतांच्या वर प्लास्टिकच्या बाटल्या बसविल्या जातात. बाटलीमध्ये ब्लीच असल्याने, ते प्रकाश प्रतिबिंबित करते आणि खोलीत दिवा लागतो. याला बाटली लाईट असंही म्हणतात. हे दिवे ५०W बल्ब इतकाच प्रकाश देतात. शिवाय खर्च नाही आणि मेंटेन करणेही सोपे असते. यासाठी ही संस्था प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करते.
लिटर ऑफ लाईटने पंधराहून अधिक देशांमध्ये ३,५०,००० हून अधिक बाटली दिवे बसवले आहेत. अनेक तळागाळातील उद्योजकांनाही याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. या संस्थेला अनेक ठिकाणी हे दिवे पोहोचवायचे आहेत.
गरज ही शोधाची जननी म्हणतात. या संस्थेने हेच सिद्ध केले आहे. अनेकांच्या घरात दिवे उजळून लिटर ऑफ लाईट या संस्थेने खूप मोलाचे काम केले आहे. या बाटली दिव्यांबरोबरच हातात घेऊन जाता येतील असेही दिवे बनवण्याचे काम चालू आहे. अनेक अंधारात असणाऱ्या कुटुंबासाठी ही एक प्रकाशवाट आहे असंच म्हणता येईल.
लेखिका: शीतल दरंदळे