जर्मन सैनिकाने कबूतराकडून संदेश पाठवला आणि तो १००वर्षांनंतर मिळाला आहे!!

टेक्नॉलॉजीमुळे सध्या एका सेकंदात कुठेही मेसेज पाठवणे शक्य झाले आहे. त्याआधी पत्रव्यवहार व्हायचा. साधारण एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पत्र पोहोचवायला बरेच दिवस लागायचे. पत्रव्यवहारही नसलेल्या काळात कबुतरामार्फत संदेश पाठवला जायचा. पहिल्या महायुद्धात याच पद्धतीने संदेश पोहोचवले जायचे. त्याकाळी सैनिकांएवढीच कबुतरांनी देखील महत्त्वाची कामगिरी बजावली होती. आज आम्ही जी बातमी सांगणार आहोत ती अशाच एका संदेशवाहक कबुतराची आहे. मात्र हे कबुतर इतरांच्या मानाने बरेच लेट लतीफ निघाले.
(प्रातिनिधिक फोटो)
त्याचं झालं असं, नुकतंच तब्बल १००हून जास्त वर्षांनंतर एका पर्शियन सैनिकाने आपल्या सिनियरला लिहिलेले पत्र सापडले आहे. योग्य माणसाकडे पत्र जाईल या आशेने त्या सैनिकाने पत्र पाठवलं होतं. पण नेमकं काय घडलं कोणास ठाऊक, पत्र पोहोचूच शकलं नाही. आता १०० वर्षांनंतर योगायोगानेच ते पत्र फ्रांसच्या दाम्पत्याला रस्त्यावर सापडले आहे. हे जोडपं रस्त्याने जात असताना त्यांना अल्युमिनियमची एक डबी सापडली. त्यात हे पत्र होतं.
पहिल्या महायुद्धात झालेल्या काही भीषण लढायांपैकी एका लढाईत हे पत्र लिहिले गेले होते. आता हे पत्र फ्रान्स जपून ठेवणार आहे. सुरुवातीला पत्राचा मजकूर समजून घेणं कठीण होतं, पण आता तो डिकोड करण्यात आला आहे. पत्रात नेमकं काय आहे हे सार्वजनिक करण्यात आलेलं नाही. फ्रान्समधील लिंडा नावाच्या म्युझियममध्ये हे पत्र ठेवण्यात येणार आहे. म्युझियमकडून भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनांमध्ये देखील हे पत्र ठेवले जाईल.