computer

७ लाख स्क्वेअर फुटांच्या मॉलमध्ये लपाछपी का खेळतायत लोक ?? कुठून आलं हे खूळ ?

मंडळी, फेसबुकवर दिलेल्या हाकेने काय नाही होऊ शकत? दोन महिन्यांपूर्वी एरिया-५१ वर धाड टाकण्यासाठी एकाने फेसबुक इव्हेंट बनवला होता. लाखो लोकांनी भाग घेण्याची तयारी दाखवली. धाड कशी घालायची याची तयारी पण लोक करू लागले होते. नंतर समजलं की  इव्हेंट बनवणाऱ्याने ‘मस्करी’ केली होती.

तर, या फेसबुक इव्हेंट प्रकाराने जगातल्या सगळ्यात मोठ्या फर्निचर कंपनीची डोकेदुखी वाढवली आहे. आणि हे आत्ताचं नाहीये बरं. साधारण ३ वर्षापासून हे सुरु आहे.

या कंपनीचं नाव आहे आयकिया. आयकिया फर्निचर उत्पादनासाठी ओळखली जाते. या कंपनीचे जगभरात मोठमोठे फर्निचरचे मॉल्स आहेत. या मॉलचा आकार कमीतकमी ३ लाख स्क्वेअर फूट एवढा असतो. जगातलं सर्वात मोठं आयकिया स्टोअर तब्बल ७ लाख स्क्वेअर फूट एवढं मोठं आहे. काही वर्षांपूर्वी कोणीतरी शोध लावला की या भल्यामोठ्या जागेत लपाछपी खेळता येईल. मग काय, फेसबुकवर इव्हेंट बनवण्यात आला. हजारो लोकांनी त्यात भाग घेतला. यात आयकियाचे कर्मचारी आणि पोलिसांची तारांबळ उडाली.

हे आज सागण्याचं कारण असं, की नुकताच स्कॉटलंडच्या ग्लासगोमधल्या आयकिया स्टोअरमध्ये लपाछपी खेळण्यासाठी लोक जमले होते. कोणी फ्रीजमध्ये लपलं तर कोणी बेडखाली. काहींनी तर पॅकिंग बॅगमध्ये आश्रय घेतला होता. मिळेल त्या जागेत लोक लपले होते.

याचा पत्ता आयकियाच्या कर्मचाऱ्यांना लागला. पोलिसांना बोलावण्यात आलं. जे तिथे खरेदी न करता फक्त खेळायला आले होते त्यांना मॉलमधून हाकलून देण्यात आलं. या लोकांची संख्या तब्बल ३००० एवढी होती. सगळ्यांना एकत्र करण्याचं काम फेसबुक इव्हेंटने केलं होतं.

मंडळी, २०१५ साली आयकियाने यावर बंदी आणली होती. आयकियाचं म्हणणं आहे, की “आम्हाला आमच्या ग्राहकांची सुरक्षितता महत्वाची आहे. पण आम्हाला जर माहितीच नसेल की ते कुठे आहेत तर आम्ही त्यांना सुरक्षित कसे ठेवणार?” आयकियाच्या म्हणण्यात पॉईंट आहे राव.  लपाछपीच्या नादात जीवावर बेतू शकतं.

आता विचार करा हे वेड भारतात आलं आणि आपल्याकडच्या मॉलमध्ये लोकांनी लपाछपी खेळायला सुरुवात केली तर? काय गहजब होईल?

सबस्क्राईब करा

* indicates required