या कारणावरून युपीच्या पोलिसांनी एकमेकांना बदडलं !!

लहान असताना आपण खिडकीत जागा मिळावी म्हणून भांडायचो. काहींना केबीनमध्ये बसण्याची हौस असायची. , मग मी तिथेच बसणार हा हट्ट काही करायचे तर काहींना कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसण्याची हौस असते. अशी इच्छा फक्त लहान मुलांना होते असे नाही मंडळी. ती मोठ्यांना पण असले डोहाळे बरेचदा लागतात. आपल्याला वाटतं की मोठे लोक असे जागेवरून भांडण ते करत नसतील. पण जर तुम्हाला असे सांगितले की बसण्याच्या जागेवरून पोलिसांनीच एकमेकांना दणके दिले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, नाही का?
युपीचे लोक म्हणजे काय नमुने असतात याचा अजून एक पुरावा समोर आला आहे. तिथे पोलिसांनी एकमेकांना धुऊन काढले आणि त्यामागे कारण काय होते, तर पोलिसांच्या पेट्रोलिंग गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसता यावे. अशा कारणासाठी मारहाण करणारे लोक किती महान असतील याचा विचार करा राव!!
युपीच्या बिठूर पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे. खरंतर समाजात शांतता ठेवण्याची जिम्मेदारी पोलिसांची असते. त्यांनी जबाबदारपणे वागायला हवे ही अपेक्षा असते. पण स्वतःच कायदा हातात घेत या भाऊंनी एकमेकांची यथेच्छ धुलाई करून टाकली. राजेश सिंग आणि सुनील कुमार असे त्या दोन्ही कॉन्स्टेबल्सची नावे आहेत.
पेट्रोलिंगसाठी जात असताना त्यांच्यात ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसण्यावरून वाद झाला, सुरुवातीला शिवीगाळ झाली. हळूहळू वाद वाढला आणि गोष्ट थेट मारामारीपर्यंत गेली. हा विडिओ जोरात वायरल व्हायला सुरुवात झाल्यावर युपी प्रशासनाला जाग येऊन त्यांनी या दोन्ही कॉन्स्टेबल्सना निलंबित केले आहे.
काही दिवसांपूर्वी लाच घेण्यावरून पण काही पोलीस एकमेकांशी भिडले होते, त्याचा विडिओ पण प्रचंड वायरल झाला होता. ज्यांना आपल्यासाठी भांडायला तिथे ठेवले आहे, ते अशा गोष्टीसाठी भांडतात राव!!
लेखक : वैभव पाटील.