५०,००० डॉलर किंमतीच्या पोलिओ व्हॅक्सिनच्या चोरीची कथा....कोणी, कुठे, कधी चोरल्या होत्या ?
सध्या आपल्याकडे आणि एकंदर जगातच व्हॅक्सिनचा विषय हॉट टॉपिक बनला आहे. करोनावर लस कधी येणार? ती सामान्य लोकांना कधी उपलब्ध होणार? हे प्रश्न बहुतेकांसाठी कळीचे मुद्दे बनले आहेत. कल्पना करा, या व्हॅक्सिनच्या क्रेट्स आपल्याकडे आल्या आहेत, त्या कधी कुठे कशा वितरित करायच्या याचा प्लॅन तयार आहे, आणि अचानक त्याच कुणी चोरून नेल्या तर... केवढा हाहाकार माजेल! अन हे यापूर्वी इतिहासात घडलंय! त्याचीच ही गोष्ट आहे.
कॅनडामधल्या मॉन्ट्रियल शहरातल्या युनिव्हर्सिटी लॅबमध्ये पहाटे ३ च्या सुमारास काही बंदूकधारी शिरले. त्यांनी रात्रीच्या पहारेकऱ्याला लॅबमधलं मंकी डिपार्टमेंट कुठे आहे हे दाखवायला सांगितलं आणि नंतर त्याला तिथेच असलेल्या टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या पिंजऱ्यात कोंडला. काय होतं त्या मंकी डिपार्टमेंटमध्ये?
तिथे होतं सुमारे ५०,००० डॉलर किमतीचं पोलिओ व्हॅक्सिन. त्यावेळी क्युबेक प्रांतात पोलिओचा मोठा उद्रेक झाला होता. त्यामुळे तिथे वितरण करण्यासाठी मॉन्ट्रियलच्या लॅबमध्ये साठवलेली लस लाखमोलाची होती. नेमकी त्याचीच चोरी करण्याचा त्या चोरांचा डाव होता. त्यांनी तिथून २ वाहनांमध्ये या व्हॅक्सिनच्या तब्बल २५ क्रेट्स भरल्या आणि पसार झाले.
मात्र या चोरीने वेगळीच पंचाईत करून ठेवली. याचं कारण म्हणजे या व्हॅक्सिनची इमर्जन्सी. या व्हॅक्सिनचा पुढचा टप्पा यायला अजून महिनाभर अवकाश होता. शिवाय व्हॅक्सिन म्हटलं की त्याचं रेफ्रिजरेशन आलं. त्यामुळे चोरी झालेल्या क्रेट्स जर ४८ तासांत परत मिळवता आल्या असत्या तरच हे व्हॅक्सिन वापरण्यायोग्य स्थितीत राहणार होतं. या परिस्थितीचा बळी ठरणार होती ती लहान मुलं. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यापेक्षाही चोरी झालेलं व्हॅक्सिन कुठे आहे त्याचा ठावठिकाणा शोधणं जास्त महत्त्वाचं होतं. अगदी तपास करणाऱ्या खासगी गुप्तहेरांनाही अशाच सूचना दिलेल्या होत्या.
मध्ये बरेच दिवस गेले. या काळात पोलिसांना अधूनमधून काही टिप्स मिळत होत्या. शेवटी एक महत्त्वाचा धागा हाती आला. एक अनोळखी फोन. बोलणाऱ्या माणसानं पोलिसांना सांगितलं की ईस्ट मॉन्ट्रियलमधल्या एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये सगळा माल ठेवला आहे. पोलिसांनी तिकडे आपला मोर्चा वळवला. क्युबेकच्या पोलीस खात्यातला डिटेक्टिव्ह सार्जंट त्या पत्त्यावर पोहोचला आणि पाहतो तर काय? दरवाजा सताड उघडा होता. तो मारे हळूहळू कानोसा घेत, सावकाश पावलं टाकत तिकडे गेला होता. वेळ पडल्यास बंदुकीचा वापर करण्याचीही त्याने तयारी ठेवली होती. प्रत्यक्षात त्याची गरजच नव्हती. त्या अपार्टमेंटमध्ये कुणीही नव्हतं. खोलीत बर्फाच्या लादीवर व्हॅक्सिनच्या कुप्या ठेवलेल्या होत्या. काही कुप्या कार्डबोर्डच्या खोक्यात भरून ठेवल्या होत्या तर उरलेलं व्हॅक्सिन बियरच्या बाटल्यांसह फ्रिजमध्ये बंदिस्त होतं. चोरी झालेला जवळपास सगळा माल परत मिळाला होता.
आता चोराला पकडायचं होतं. त्या बिल्डिंगच्या मॅनेजरच्या म्हणण्याप्रमाणं एका चाळीशीच्या माणसाने हे अपार्टमेंट आठवडाभरासाठी भाड्याने घेतलं होतं. पूर्ण भाडं रोखीनं आणि आगाऊ दिलं होतं. या इसमाला - रॉबिन्सनला - पोलिसांनी प्रमुख संशयित म्हणून शोधायला सुरुवात केली. सुमारे महिनाभराने तो गावाबाहेर एकाकी जागी एका शेतातल्या घरात सापडला. त्यावेळी वेषांतर केल्याने तो ओळखू येत नव्हता. अपेक्षेनुसार रॉबिन्सनने गुन्हा नाकबूल केला. पुढे त्याने असाही आरोप केला की पोलीस त्याच्यावर त्याने इतरांची नावं सांगावी म्हणून दबाव टाकत आहेत.
जे काही साक्षीपुरावे पुढे आले त्यात एक औषधविक्रेता, लॅबचा इन चार्ज यांनी रॉबिन्सनबरोबर आपले व्यवहार झाल्याचं सांगितलं. जिथे व्हॅक्सिन साठवण्यात आलं होतं ते अपार्टमेंट रॉबिन्सनने भाड्याने घेतल्याचं सिद्ध झालं. एवढा पुरावा न्यायाधीशांनी ट्रायलसाठी ग्राह्य धरला. दुसरीकडे परत मिळालेलं व्हॅक्सिन वापरण्यायोग्य स्थितीत असल्याचं सिद्ध झालं.
ट्रायलदरम्यान रॉबिन्सनने बॉब नावाच्या आणखी एका गुन्हेगाराचं नाव घेतलं. पोलिओ साथीच्या काळात रॉबिन्सनने शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोबाईल क्लिनिक्स चालू केली होती. अशाच एका क्लिनिकच्या माध्यमातून त्याची बॉबशी ओळख झाली होती. चोरीचं व्हॅक्सिन खरेदी करण्याचीही बॉबची तयारी होती आणि हा सौदा ८०० डॉलरला पक्का झाला होता.
चोरी झाल्यानंतर एका फार्मसी दुकानात साधारण ५०० डॉलरचा माल विकल्यावरच पोलिसांनी रॉबिन्सनला पकडलं होतं. त्यावेळी इतर साथिदारांची आणि लपवलेल्या व्हॅक्सिनच्या साठ्याची माहिती देण्याच्या बोलीवर त्याला सोडून देण्यात आलं. रॉबिन्सनने सांगितलं की बॉबला पकडण्यासाठी सावज म्हणून त्याचा पोलिसांनी वापर केला, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर तो स्वतःच या नाटकातून बाहेर पडला, पळून गेला आणि पुढे आपण मोबाईल क्लिनिकसाठी पुरेसं व्हॅक्सिन मिळवू शकलो नाही हे लक्षात आल्यावर पोलिसांना त्यानं अनामिक म्हणून फोनही केला.
एवढे ढीगभर पुरावे असतानाही या चोराची अखेर न्यायालयाने मुक्तता केली. कारण काय, तर म्हणे त्याला अटक करण्यासाठी तेवढा पुरावा पुरेसा नव्हता!
लेखिका: स्मिता जोगळेकर




