सहा महिन्यात पैसे दुप्पट - एक वर्षात लाईफ चौपट ?? तुम्ही कधी फसलात का अशा स्कीम मध्ये ??

१९९६ ची गोष्ट आहे. घरात ऑफीसात पैशाचा विषय चर्चेला आला, की शेरेकर नावाच्या माणसाचं नाव हमखास घेतलं जायचं.  बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा शेरेकरच्या स्कीममध्ये पैसे टाका, सहा महिन्यात दुप्पट असा सल्ला सगळेचजण एकमेकांना द्यायचे. कमीतकमी गुंतवणूक २००० पासून सुरु होत असल्यामुळे बर्‍याच जणांनी शेरेकरला पैसे द्यायला सुरुवात केली. त्यानंतरच्या वर्षात शेरेकरकडून आता एका महिन्यात पैसे दुप्प्ट करून देण्याची बातमी आली आणि शेरेकरच्या गुंतवणूकदारांमध्ये आणखी वाढ झाली. पण एक दिवस अचानक शेरेकरकडून पैसे येणे बंद झाले.  पण तोपर्यंत एकूण ९२००० लोकांचे पैसे बुडले होते. शेरेकरला अटक झाली, खटला चालला. आजच्या तारखेस ज्यांनी २००० रुपये गुंतवले होते, त्यांना १०० रुपये परत मिळाले आहेत.

पोंझी स्कीम (स्रोत)

अशा सगळ्या स्कीमना पोंझी स्कीम म्हटलं जातं. पोंझी स्कीम असं का म्हटलं जातं हे सांगण्यासाठी आम्ही एक वेगळा लेख लिहूच, पण पोंझी स्कीम म्हणजे गुंतवणूकादारांना त्यांच्या गुंतवणूकीवर प्रचंड अविश्वसनीय परतावा देण्याचे आमिष दाखवून घातलेला गंडा !!!

इथं बँकाच सात ते आठ टक्क्याच्या वर व्याज देऊ शकत नाहीत. तर हे कोण कुबेर लागून आलेत जे ५०/१०० टक्के व्याज देणार आहेत? असा साधा व्यावहारीक विचार न करता पैसे टाकणारे लोक हमखास अशा दगलबाज स्कीमचे बकरे बनतात. यामध्ये मग वय, शिक्षण , आर्थिक परिस्थिती वगैरेचा काही संबंध नाही. 

स्रोत

अशिक्षीत अडाणी माणसंच फक्त अशा स्कीममध्ये पैसे घालवतात असे नाही.  अगदी शिकली सवरलेली माणसं पण अशा स्कीममध्ये पैसे घालवून हात चोळत बसतात. क्रिकेटपटू राहुल द्रविड तर तुमच्या आमच्या परिचयाचे नाव आहे. राहुलचे पण २० कोटी रुपये असेच पाण्यात गेले आहेत. त्याचं झालं असं की, सूत्रम सुरेश नावाच्या एका इसमाने ' विक्रम इन्व्हेस्टमेंट 'नावाच्या एका कंपनीत राहुल द्रविडचे पैसे गुंतवले. वार्षिक ४०/५०  टक्के फायदा मिळवून देण्याच्या भूलथापा देऊन आधी काही दिवस पैसे परतही मिळाले  आणि मग अचानक पैसे मिळणे बंद झाले.  राहुल द्रवीडने पोलिसात तक्रार केली. सुरेशसह इतर चारजणांना अटक झाली. कोर्टात खटला चालू आहे.  पण पैसे गायब झालेत हेच फक्त या स्टोरीतले सत्य आहे. बरं, राहुल द्रविड हे एकच उदाहरण नाही. सायना नेहवाल, प्रकाश पदुकोण अशा बर्‍याच मोठमोठ्या लोकांनी पैसे याच पध्दतीने घालवलेले आहेत. ही कथा झाली मोठ्या श्रीमंत लोकांची. पण यात गुंतवणूक करणारे अनेक गरीबपण होते. या सगळ्यांचे  प्रॉव्हीडंट फंडाचे पैसे, स्वेच्छा निवृत्तीचे पैसे, अडीनडीला घरात असावेत म्हणून गृहिणींनी ठेवलेले पैसे, बँकेपेक्षा चार पैसे जास्त मिळतील या आशेवर ठेवलेले पैसे, रातोरात नाहीसे झाल्याचा अनुभव बर्‍याचजणांना आला असेल. 

स्रोत

शेरेकर आत गेल्यावर सीयु मार्केटींग आली. ती पण लाखो लोकांचे पैसे संपवून गेली. त्यानंतर सागाच्या झाडाच्या-चंदनाच्या झाडाच्या- बकरी पालनाच्या- एमूपालनाच्या -ससे पालनाच्या अशा एक नाही हाजार स्कीम्स आल्या असतील. शेवट एकाच सहा महिन्यात पैसे दुप्पट म्हणजे वर्षभरात आयुष्य चौपट !!!  

बरं, हे सगळं सगळीकडे होत असतं. पश्चिम बंगालच्या  'सारधा' सारख्या स्कीममध्ये हजारो कोटी तर गेलेच.  पण या स्कीमशी संबंधीत १३ जणांनी आत्महत्या पण केल्या. २०१७ च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ८४००० कोटी रुपयांचा झोल झाला आहे. 

बोभाटाच्या वाचकांची अर्थसाक्षरता वाढावी यासाठी काही झोल स्कीमची माहिती आम्ही देणार आहोत. हा लेख वाचल्यावर वाचकांना एक विनंती - जर तुम्ही अशा घोळात फसला असाल तर तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. 

आज आम्ही शेअर करत आहोत, बिटकॉईन वापरून लोकांना कसं फसवलं गेलं याची गोष्ट. 

स्रोत

आधी सांगतो बिटकॉईन आहे काय?  बिट्कॉइन ही एक आंतरजालावर असलेली क्रिप्टो करन्सी आहे. क्रिप्टो करन्सी  म्हणजे सांकेतिक माहितीने सुरक्षित केलेलं आभासी चलन. तसं पाहता करन्सी किंवा चलन हे प्रत्येक देशात असते. भारतात रुपया तर अमेरीकेत डॉलर आणि युरोपीयन महासंघात युरो हे चलन आहे.  बिट्कॉइन मात्र कोणत्याही देशाचे नाही. आंतरजालावर बिटकॉइनचा वापर गेल्या चार वर्षात वाढत होता.  एका बिटकॉईनची किंमत दहा ते बारा लाख रुपयापर्यंत पोहचली होती. केवळ या माहितीचा फायदा घेऊन लबाड लोकांनी भारतात बिटकॉइनवर आधारीत स्कीम बनवल्या.  ते हे करू शकले याचं करण एकाच होतं की हे बिटकॉईन कसे मिळवायचे, त्याची किंमत नक्की कशी वाढते वगैरे अतितांत्रिक माहिती सगळ्यांना असत नाही. तर, त्यापैकी एक GB 21 (Gain Bitcoin) ही एक स्कीम होती. या स्कीममध्ये अठरा महिन्यात १८० टक्के फायदा देण्याचा वायदा होता. आंतरजालावर सर्फींग करणारे अनेक लोक या स्कीममध्ये बकरे बनले. अमित आणि विवेक भारद्वाज या जोडगोळीने ही स्कीम सिंगापूरमध्ये एक कंपनी स्थापन करून प्रचार करायला सुरुवात केली. यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की आधी मोठमोठ्या शहरांमध्ये फ्री सेमीनार आयोजीत करायचे. बिटकॉईन -ब्लॉकचेन वगैरेची जुजबी माहिती या सेमिनारमध्ये दिली जायची. या टोळीपैकीच माणसं स्टेजवर येऊन मी कसे पैसे कमावले याचे अनुभव कथन करायची आणि जमलेल्या प्रेक्षकांना बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवण्यास उद्युक्त करायचे. प्रेरीत झालेले अनेक लोक मग पैसे गुंतवायचे. २०१५ साली जेव्हा स्कीमचे पैसे परत देण्याची वेळ आली तेव्हा या जोडीने एम कॅप नावाची दुसरी स्कीम सुरु केली. यामध्ये १२ महिन्यात २०० टक्के परतावा मिळेल  अशी घोषणा करण्यात आली. इतर सर्व भंपक स्कीमप्रमाणे ही स्कीम कोसळली. तोपर्यंत पुण्या-मुंबईतल्या ८००० लोकांना २००० कोटींचा फटका बसला होता.

अमित भारद्वाज (स्रोत)

२०१४ ते २०१८ या काळात अनेक स्कीम आल्या आणि गेल्या.  पण आजही बिटकॉइनच्या अनेक जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील. तसं पाहायला गेलं तर बिटकॉईन हे आभासी चलन असलं तरी ते क्रिप्टो चलन असल्यानं ते सुरक्षित आहे. काही लोक बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवणे कसं बेकायदेशीरआहे वगैरे फॉरवर्ड्स पाठवत असतात. पण तसं काही नाहीय. त्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते कारण त्याची किंमत वाढत जाते. पण... हे सगळं कसं करायचं हे माहित नसताना, फक्त कुणीतरी सेमिनार देऊन अर्धवट माहिती दिली की त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून आपला पैसा अशा लोकांच्या हाती सुपूर्द केला की तो पैसा बुडणारच !!

असो, आता अगदी खरं खरं  सांगा तुम्ही फसला आहेत का एखाद्या बिटकॉइनच्या झोलमध्ये?

सबस्क्राईब करा

* indicates required