computer

ही २४ वर्षांची मुंबईकरीण ६ टनाची बेस्ट बस चालवतेय!! जाणून घ्या तिला आणखी काय करायचं आहे..

टीप:  या संदर्भात अधिक माहिती आता प्रकाशात आली आहे. काही साईट्स वर दिलेल्या माहिती नुसार, बेस्ट खाजगी लोकांना गाडी चालवण्याचे ट्रेनिंग देते. या मुलीने बेस्ट कडून बस चालवायचे ट्रेनिंग घेतले आहे.  तिचा अजून तरी बेस्ट मध्ये नोकरी करण्याचा विचार नाही. खालील आर्टिकल मध्ये तिला R T O मध्ये नोकरी करायची आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.

आपल्या समाजात पुरुषी मानसिकता खूप खोलवर रूजली आहे. अजूनही मुलींवर बरीच बंधने बघायला मिळत असतात. त्यातल्या त्यात 'ड्रायव्हिंग म्हणजे फक्त पोरांची मक्तेदारी आहे बॉस!' याप्रकारचा ऍटीट्यूड पाहायला मिळतो. पण आता जमाना बदलत आहे राव!! 'मारी छोरीयाँ छोरों से कम है कै?' हा दंगलमधला डायलॉग पोरी सगळ्याच क्षेत्रात खरा करून दाखवत आहेत. आता हळूहळू मुलीसुद्धा ड्रायव्हिंग करायला लागल्या आहेत. ते ही साध्यासुध्या नाही, तर मोठमोठ्या गाड्या!!

मंडळी, एसटी महामंडळात गेल्या काही वर्षांपासून लेडीज कंडक्टर दिसायला लागल्या आहेत. पण ड्रायव्हर अजूनही पुरुषच दिसतात. रात्री अपरात्री गाडी चालवावी लागते. म्हणून मुलींनी बस, ट्रक यांच्यासारख्या गाड्या चालवायला नको असा एक समज आजूबाजूला दिसतो. पण समाजाला फाट्यावर मारत एका मुलीने लय मोठा पराक्रम केला आहे राव!! 

मुंबईची प्रतीक्षा दास बेस्टच्या बस चालवण्याचे प्रशिक्षण घेणारी पहिली महिला ड्रायव्हर ठरली आहे. अवघ्या २४ वर्षाच्या प्रतीक्षाने नुकतंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. ती सांगते की तिला खूप आधीपासून हेवी गाड्या चालवण्याची हौस होती. गेल्या सहा वर्षांपासुन या गाड्या शिकण्यासाठी ती प्रयत्नसुद्धा करत होती. आधी बाईकपासून सुरुवात करत कार, नंतर मग हेवी वाहने असा प्रवास तिने केला आहे.  २४ वर्षं वय म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत सहलीला जाणे, पिक्चर बघणे, ब्युटीपार्लरला जाणे अशा गोष्टी करण्याचे वय असते. पण या पोरीचा इंटरेस्ट मात्र वेगळ्याच गोष्टीत होता. आणि या इन्टरेस्टमुळेच ती मुंबईची पहिली महिला बस ड्रायव्हर ठरली आहे राव!! 

तब्बल ६ टन वजनाची गाडी मुंबईसारख्या प्रचंड ट्रॅफिक असणाऱ्या शहरात फिरवणे म्हणजे किती कठीण काम! पण तिच्यासाठी हे काम म्हणजे एन्जॉयमेंट आहे राव!! खरंतर प्रतिक्षाला इंजिनिअरिंग झाल्यावर आरटीओ ऑफिसर व्हायचे होते. पण त्यासाठी तिला हेवी वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे होते. आणि यासाठी तिला बस परफेक्ट वाटली आणि पोरगी कामाला लागली.  प्रतिक्षा आठवीत होती तेव्हापासून ड्रायव्हिंग करत आहे मंडळी!! एवढ्या कमी वयात अगदी दोन दिवसांत तिने बाईक शिकून घेतली होती. तेव्हा या गोष्टीचे तिच्या घरच्या लोकांनासुद्धा आश्चर्य वाटले होते. 

ती सांगते की जेव्हा ती बस चालवायला शिकत करत होती तेव्हा लोक म्हणायचे 'एक मुलगी काय बस चालवणार?' पण तिने सगळ्यांच्या नाकावर टिच्चून बस चालवून दाखवली राव!! ती पुढे सांगते की अजूनही बस चालवत असताना लोकं आश्चर्याने पाहतात की एक मुलगी कशी काय बस चालवू शकते? पण या सगळ्या गोष्टींना इग्नोर करत ती आनंदाने बस चालवत आहे.

प्रतिक्षा म्हणते, " मी गाडी चालवण्याचं स्वप्न पाह्यलं आणि ते पूर्ण केलं. तुम्हीही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलंत तर तुम्हांला हवं ते तुम्ही मिळवू शकता". तिचं यापुढचं स्वप्न आहे- लडाखची बाईक ट्रिप करण्याचं. तीही साधीसुधी नाही, तिला तिच्य ग्रुपची लीडर होऊन तिकडे जायचंय. तिचा आजवरचा प्रवास पाहता ती हे स्वप्नही सहज पूर्ण करेलच. प्रतिक्षाला तिच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बोभाटाकडून अनेकोत्तम शुभेच्छा!! 

सबस्क्राईब करा

* indicates required