computer

बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे भविष्यात या ७ उद्योगांना लागेल कुलूप!!

बऱ्याच सिनेमात “आज है तो कल नही” हा डायलॉग तुम्ही आम्ही ऐकलाय. मित्रानो, ज्या गतीने हे जग बदलते आहे ते बघून हा डायलॉग काहीच दिवसात बऱ्याचशा उद्योगांना ‘आज है तो कल नही’ करून टाकणार आहे.

टेक्नोलॉजीची पहिली झळ पोहोचली १९९८ साली कोडॅक कंपनीला. या कंपनीत तेव्हा २ लाख लोक नोकरी करत होते आणि जगातला ८५% फोटोग्राफीचा पेपर ही कंपनी पुरवत होती. पण थोड्याच दिवसात डिजिटल कॅमेरा आला आणि पुढच्या काही वर्षात कोडॅकला टाळं लागलं.

येणारे टेक्नोलॉजीची वादळ अनेक कंपन्यांना उध्वस्त करून जाणार आहे. आज आपण बघूया ऑटोमोबाईलचा उद्योग कसा बदलणार आहे.

१. सध्या आपण पेट्रोल, डीझेल, गॅस ही सर्व इंधन म्हणून वापरतो. आपल्या कारच्या इंजिनमध्ये शेकडो सुटे पार्ट्स असतात. थोडक्यात यादी द्यायची झाली तर इंजिन हेड, इंजिन ब्लॉक, क्रँक शाफ्ट, कॅम शाफ्ट, पिस्टन, रॉड्स, पिन, बेअरिंग, गिअर, चेन, बेल्ट, वगैरे...

रोल्स रॉइस सारख्या गाडीच्या इंजिनमध्ये तब्बल १४,००० सुटे भाग असतात, पण मंडळी येणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिनची जागा एक इलेक्ट्रिकल मोटर घेणार आहे. ज्यामध्ये फक्त २० ते २५ सुटे भाग असतील. साहजिकच या गाड्या आल्यावर ऑटो गॅरेज दिसेनासे होतील.

२. फक्त गॅरेजवालेच जातील असं नाही तर पेट्रोलपंपसुद्धा दिसेनासे होतील. चौकाचौकात गाडीचे चार्जिंग पॉइंट्स असतील. ५ ते १० मिनिटात गाडीची बॅटरी फुल चार्ज होईल. ही इलेक्ट्रिसिटी सुद्धा सोलर इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे त्याची किंमतही कमी असेल. थोड्क्यात पेट्रोल पंपाची गरजच संपेल.

३. सुट्या भागाची संख्या कमी झाल्यावर सुटे भाग विकणारे कंपन्याही कमी होतील आणि त्याचप्रमाणे सुटे भाग विकणारी दुकानेही नाहीशी होतील.

४. येत्या काही वर्षात अपोआप चालणाऱ्या इंटेलिजन्ट कार्स रस्त्यावर धावायला लागतील. या गाड्यांना ड्राईव्हरची आवश्यकताच नसेल. किंबहुना कारचा वापर करण्यासाठी मालकीची कार असण्याचीही गरज नसेल. ग्राहक फक्त अॅपच्या माध्यमातून गाडी दारापर्यंत बोलावून घेईल. साहजिकच उबर आणि ओला सारख्या टॅक्सी हेलिंग सर्व्हिसेसची पण गरज भासणार नाही.

५. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तर अपघातही कमी होतील. अपघात कमी झाले की कार इन्शुरन्स कंपन्यांची गरज कमीत कमी भासेल. या कंपन्यांनाही त्यांचे प्रीमियम कमी करावे लागतील. प्रीमियम कामी झाल्यावर कमाई पण कमी होईल. फारच थोड्या कंपन्या इन्शुरन्सच्या क्षेत्रात शिल्लक राहतील.

६. याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या रस्त्याच्या परिस्थितीबद्दलही अपोआप संदेश सरकारकडे पाठवत राहते. रस्त्यावरचे खड्डे खचलेले रस्ते. मोडकळीस आलेले पूल, या सर्वांची माहिती आपली कारच सरकारला कळवत राहील.

७. प्रवास सुखकर झाल्यावर लोक गर्दीच्या ठिकाणी किंवा शहराच्या दाट लोक वस्तीत घर घेण्यापेक्षा शहरापासून दूर घर घेतील. त्यामुळे रिअल इस्टेटचे भाव कोसळतील.

हे सर्व बदल आजच्या तारखेपासून फारसे दूर नाहीत. २०३० साली रस्त्यावरून धावणाऱ्या बहुतेक गाड्या इलेक्ट्रिकल असतील. या बदलाची दखल घेऊन वोल्व्हो कंपनीने २०१९ च्या नंतर पेट्रोल आणि डीझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता पर्यंत ऑटो मोबाईल उद्योगाने टेक्नोलॉजी हा प्रकार फारसा गांभीर्याने न घेतल्यामुळे येणाऱ्या काही वर्षात गाड्या अॅपल, गुगल, टेसला या कंपन्या बनवतील. टोयोटा, होंडा, हुंदाय यांच्या सारख्या पारंपारिक कंपन्या बंद करण्याची वेळ येईल.

लोकं शहरापासून दूर राहायला गेल्यामुळे शहरातले प्रदूषणही कमी होईल. पार्किंगसाठी जागा पुरेशी असेल. ट्राफिक जाम कमी होईल. शहरातल्या झाडांची संख्या वाढेल.

एकूण या बदलांचा विचार केला तर ग्राहकांचा भरपूर फायदा होईल, पण पारंपारिक ऑटोमोबाईल सेक्टर नाहीसे होण्याची शक्यता आहे.

वाचकहो, फक्त ऑटोमोबाईल सेक्टर नव्हे तर सर्वच क्षेत्रात असे बदल घडून येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं ? कोणते क्षेत्र कसे बदलेल? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत द्या.

सबस्क्राईब करा

* indicates required