computer

एका मंत्र्याच्या 'लफड्यामुळे' ब्रिटीश सरकार गडगडले त्याची गोष्ट !!

प्रेमप्रकरण की लफडं? हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. काहीवेळा अशा प्रकरणातून एखादे लोकशाही सरकार देखील गडगडल्याचा इतिहास आहे. साठीच्या दशकामध्ये घडलेले ‘प्रोफ्युमो अफेअर’ ही अशीच एक गाजलेली घटना होती.

पाश्चिमात्य संस्कृतीत बऱ्याचवेळा अशा रोमँटिक संबंधांकडे दुर्लक्ष केले जाते. पण साठीच्या दशकातील प्रोफ्युमो अफेअर या प्रेमप्रकरणामुळे राजकीय पेचप्रसंग तर निर्माण झालाच, पण सोबत सोव्हिएत रशियाच्या गुप्तहेरांचा त्यात हात असल्यामुळे हे पूर्ण अफेअर एखाद्या चित्रपटाच्या कहाणीसारखं गाजलं.

(जॉन प्रोफ्युमो आणि ख्रिस्तीन किलर)

बोभाटाच्या आजच्या लेखातून जाणून घेऊया काय होतं हे प्रोफ्युमो अफेअर.

जॉन प्रोफ्युमो तत्कालीन ब्रिटिश सरकारमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे मंत्री होते. सरकारचे युद्धखाते त्यांच्या अंमलाखाली होते. साहजिकच ग्रेट ब्रिटनच्या अनेक गुप्त कागदपत्रांचा आणि कारवायांचा त्यांच्यासोबत संबंध येतच होता. पण प्रत्येक माणसाच्या स्वभावाची एक कमजोर बाजू असते. जॉन प्रोफ्युमोची कमजोरी म्हणजे तो ‘बाईलवेडा’ होता. त्याचा फायदा मिखाईलोविच इव्हानोव्ह नावाच्या रशियन गुप्तहेराने घ्यायचे ठरवले.

इव्हानोव्ह तेव्हा ब्रिटनमधल्या वकिलातीत अधिकारी होता. पण तोही माणूसच!! त्याचं प्रेम जडलं होतं ‘ख्रिस्तीन किलर’ नावाच्या एका ब्रिटिश सुंदरीवर. ख्रिस्तीन फॅशन इंडस्ट्रीमध्ये मॉडेल म्हणून काम करायची आणि गरज पडल्यास देहविक्रय पण करायची. प्रेमात सगळं काही माफ असतं. इव्हानोव्हला ख्रिस्तीन किलर कॉलगर्ल म्हणून काम करते याची कधीच खंत नव्हती. शेवटी इव्हानोव्ह ठरला रशियन राजनैतिक अधिकारी!

(मिखाईलोविच इव्हानोव्ह)

जॉन प्रोफ्युमोच्या बाईल वेडेपणाचा फायदा करून घेण्याची वेळ आली तेव्हा इव्हानोव्हने ख्रिस्तीनला एखाद्या प्याद्याप्रमाणे वापरले. प्रश्न इतकाच होता की ख्रिस्तीन आणि प्रोफ्युमो यांची जोडी जुळवायची कशी? इथे प्रवेश झाला स्टिफन वॉर्ड नावाच्या एका ब्रिटिश नागरिकाचा. स्टिफन वॉर्ड ब्रिटनच्या हायफाय सामाजिक वर्तुळात मान्यता असलेला गृहस्थ होता. व्यवसायाने अस्थितज्ञ असलेला स्टिफन वॉर्ड जॉन प्रोफ्युमोच्या संपर्कात होता. इव्हानोव्हने स्टिफन गॉर्डच्या माध्यमातून ख्रिस्तीनची प्रोफ्युमो सोबत ओळख करून दिली.

यानंतरचे पाच महिने ख्रिस्तीनच्या फ्लॅटवर तिच्या आणि प्रोफ्युमोच्या प्रणयकिडा सुरु होत्या. इव्हानोव्हने ह्या फ्लॅटला वेगवेगळ्या ठिकाणी मायक्रोफोन लावून दोघांचे संभाषण रेकॉर्ड करून ठेवले होते. त्यानंतर ख्रिस्तीनच्या आग्रहाखातर प्रोफ्युमो सरकारी गोपनीय दस्तऐवज देत राहिला आणि ख्रिस्तीन ते इव्हानोव्हला पुरवत राहिली. 

(स्टिफन वॉर्ड आणि ख्रिस्तीन किलर)

ख्रिस्तीन किलर आणि प्रोफ्युमोचे लफडे चालू असताना तिचे इतर अनेकांशीही संबंध होते. अशाच एका प्रकरणात तिच्या प्रेमीने केलेल्या हल्ल्यानंतर उघडकीस आलेल्या माहितीमधून स्टिफन गॉर्ड, इव्हानोव्ह आणि प्रोफ्युमो यांची नावे पुढे येत गेली. सुरुवातीला लंडनच्या गॉसीप मासिकांमधून प्रोफ्युमो आणि किलर यांच्या कथा रंगवून सांगितल्या जायला सुरुवात झाली. पण या प्रकरणाचे गांभीर्य जेव्हा वाढत गेले तेव्हा रशियन सरकारने इव्हानोव्हला मायदेशी बोलावून घेतले.

सरतेशेवटी हे प्रकरण पार्लमेंटमध्ये गाजायला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रोफ्युमोने हे असे काहीच नाही असा पवित्र घेतला. काही महिन्यांनंतर राजकीय दबाव इतका वाढत गेला की संसदेसमोर त्याला सत्य काय ते सांगावेच लागले आणि त्याने त्याच्या प्रणयप्रकरणाची कबुली दिली. सोबत मंत्रीपदाचा राजीनामा पण सादर केला. तत्कालीन पंतप्रधान हॅरल्ड मॅकमिलन यांच्या सरकारच्या वाट्याला इतकी नालस्ती आली की प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करून हॅरल्ड मॅकमिलन यांनी पण राजीनामा दिला.

जॉन प्रोफ्युमोने राजीनामा देऊन स्वतःची सुटका करून घेतली. परंतु ख्रिस्तीनच्या नशिबात सुटका नव्हती. तिच्यावर खोटी साक्ष दिल्याचे आरोप लावून ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. स्टिफन गॉर्डची सखोल चौकशी करून त्याचे चरितार्थाचे मार्ग अनैतिक असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. अनेक प्रकरणे खोदून काढण्यात आली. कोर्टाकचेरीचा खर्च  न झेपल्याने स्टिफन गॉर्डने मानसिक तणावाखाली झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. जॉन प्रोफ्युमो राजकारणातून कायमचा निवृत्त झाला.

यानंतर ब्रिटिश माध्यमांनी दोन  प्रश्न उभे केले.

हे घडत असताना ब्रिटिश गुप्तहेर संस्था Mi5 काय करत होती?

स्टिफन वॉर्डचा ब्रिटिश राजघराण्यातील काही व्यक्तींचा काय संबंध?

Mi5 ला प्रोफ्युमो प्रकरणाची पूर्ण माहिती होती. पण त्यांचा विचार स्टिफन वॉर्डला ‘डबल’ एजंट’ बनवण्याचा विचार होता. त्यामुळे त्यांनी जॉन प्रोफ्युमोच्या प्रकरणाकडे सरळसरळ दुर्लक्ष केले. राहता राहिला प्रश्न राजघराण्यातील संबंधांचा तर हे खरे होते, की स्टिफन वॉर्डची सलगी ब्रिटिश राजघराण्यातील अनेकांशी होती. परंतु त्याखेरीज आणखी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

यानंतर अनेक वर्षे प्रोफ्युमो अफेअर राजकीय नैतिकतेच्या तराजूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मोजले गेले, पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हेन्स्की यांच्या प्रकरणाने हा नैतिकतेचा तराजू मोडूनच टाकला.

जनमानसात नैतिक आणि अनैतिक यांच्या व्याख्या गेल्या ६० वर्षांत बदलतच गेल्या आहेत, पण अशी प्रकरणं राजकारणात किती महाग पडू शकतात याचं प्रोफ्युमो अफेअर हे एक उदाहरण.

सबस्क्राईब करा

* indicates required