computer

चीनशी असलेलं नातं मोडून पब्जी भारतात कसं येणार? या आहेत महत्त्वाच्या बाबी!!

भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर काही दिवसांत भारत सरकारने ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. या अ‍ॅपच्या यादीत पब्जी नव्हते. त्यामुळे पब्जी फॅन्सनी हुश्श.... केले पण नंतर आलेल्या दुसर्‍या ११८ अ‍ॅपच्या यादीत मात्र पब्जीवर बंदी आली. भारतातल्या पब्जी फॅन्सना एक मोठ्ठा धक्का बसला. त्यानंतर आलेली बरीच मीम्स वगैरे तुम्ही बघीतलीच असतील. हा झाला इतिहास. जर तुम्ही 'डाय हार्ड' कट्टर पब्जी फॅन असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. पब्जी पुन्हा एकदा भारतात येण्याच्या तयारीत आहे!!

सरकारने पब्जीवर बंदी घातली खरी. पण पब्जी खर्‍या अर्थाने चीनी अ‍ॅप्लिकेशन होते का असाही प्रश्न आहेच. याचे कारण असे की पब्जी 'मेड इन चायना' नव्हते. ब्लूहोल स्टुडीओ नावाच्या एका कंपनीच्या दुय्यम कंपनीने म्हणजे पब्जी कार्पोरेशनने या अ‍ॅपची निर्मिती केली होती. गेल्या ऑक्टोबर महिन्यात पब्जी कार्पोरेशनचे क्राफ्टॉन या दुसर्‍या कंपनीत विलिनीकरण झाले. आता पब्जी-क्राफ्टॉन यांनी मायक्रोसॉफ्टच्या अझ्युर प्लॅटफॉर्मचा वापर करून पुन्हा भारतात येण्याचा घाट घातला आहे.

आपल्याकडे पालकांच्या दृष्टीने पब्जी ही मोठ्ठी डोकेदुखी होती. पण जागतिक पातळीवर हिशोब करायचा झाला तर भारत हे पब्जीचे खूपच छोटे मार्केट होते. पब्जीची जगभरातली उलाढाल $३०५ बिलीयन डॉलर्स आहे. पण त्यात भारताचा हिस्सा फक्त $४१.२ मिलियन डॉलर्सचा आहे. म्हणजे एकूण उलाढालीपैकी फक्त १.२% भारताचा आहे. पण भारतातील खेळाडूंची संख्या ज्या प्रमाणात वाढत होती ती लक्षात घेऊन पब्जी कार्पोरेशनला भारतात परत येण्याची इच्छा होणं साहजिकच आहे. गेल्या काहीच वर्षांत पब्जी १७.५ कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे आणि नियमित खेळणार्‍या युझर्सची संख्या ५ कोटींची होती.

जर निर्माती कंपनी कोरीयन होती तर प्रश्न असा आहे की चीनी अ‍ॅप्लिकेशनच्या यादीत पब्जीचे नाव का घातले गेले?

पब्जीचे निर्माते जरी कोरीयन असले  जरी कोरीयन असले तरी त्या कोरीयन कंपनीत टेन्सेंट या चीनी कंपनीचे १३.२% शेअर्स होते. अर्थात हाही आक्षेपाचा मुद्दा नव्हता. टेनसेंटने १३.२% गुंयवणूक करताना या अ‍ॅप्लिकेशनचे पब्लिशिंगचे हक्क पण घेतले होते. आता पब्लिशिंग राइट्स म्हणजे नेमके काय ते पण बघायला हवे. जशी एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शित करण्याची 'टेरेटरी' असते तसाच हा प्रकार असतो. टेनसेंटने पब्जीचे भारतात मार्केटींग करण्याचे आणि प्रोमोशन करण्याचे काँट्रॅक्ट घेतले होते. खेळाची वाढती लोकप्रियता बघता दिवसेंदिवस त्यांच्याकडे पब्जी खेळाणार्‍यांचा डेटा जमा होत होता. या डेटाचा दुरुपयोग होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने पब्जीवर बंदी आणली.

यावर उपाय म्हणून ज्या दिवशी बंदी जाहिर झाली त्या दिवसापासून पब्जी कंपनीने भारतासाठी टेनसेंटला वगळून भारतीय किंवा भारत सरकारला विश्वासार्ह वाटेल असा पब्लिशिंग पार्टनर शोधायला सुरुवात केली. याची पहिली पायरी म्हणून त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅझ्यूर प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची सुरुवात केली आहे. आता लवकरच भारतीय पार्टनर मिळाला की पब्जी पुन्हा एकदा भारतात परत येणार हे जवळजवळ निश्चितच झाले आहे. पब्जीच्या टॉप प्लेयर्सना आम्ही डिसेंबरपर्यंत परत येत आहोत असेही कळवल्याचे समजते आहे.

तर, प्लेयर्स लोक तयार रहा!

सबस्क्राईब करा

* indicates required