computer

पुण्यातल्या अक्षर नंदन शाळेची मुले रस्त्यावर का उतरली?

ग्रेटा थुनबर्ग ही अवघ्या १६ वर्षांची स्वीडिश मुलगी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती. हवामानाच्या बदलाचे संभाव्य धोके आणि  याबाबतची राजकीय उदासीनता याविरुद्ध तिनं गेल्यावर्षीपासून एक चळवळ सुरू केलीय. तिला तिच्या शाळेतून पाठिंबा तर मिळालाच, पण ही चळवळ आता देश-भाषा-संस्कृतीचे उंबरठे ओलांडून सगळीकडे पसरतेय.

(ग्रेटा थुनबर्ग)

आज '२० सप्टेंबर'ला जगभरातील मुले आज 'ग्रेटा थुनबर्ग'ने उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. आपल्या पुण्यातील अक्षर नंदन शाळेतील मुलेही या जागतिक स्तरावरील चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आज रस्त्यावर उतरली.

शिस्तबद्ध, एका ओळीत शाळेतून निघालेली मुले शाळेच्या परिसरात फलक घेऊन फिरली. मग सेनापती बापट मार्गावरील चौकात वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा बेताने कडेला आपले फलक उंचावत उभी राहिली.

मुलांनी स्वतः तयार केलेले फलक अतिशय बोलके आणि सर्जनशील शब्दांनी, चित्रांनी नटलेले होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनीही याची नोंद घेत कोणी फोटो काढले तर कोणी आस्थेने बोर्ड वाचत होते. वाटेत एका आजोबांनी तर प्रत्येकाला मायेने शाबासकीसुद्धा दिली. काही वेळातच पत्रकार मंडळीही तिथे पोचली. त्यांच्यासमोर न बुजता मुलं आपले फलक उंचावत तिथे शांत परंतु ठामपणे आपला संदेश देत उभी होती.

ही 'मूक जागृती फेरी' असल्याने कोणत्याही घोषणा नव्हत्या. पण शाळेच्या गणवेशात गटाने फलक घेतलेली मुले आपले म्हणणे नेमकेपणाने पोचवत होती.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केलेले फलक हे रिसायकल्ड पुठ्ठ्यांचे किंवा पाटीवर खडूने रंगवलेले होते. या कल्पनेतून मुलं आपलं म्हणणं मांडताना नेहमी प्लॅस्टिक किंवा नवेकोरे कागद आवश्यक नसतात हेच दाखवून देत होती.

आज ही मुलं त्यांना निर्मळ भविष्य द्यावे असे आर्जव घेऊन आपल्याकडे, आपल्या पुढ्यात येऊन ठाकली आहेत. त्यांच्यावर अशी वेळ येणं हेच दुर्दैवी आहे खरंतर! मात्र आता ही आपलीच लेकरं आपल्यापुढे त्यांच्या भविष्याबद्दल प्रश्न मांडताहेत, तर त्याकडे आतातरी आपण लक्ष देणार आहोत का?