computer

जादूगुडातील किरणोत्सर्गाचे बळी...वाचा भारताच्या युरेनियम खाणीचे काळे सत्य !!

मंडळी, आज बोभाटा एका निराळ्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधणार आहे. तसं पाहिलं तर ही गोष्ट साधीसुधी नाही, कारण अनेकांच्या आयुष्याचा तो प्रश्न आहे. 

किरणोत्सर्गी पदार्थांवर नेहमीच चर्चा घडत असते. त्याचा मानवावर आणि एकूणच निसर्गावर पडणारा प्रभाव आणि परिणाम, त्याचे उपयोग आणि त्याचा धोका इत्यादी मुद्दे चर्चेत असतात. आज आपण अश्याच भारतातील युरेनियम खाणीची एक विदारक कथा समजून घेणार आहोत. 

युरेनियम! काय असते हे युरेनियम? तर हा एक मूलद्रव्य आहे जे इतर बर्‍याच मूलद्रव्यांप्रमाणे भूगर्भात खनिजांच्या रुपात सापडते. युरेनियमच्या अणुस्फोटातून (Nuclear fission) मोठी ऊर्जा निर्माण होते.  वीज निर्मिती करण्यासाठी या उर्जेला अनन्यसाधारण महत्व आहे.  त्यामुळे जगातील सर्वच देशांना हे युरेनियम हवे असते परंतु याचे साठे काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध असतात. या युरेनियमचा वापर जसा वीज निर्मितीसाठी होतो तसाच अणुबॉम्ब बनवण्यासाठी सुद्धा होतो मंडळी!!  दुसर्‍या महायुध्दाच्या अंतीम टप्प्यात , अमेरिकेने जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर टाकलेले बॉम्ब हे युरेनियम पासूनच बनवले होते. 

मित्रांनो, सांगीतले तर कदाचित आश्चर्य वाटेल पण भारत अणुउर्जा निर्मितीसाठी १९४८ साली सज्ज होता.  सुरुवातीच्या प्रयोगासाठी कॅनडाने दोन टन युरेनियम ऑक्साइड पुरवले होते. १९५९ साली तारापूरचा अणु उर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला होता. भारताच्या या प्रयत्नात अनेक आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संस्थांनी काड्या केल्याच होत्या, उदाहरणार्थ, जहाजाने भारताकडे येणार्‍या हेवी वॉटर कॉलम आणि इतर यंत्रसामुग्रीला महासागरात ढकलून देणे वगैरे, पण तरीही आपण तारापूरचा प्रकल्प कार्यान्वित केलाच. असो, ही कहाणी नंतर कधीतरी !!

 

(तारापूरचा प्रकल्प)

आता आपल्या भारतात युरेनियम सापडते का हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच… तर होय! भारतात सुद्धा युरेनियमच्या दोन खाणी आहेत. आणि आज या लेखात आपण भारतातील सर्वात मोठ्या युरेनियम खाणीविषयी चर्चा करणार आहोत… त्याचे कारणही तसेच आहे मंडळी. बोभाटा नेहमीच सामाजिक प्रश्नांसाठी जागरूक राहून त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते हे तुम्ही जाणताच. तर मग चला, अश्याच एका खाणीची माहिती घेऊया जिच्यामुळे फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगासाठी काही ज्वलंत प्रश्न उभे झाले आहेत. 

(जादूगुडाचा युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्लांट)

जादूगुडा! हे नाव आज जागतिक पटलावर गाजते आहे… जादूगुडा येथे भारताची युरेनियम खाण आहे. भूगर्भातील खनिज काढून त्यामधील युरेनियम इथेच वेगळे केले जाते. झारखंड राज्यातील पुरबी सिंहभूम या जिल्ह्यात ही खाण आहे. याचे नियंत्रण ‘युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (UCI) द्वारे केले जाते. मुख्य विषयाकडे वळण्याआधी याची आणखी माहिती आणि इतिहास जाणून घेऊया… 

1951 साली इथल्या मातीत युरेनियम आहे असा शोध लागला आणि या खाणीची उभारणी सुरू झाली. 1967 पासून ही खाण युरेनियम काढण्यासाठी पूर्ण सुसज्ज झाली आणि तिने भारताची पहिली युरेनियम माईन हा किताब मिळवला. आज भारताच्या न्यूक्लिअर रिऍक्टर्सचा 25% वाटा ही एकटी खाण उचलत आहे. पण… हा पण अतिशय महत्वाचा आहे. कारण या खाणीवर होणारे आरोप! 

 

आता वळूया मुख्य विषयाकडे… आपल्या स्थापनेपासूनच जादूगुडा खाण अतिशय वादग्रस्त ठरली आहे. याची सुरुवात होते ती स्थानिकांच्या जमीन अधिग्रहणापासून. अनेकांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही. अजूनही हा वाद कायम आहे. दुसरा मुद्दा येतो युरेनियम तस्करीचा. 2008 साली एका टोळीकडे इथून चोरलेले 4 किलो युरेनियम सापडले. हे युरेनियम ते नेपाळमध्ये घेऊन चालले होते. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 5 कोटी इतकी होते. म्हणजेच इथे सगळा गलथान कारभार चालतो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पण मंडळी, हा गलथान कारभार इथपर्यंतच मर्यादित होता तर एक वेळ ठीक होते… या पेक्षा गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे… युरेनियमचे इथल्या परिसरात होणारे उत्सर्जन आणि त्यामुळे होणारे वाईट परिणाम! 

(युरेनियम वाहून नेणारा ट्रक)

आपल्याला हे वाचून नवल वाटेल की, तब्बल 1000 किलो अशुद्ध खनिजावर प्रक्रिया करून त्यापासून फक्त 65 ग्राम शुद्ध आणि वापरता येण्याजोगे युरेनियम प्राप्त होते. याचाच दुसरा अर्थ असा की इथल्या परिसरात प्रचंड प्रमाणात टाकाऊ पदार्थ ज्याला ओअर टेल्स असे म्हणतात ते  तयार होतात. ओअर टेल्स मध्ये काही प्रमाणात युरेनियमचा अंश असतोच आणि युरेनियम आजूबाजूच्या परिसरात मोकळ्या वातावरणात उत्सर्जित होत राहते. हे टाकाऊ पदार्थ खाणीद्वारे जवळच्याच एका तळ्यात सोडले जातात. इथे एका दिवसाला 2190 टन अशुद्ध खनिजांवर प्रक्रिया केली जाते म्हणजे तुम्हीच विचार करा मंडळी, इथले वातावरण किती दूषित असेल! 

ज्या तळ्यात हे अशुद्ध पदार्थ जातात तिथेच स्थानिकांची मुले खेळतात. इथे सगळा आदिवासी भाग असल्याने शिक्षणाचा अभाव बऱ्यापैकी आहे. याच तळ्याचे पाणी पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी सुद्धा वापरले जाते आणि इथेच गावातली जनावरे आणि इतर पशु पक्षी आपली तहान भागवत असतात. बरं, इथले पाणी वापरले नाही तरी धोका संपत नाही. कारण या पाण्यातून निघणारे विषारी वायू लोकांच्या फुफ्फुसात जातच असतात. एकंदरीत या भागात काय गंभीर परिस्थिती असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो.

 

युरेनियमच्या सान्निध्यात राहणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखे आहे मंडळी. किंबहुना, आतापर्यंत अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेतच. इथे किरणोत्सर्गामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण अतिशय जास्त आहे. इथल्या स्थानिक लोकांना अनेक आजार आणि विकार जडले आहेत. ते पुढीलप्रमाणे

या भागात बर्‍याच बालकांना जन्मत: शारिरीक विकृती असतात , जन्माला आलेल्या बालकाची वाढ अचानक खुंटणे , बालपणातच अचानक स्नायू कामातून जातात, अनेक बालकांना कॅन्सर सारखे दुर्धर रोग जडतात. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे फोटो बघीतलेत तर अंगाचा थरकाप होईल.  

ही झाली बालकांच्या दुर्दैवाची गोष्ट पण महिलांना पण अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. अनियमित मासिक पाळी. आणि अनेकवार होणारे गर्भपात या समस्या नियमीतच आहेत. या खाणींमध्ये काम करणार्‍यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाला किंवा रक्ताच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते.

लक्षात घ्या, जगभरात अनेक ठिकाणी युरेनियमच्या खाणी आहेत, पण तिथे स्थानिकांना हा धोका जाणवत नाही. मग जादूगुडा मध्येच का व्हावं? काय कारण असेल? तर सरकारचा आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा एवढाच एक निष्कर्ष यातून निघू शकतो. मग जेव्हा या घटना समोर आल्या तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन न झाली तरच नवल! अनेकांनी या विरोधात आवाज उठवला तेव्हा इथल्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी या परिसराचा अभ्यास करण्यासाठी एक कमिटी आमंत्रित केली. या कमिटीने काढलेला निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे… 

“आमच्या अभ्यासानुसार इथल्या शारीरिक विकृतीना इतर घटक जबाबदार आहेत. जसे की, आनुवंशिक रोग, कुपोषण, मलेरिया आणि काही प्रमाणात इथल्या लोकांना असलेली मद्यप्राशनाची सवय. याला रेडिएशन जबाबदार नाही.” 

या बाबतीत UCIL च्या अधिकाऱ्यांचे  मत असे आहे.की रेडिएशन वगैरे सगळ्या अफवा आहेत ज्या भारताच्या प्रगतीवर जळणाऱ्या पाश्चात्य आणि विकसित देशांनी पसरवल्या आहेत. भारत सुद्धा स्वतः युरेनियम मिळवू शकतो हे त्यांना सहन होत नाही. आम्ही उलट स्थानिकांसाठी बरेच चांगले काम केले असून अनेक शाळा आणि हॉस्पिटल बांधले आहेत. 

मंडळी, आता काय खरं आणि काय खोटं हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही पण डोळ्यासमोर कर्करोगानी ग्रस्त अशी बालकं दिसत असताना कोणाची बाजू खरी आणि कोणाची खोटी हे या खाणींपासून दूर असलेल्या लोकांनी ठरवणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखं आहे   सोबत इतर देशात असलेली कचरा विघटन आणि लोकांच्या आरोग्याची काळजी आपल्या भारतात दाखवली जात नाही हे सत्य नाकारता येत नाही.

मंडळी या लेखाच्या शेवटी काही क्लिप्स आम्ही जोडत आहोत त्या नक्की बघा आणि विचार करा !

जाता जाता… 

एका वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना इथल्या स्थानिक व्यक्तीने, ज्याची मुलगी युरेनियम मुळे कॅन्सर होऊन मरण पावली, त्याने एक गोष्ट सांगितली. फार पूर्वी, म्हणजे जेव्हा खाण नव्हती त्या जागी एक पिंपळाचे मोठे झाड होते. गावातली जुनी जाणती माणसे म्हणत असत की त्या झाडावर भूत राहते. कुणी त्या झाडापाशी गेले तर ते भूत हालहाल करून मारून टाकते. आता अर्थातच ही अंधश्रद्धा आहे. पण कशामुळे का असेना, त्या जुन्या माणसांना हे माहीत असावं का? की तिथे काहीतरी आहे ज्यामुळे माणसांना अपाय होऊ शकतो. आता एका झाडापुरते मर्यादित असणारे तेच भूत युरेनियमचे प्रदूषण बनून खूप मोठ्या परिघात थैमान घालते आहे.

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required