देनेवाला जब भी  देता, देता छप्पर फाडके...

Subscribe to Bobhata

"देनेवाला जब भी  देता,  देता छप्पर फाडके"  हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. खरोखर छप्पर फाडून पैशाचा पाऊस कधी पडलेला आठवतो आहे?
होय, मुंबईच्या इतिहासात असं एकदा घडलंय. १९४४ साली मुंबईच्या गोदीत एक प्रचंड स्फोट झाला. ज्या जहाजात हा स्फोट झाला ते जहाज सोन्याच्या विटा घेऊन ब्रिटनला निघालं होतं. या स्फोटाचा दणका इतका जोरदार होता की सोन्याच्या विटा गिरगावातल्या चाळींचे छप्पर फाडून अनेकांच्या घरात पडल्या होत्या. काहींनी त्या सरकारजमा  केल्या तर काहींनी त्या स्वतःच्या तिजोरीत जमा केल्या. ज्यांनी त्या जमा केल्या त्यांचं आयुष्य बदलून ते अब्जोपती झाले असतील असा विचार मनात आला असेलच. नाही का? पण सत्य परिस्थिती तशी नाही. ज्यांना सोन्याच्या विटा मिळाल्या ते तेव्हाही मध्यमवर्गीय होते आणि आजही ते मध्यमवर्गीयच आहेत. या कुटुंबांना भेटूनच नंतर हे विधान केलं आहे बरं का.  आता मला सांगा,  आजही कचर्‍यात पडलेल्या नोटा ज्याला मिळतील तो करोडपती बनेल का ?

(वेन पॉवर्स आणि टेड ऑफ्रा विनफ्रेसह)
मग प्रश्न असा पडतो की हे असं का होतं?  हा प्रश्न अमेरिकेतील एका लेखकालाही पडला होता. अमेरीकेत कमी आणि मध्यम आर्थिक स्तरावरचे बरेचसे लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा लॉटरीवर खर्च करतात. बरेच लोकं करोडपती होतात, पण तेही काही काळच! नंतर काही महिन्यांनी ते परत गरीब होतात. हा प्रश्न ज्या लेखकाला पडला होता त्याचे नाव  ’वेन पॉवर्स’.  त्याच्या मनात ही कल्पना आल्यावर त्याने त्याच्या सिनेनिर्मात्याशी चर्चा केली आणि एक प्लॅन बनवला. प्लान म्हणजे, कचरा कुंडीत एक लाख डॉलर ठेवायचे आणि  ज्याला हे पैसे मिळतील त्याच्या आयुष्यावर त्यानंतर एक सिनेमा बनवायचा . लेखकाच्या मनात दहा लाख डॉलर ठेवावे असा विचार होता, पण निर्मात्याशी चर्चा केल्यावर एक लाख डॉलर ही रक्कम नक्की करण्यात आली. या नंतर रोज कचराकुंडीतून कचरा म्हणजे डब्बा-बाटल्या वेचणार्‍या माणसाचा शोध सुरु झाला . अनेक दिवस वॉच ठेवल्यावर एक असा माणूस मिळाला जो अमेरिकन भाषेत "होमलेस " होता. आता ’होमलेस’ हा अमेरीकन कन्सेप्ट आहे. होमलेस म्हणजे बेघर, पण भिकारी नाही. होमलेस माणसं शक्य तितकं काम करून पोट भरतात आणि काम न मिळाल्यास भीक मागतात. जगभर समृद्धीचा डंका पिट्णार्‍या अमेरिकेत पण अशी माणसं आहेत? होय. केवळ आहेत असंच नाही तर अमेरिकेची ही मोठी समस्या आहे. 

चला, पैसे ठरले. माणूस मिळाला. आता पुढे काय झाले ते फारच इंट्रेस्टींग आहे. ज्या बेघर माणसाची निवड वेन पॉवर्सनी केली त्याचं नाव टेड रॉड्रीग्ज. टेड होमलेस होता. कचर्‍यातून डब्बा,बाटल्या गोळा करून दिवसभरात सरासरी वीस डॉलरची कमाई करायचा. अन्न, दारू आणि सिगारेट हा खर्च निघाला की दिवस संपला.  बरीच बेघर माणसं ड्रग्ज घेतात. टेडनेही ड्रग्ज वापरली नव्हती असे नाही, पण सुरुवातीच्या अनुभवानंतर तो त्या मार्गाला गेलाच नाही. त्याचं एकुलतं एक प्रेम होतं ते त्याच्या सायकलवर. दर आठवड्यात गॅरेजमध्ये  सायकल धुणं हा त्याचा आवडता कार्यक्रम होता. त्याच्या जिवाभावाचं असं कुणीच नव्हतं. नाही म्हणायला ज्या भंगारवाल्याकडे तो कचरा विकायचा, तेथे त्याची एका मुलाशी गट्टी होती. आपण त्याला टेडचा मानसपुत्र म्हणूया.
तर , ठरल्याप्रमाणे कचरा कुंडीत १००००० डॉलरची ब्रीफकेस ठेवून वेन पॉवर्स टेड रॉड्रीग्जची वाट बघत होता. टेड आला आणि त्याने कचरा धुंडाळायला सुरुवात केल्यावर त्याला नोटांनी गच्च भरलेली ब्रीफकेस मिळाली. 

(टेड रॉड्रिग्ज) 

दोन्ही फोटो स्त्रोत 
वेन पॉवर्स नंतर म्हणतो " नोटा बघितल्यावर टेड हरखला आणि दुसर्‍याच क्षणी घाबरला". या नंतर वेन पॉवर्सनी पुढे येऊन टेडची समजूत घातली. हे पैसे त्याचेच आहेत आणि हे घेतल्यावर पॉवर्सच्या कॅमेरावर सतत त्याचे पुढचे आयुष्य चित्रित केले जाईल ही अटपण त्याने कबूल केली.  यानंतर टेड  रॉड्रीग्जचं नवं आयुष्य सुरु झालं. पुढं काय झालं ते आता ऐका...


पॉवर्सनी पैशासोबत त्याला एक आर्थिक सल्लागार पण गाठून दिला होता. सल्ला मिळाला पण टेडने तो पाळला नाही. टेडनी पहिली खरेदी केली एक कार . त्याच्या मानसपुत्रासाठी. त्याच्याजागी आपण असतो, तर कदाचित आपणही तेच केले असते. साहजिकच तो मानसपुत्राला घेऊन फिरायला गेला. (आपणही तेच केले असते.)
टेडची बातमी ऐकल्यावर बाकीचे होमलेस त्याच्याभोवती गोळा झाले आणि त्यांची कर्जं टेडने फेडून टाकली.  (आपल्याबाबतीतही असेच झाले असते, आपण आपल्या नातेवाईकांची कर्जं फेडली असती.) 
मात्र इथं टेडच्या कहाणीनं एक नवं वळण घेतलं.
अनेक बायका  टेडच्या भोवती घुटमळायला लागल्या होत्या. टेडने त्यांच्यावर पैसे उधळायला सुरुवात केली. त्याच्याच शब्दात सांगायचे तर "बायका आल्या आणि गेल्या. मलाही कळत होतं, त्या पैसे बघून येत होत्या आणि मी पण त्यांना वापरत होतो." (आपणही कदाचित डान्स बारमध्ये जाऊन हेच केले असते.) 
मग त्याने लग्न केले आणि एक घर भाड्याने घेतले.  (आपण काही वेगळं केलं असतं का?)
टेड आपल्याकडचे पैसे कधीच संपणार नाहीत या आवेशात खर्च करत गेला आणि एक दिवस पैसे संपले. मित्र ,घर बायको(का) सगळं काही त्याच्यापासून दूर गेलं. (पुन्हा तेच,  आपलं काही वेगळं झालं असतं का ?) 
थोड्याच दिवसात टेड पुन्हा एकदा बेघर झाला आणि कचराकुंडीच्या आश्रयाला गेला. 
तशी ही कथा वाचल्यावर "असं होणारंच " असंही आपल्या मनात आलंच असेल पण......
वेन पॉवर्सचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला.  ’छप्पर फाडके’ पैसे आल्यावर लोकं असे का वागतात? 
                                                                                                                                                                                                                                                                                  प्रिय वाचक शेवटचा एकच प्रश्न..                                                                                        
असे पैसे सध्याच्या काळात तुम्हालाही मिळण्याची शक्यता आहे आणि मिळालेच तर " तुम्ही काय कराल? "
उत्तर देण्यापूर्वी टेड रॉड्रीज्गची कहाणी  Reversal of Fortune या डॉक्युमेंटरीमध्ये नक्की पाहा.

सबस्क्राईब करा

* indicates required