चोराने सोन्याची चेन गिळल्यावर पोलिसांनी काय केलं पाहा !!

त्याचं झालं असं, की राजस्थानच्या गंगाशहर भागात एक बाई खरेदी करत होती. इतक्यात बाईकवर दोनजण आले आणि त्यांनी त्या बाईची सोन्याची चेन पळवली.
पोलिसांना या घटनेचा पत्ता लागल्यावर त्यांनी त्या भागातले CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोघांचीही ओळख पटली. पुढच्या ४ तासात पोलिसांनी त्यातल्या एकाच्या मुसक्या आवळल्या होत्या.
आता येतो गोष्टीत एक ट्विस्ट. चोराने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सोन्याची चेन गिळली, पण पोलीस त्याचेही बाप निघाले. त्यांनी चोराला हॉस्पिटलमध्ये नेऊन एक्स-रे काढला. एक्स-रे मध्ये त्याच्या पोटात चेन आहे हे दिसून आलं.
आता समस्या अशी होती की चेन बाहेर काढणार कसं. तिथल्या डॉक्टरांनी एक भन्नाट सल्ला दिला. ते म्हणाले की “एन्डोस्कोपिक सर्जरी करण्यापेक्षा त्याला पोटॅशियमने भरलेले पदार्थ चारा, चेन सहज बाहेर निघेल.”
हा सल्ला ऐकल्यावर पोलिसांनी एक डझनपेक्षा जास्त केळी आणि २ पपया मागवल्या आणि त्या चोराला खाऊ घातल्या. ही ट्रिक लागू पडली. दुसऱ्याच दिवशी चेन बाहेर आली. ती कशी आली ते मात्र विचारू नका.

तर मंडळी, चोरांनी गुंगारा देण्याची ही फार जुनी पद्धत आहे. गेल्यावर्षी मुंबई पोलिसांनाही एका चोराने असाच चकवा दिला होता. त्याने तर मंगळसूत्र गिळलं होतं. पोलिसांनी मग त्याला पद्धतशीरपणे तब्बल ९६ केळी खाऊ घातल्या.
चोराला धडा शिकवण्याची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ?