दुर्मिळ असलेले महा-राष्ट्रगीत खास बोभाटाच्या वाचकांसाठी !

१९३०च्या दरम्यान 'माझे रामायण ' या नावाचे एका सुशिक्षित स्त्रीचे आत्मचरित्र आणि त्यातील नवलकथा हे पुस्तक दत्तो आप्पाजी तुळजापूरकर या गृहस्थांनी प्रकाशित केले. त्यावेळी या पुस्तकाची किंमत होती सव्वा रुपया ! आमच्या बोभाटाच्या पुस्तक संग्रहात हे पुस्तक बरेच दिवस पडून होते.केवळ योगायोगाने या पुस्तकाची पहिली काही पाने आम्ही वाचली आणि महा-राष्ट्रगीत वाचायला मिळाले. हे दुर्मिळ असलेले महा-राष्ट्रगीत आमच्या वाचकांसाठी आज इथे प्रकाशित करत आहोत.त्या काळी आता असलेला महाराष्ट्र अस्तित्वातच नव्हता त्यामुळे या गीताचे नाव  महा-राष्ट्रगीत असे आहे.आजच्या महाराष्ट्र दिनी आपले राजकीय आणि इतर वैचारिक कल विसरून या गीताचा आनंद घ्या.मित्रांसोबत शेअर करा.


जयजय महाराष्ट्र बोला । स्वातंत्र्यदेवतेला
वंदन करुनी स्मरुनी अंतरी श्रीशिवरायाला ॥ध्रु॥

पांडित्य माजले फार ।
धर्मांत शिरे अंधार । 
तों प्रकटे ज्ञानेश्वर । 
करि बंड लाविली तीट मराठी महाराष्ट्रभाला ॥१॥

सत्यावर चढले कीट।
पसरला दंभ मोकाट ।
तो अभंग लिहिले कोट।
विठ्ठल -विठ्ठल तुकाराम या करि जयघोषाला ।

तो थोर शिवाजी राणा ।
स्वातंत्र्य तयाचा बाणा ।
तो संत येथला जाणा ।
कीं महाराष्ट्र जो आज रक्षण्या देवदूत झाला ॥३।।

लोकांस करुनिया जागे
शिवराज्यरहस्या सांगे।
निजधर्म उजळण्या लागे
तो राजकारणी संत एकला रामदास अपुला ॥४॥

दुर्दैव जरी ओढवले।
कर्तव्य सारखें केले।
पावित्र्य जीवनी भरले। 
ती राजायोगिनी सती अहल्या भूषण धर्माला ॥५॥

शेवटची चमके बिजली।
ती राणी झाशीवाली।
स्वातंत्र्यसंगरी पडली।
महाराष्ट्रीची लक्ष्मी देवी वंद्य भारताला॥६॥

रणमर्द मराठे वीर।
पूर्वजे कथियला थोर ।
स्वातंत्र्य-मंत्र गंभीर ।
तोडण्या शॄखला जपा मंत्र तो घ्या ह्या शपथेला ॥७॥
हरहर महादेव बोला । रणवीर गर्जनेला ॥

सबस्क्राईब करा

* indicates required