computer

मटका- नाव आणि धंद्याचं मूळ कुठून आलं? बेटिंग-बुकी आणि इतर गोष्टींसोबत वाचा मटक्याचा पूर्ण इतिहास!

'मटकाकिंग' रतन खत्रीच्या मृत्यूची बातमी आज बहुतेक वर्तमानपत्रात तुम्ही वाचलीच असेल. 'बोभाटा'ने मटका या विषयावर का लिहावे असा प्रश्न ज्यांच्या मनात उमटला असेल त्यांच्यासाठी आधी काही सांगू या. 'मटका' हा एकेकाळी मुंबईच्या औद्योगिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. गरीबीत जिंदगी गुजारणार्‍या मजुरांच्या, कामगारांच्या दुखऱ्या मनावर लागाणारा बाम होता असे म्हटले तरी हरकत नाही. 'मटका' खेळणारा 'खिलाडी' कधीच श्रीमंत झाला नाही. श्रीमंत झाले ते 'खेळीये' म्हणजे खेळवणारे! पण उद्याचा दिवस काहीतरी घेऊन येईल अशी आशा देणारा 'मटका' हा गरीबांचा स्वस्तातला खेळ होता.  त्यांच्या ठसठसत्या जखमांवर फुंकर घालणारी ती वार्‍याची झुळूक होती. आज वाचू या रतन खत्री आणि त्याच्या मटक्याबद्दल!

जुगार म्हणजे आपल्याच नशिबाची परीक्षा घेणे.  ही थोडाशी दुष्ट प्रवृती माणूस जातीला प्राचीन काळापासून आवडते. यात कुठल्याच खंडातला माणूस अपवाद नाही. त्यामुळे जुगार हा सार्वत्रिक असला तरी मटक्याच्या जन्माचे मूळ मात्र अमेरिकेतून इकडे आले आहे. सुरुवात झाली ती 'न्यूयॉर्क कॉटन'च्या सट्ट्यापासून. अमेरिकेत गुलामगिरीच्या प्रश्नावरून यादवी सुरु झाली तेव्हा जागतिक बाजारात कापसाचा तुटवडा पडायला लागला. मग भारतासारख्या अनेक देशांतून कापूस मँचेस्टरला जायला लागला. भाव रोज वरखाली व्हायला लागले आणि न्यूयॉर्क कॉटन मार्केटच्या बंद भावावर (क्लोजींग प्राइस) सट्टा खेळला जाऊ लागला. रतन खत्रीसुद्धा या न्यूयॉर्क कॉटन सट्ट्यातला एक खेळिया म्हणजे बेटींग घेणारा! मुंबईतल्या धनजी स्ट्रीटवर त्याचा छोटासा व्यवसाय होता. येणारे जाणारे छोटेमोठे व्यापारी त्याच्याकडे सट्टा खेळायचे. धंदा हळूहळू मोठा झाला. पण काही काळातच न्यूयॉर्क कॉटनची 'रमत' संपुष्टात आली. रोजच्या बेटिंगची सवय लागलेले व्यापारी नव्या खेळाची मागणी करायला लागले. 

आणि त्यातून जन्म झाला मटक्याचा! शून्य ते नऊ या आकड्यांवर खेळला जाणारा नवा जुगार! पण आकडा काढायचा कसा? तर पत्त्याच्या कॅटमधून तीन पत्ते काढायचे आणि जिंकणारा आकडा जाहीर करायचा. एक रुपया लावला असेल तर जिंकल्यावर ९ रुपये! सकाळ संध्याकाळ दोनदा चान्स! ओपन आणि क्लोज! थोड्याच दिवसांत हा खेळ न्यूयॉर्क कॉटनपेक्षाही जास्त पसरायला लागला.  हा नवा खेळ असल्याने त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी अणि तो लोकप्रिय करण्यासाठी रतन खत्रीने चक्क एक ब्रांडिंग कँपेन केली. पत्त्याच्या कॅटमधून चित्रे काढून उरलेले पत्ते पिसून एका मटक्यात टाकले जायचे. त्यातले पहिले दोन पत्ते जनता (थर्ड पार्टी) काढायची आणि खत्री तिसरा पत्ता काढायचा. असा झाला 'मटका' या नावाचा आणि खेळाचा जन्म.

हा खेळ साठीच्या दशकात आला आणि १९८०/८५ पर्यंत अखंडित चालतच राहिला. या खेळात भाग घेण्यासाठी लागणारे पैसे म्हणजे 'एन्ट्री' इतकी कमी असायची की कोणीही खेळून आपल्या नशिबाची परीक्षा घेऊ शकायचा. हळूहळू बेटिंग करणार्‍यांची संख्या वाढत गेली. दिवसातून दोनदा आकडा लावायला खेळाडूंची गर्दी व्हायला लागली आणि त्यासोबत 'बुकी' हा प्रकार जन्माला आला.

बुकी म्हणजे रतन खत्रीने काढलेल्या आकड्यावर बेटींग घेणारे स्थानिक खेळिये!  काही वर्षांतच भारतात तब्बल १२,००० बुकी मटक्याचे बेटिंग घ्यायला लागले. धंद्याची उलाढाल दिवसाला ३५० कोटींपर्यंत पोहचली. तळागाळातल्या प्रत्येक माणसाला ही आयुष्य बदलून टाकण्याची संधी वाटायला लागली. खेळणार्‍याच्या हातात एका रंगीत चिटोर्‍याखेरीज काहीच नसायचं. पण आकडा लागला तर केवळ त्याच्या जोरावर पैसे ताबडतोब हातात यायचे. पोलीस स्टेशनला मटक्याचा अड्डा म्हणजे खात्रीशीर उत्पन्न झाले. त्यामुळे त्यांनीही मटक्याच्या अड्ड्यांकडे दुर्लक्ष केले. 'रेड' टाकायचे दिवस बुकीला सांगून ठरवले जायचे. एखादं बाकडं, दोन खुर्च्या मोडल्या जायच्या, कागदं फाडली जायची, दोन माणसं जमा केली जायची, त्यांचा 'टेबल जामीन' केला जायचा आणि तिसर्‍या दिवशी धंदा पुन्हा चालू व्हायचा. 

बोभाटाच्या वाचकांसाठी एकेकाळी त्या धंद्यात असलेल्या माणसाचे आत्मनिवेदन इथे देतो आहे. 

"आपला धंदा भोईवाड्याच्या अंडर यायचा. पलीकडच्या भागला एलफिस्टन म्हणायचं. तिकडे तोडणकर कंपनीचा धंदा होता. आपलं आणि त्यांचं बरं होतं. आपले खिलाडी आपल्याकडे त्यांचे रमय्ये त्यांच्याकडे. सकाळी सहाच्या आधीच धंदा चालू व्हायचा. गाळा लिहिणारे उशीरा यायचे. पण रायटर पावणेसहाला येऊन बाकड्यावर बसायचा. परेल वर्कशॉपची पब्लिक पहिल्या शिफ्टला जाताना आकडा लावून जायची. धंदा फुल्ल होता. टाटा कंपाउंडची दहा-बारा पोरं सकाळीच यायची. पलीकडच्या चाळीतल्या काही पोरांचा आपल्या धंद्यावर डोळा होता. त्यांचा गॉडफादर त्या वेळाचा कार्पोरेटर. अधूनमधून नडी व्हायची. सिनीअर आपला असल्यामुळे प्रकरण संपायचं. अधून मधून दादरच्या पीसीला कळ लागली की तोडणकरांचा धंदा काही दिवस बंद व्हायचा. मग तिकडची जनता आपल्याकडे. कधी भोईवाडा टाईट असला तर आपली पब्लिक तिकडे. दोन्ही बंद असले तर मात्र कोपर्‍यावर पोरं उभी करून खडेखडे बेटिंग घ्यायला लागायचं."

१९७५ साली इमर्जन्सी आली आणि मटक्याचे धंदे बंद पडले. रतन खत्री दोन वर्षं जेलमध्ये गेला. १९७७ साली इमर्जन्सी उठली. गरीबी आणि गरीब आहे तिथेच होते आणि धंदा पुन्हा सुरु झाला. यानंतर मटक्याची सूत्रे पोलिस स्टेशनसोबत नव्याने आलेल्या 'भाई' लोकांच्या हातात गेली. आता बुकीला दोन हप्ते द्यावे लागायचे. एक हप्ता पोलिसांना आणि दुसरा भाई लोकांना! 

पण हे सगळे घडण्यापूर्वी रतन खत्रीला पहिला धक्का दिला त्याच्या मॅनेजरने, म्हणजे कल्याण भगतने! कल्याण भगत हा मूळचा गुजरातच्या कच्छ प्रांतातला. त्याचे आडनाव गाला. पण त्याचे पूर्वज "भक्त" होते म्हणू त्याचे आडनाव झाले भगत! आता धंद्यात फाटे फुटायला सुरुवात झाली. रतनचा वरळीमेन आणि कल्याणजीचा 'कल्याण'. रतन आठवड्यातून फक्त पाच दिवस, तर कल्याण सात दिवस काम करायला लागले. गिर्‍हाईकं वाटली गेली, बुकी दोघांचेही बुकींग घ्यायला लागले. कल्याणच्या पाठोपाठ चंदू, चिनू, बाबला, शांती, आबनानी असे नवे मटकेवाले आले. एरिया वाटून घेण्यासाठी भाई लोकांची मदत घायला सुरुवात झाली. याच दरम्यान 'डिके' म्हणजे दिलीप कुळकर्णी गँगने रतन खत्रीला धमकी देऊन त्याचा धंदा स्वत:कडे वळवून घेतला. मुंबईचा फोर्ट एरिया मटक्याचे हेडक्वार्टर झाले. 

(कल्याण भगत)

खत्रीने काळाची पावले ओळखली आणि धंद्यातून बाहेर पडला. त्याने फिल्म फायनान्सींगचा धंदा करून बघीतला. रंगीला रतन या सिनेमाला त्यानेच पैसे दिले असे म्हणतात. पण बॉक्स ऑफीसवर सिनेमा पडला. त्यानंतर रतन खत्री रिटायरच झाला. 

नवे लोक येत राहिले.  त्यापै़की प्रशांत-ठाणे बाळू-भार्गवी-खोटे यांचे धंदे सुरु झाले. कल्याण भगतचा धंदा मात्र आहे तसाच सुरु राहिला. त्याच्यांनतर त्याच्या मुलाने धंदा हातात घेतला पण त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या पैशावरून कुरबुरी सुरु झाल्या. काही दिवसांतच बायको आणि मुलाने त्याचा काटा काढला. त्याच्या हत्येसोबत आणखी सहाजणांची पण हत्या झाली. कल्याणचा धंदा संपला.

या मटका संस्कृतीचा येत्या काही वर्षांत आपल्या सामाजिक जीवनावर काय परिणाम झाला हे वाचकांना सांगण्यासाठी बोभाटाने हा अध्याय उगाळला आहे. मटक्याने गरीबांना विरंगुळा दिला हे सत्य काही वर्षातच शापात बदलले. लोक जुगार खेळणं म्हणजे 'उसमें क्या है ' असं समजायला लागले. अनेक लोकांचा विरंगुळा व्यसनात बदलला. मटक्यासोबत 'सोशल क्लब' या नावाखाली पत्त्याच्या जुगाराचे अड्डे तयार झाले. सोबत दारुच्या अधिकृत आणि अनधिकृत धंद्याला चालना मिळाली. बुकींना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. राजकारणी लोकांनी या दोन नंबरच्या धंदेवाल्यांकडे 'पोलीटिकल इन्फ्लुएन्सर' या नजेरेने बघायला सुरुवात केली. काही बुकी थेट राजकारणात आले. मुंबईवर हळूहळू भाई लोकांची सत्ता स्थापित व्हायला सुरुवात झाली. जुगाराला प्रतिष्ठा मिळाल्याने क्रिकेट-इलेक्शन रिझल्ट या सगळ्यावर बेटिंग सुरु झाले. एकूणच सामाजिक नैतिक-अनैतिकतेच्या व्याख्या बदलायला सुरुवात झाली. त्यातूनच पुढे जे घडले तो इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर आहेच. 

आम्हाला फक्त इतकेच सांगायचे होते की समाज स्वतःला घडवत असतो आणि येणार्‍या पिढीला त्याचा बरा वाईट हिस्सा वारसाहक्कात मिळत असतो. तुमच्या कमेंटमधून या इतिहासात भर जरूर टाका!!

सबस्क्राईब करा

* indicates required